वसई: लोकलमधून प्रवास करताना गर्दी, धक्काबुक्की यामुळे प्रवाशांमध्ये होणारे वाद आणि त्याच्या व्हायरल होणाऱ्या चित्रफिती ही काही नवी गोष्ट नाही. मात्र, अलीकडच्या काळात मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात आणि खासकरून वसई विरार शहरात परप्रांतीयांच्या वाढत्या स्थलांतरामुळे तसेच अलीकडच्या काळात भाषेच्या मुद्यावरून तापलेल्या वातावरणामुळे लोकलमध्ये भाषा-आधारित ओळखीवरून लोकांमध्ये होणाऱ्या वादात वाढ झाली आहे. यासंबंधीच्या अनेक चित्रफिती समाजमाध्यमांवर फिरत असतात. तर नालासोपाऱ्याच्या लोकलमध्येही मराठी आणि हिंदी भाषेवरून पेटलेल्या वादाची एक चित्रफीत सध्या व्हायरल होत आहे.

यात एक अमराठी तरुण मराठी तरुणाला, “नाही येत मराठी, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीची येण्याची काय गरज?”, असे म्हणताना दिसत आहे. त्यामुळॆ नेटकऱ्यांकडूनही या व्हायरल चित्रफितीवर संताप व्यक्त केला जात आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल होणारी ही चित्रफीत नालासोपारा स्थानकातील आहे. या चित्रफीतीत सनी चव्हाण नावाचा तरुण लोकलमध्ये घडलेली हकीकत सांगताना दिसत आहे. सनी चव्हाणने दिलेल्या माहितीनुसार, तो सकाळी फलाट क्रमांक दोनवरून ट्रेनमध्ये चढत असताना त्याला एका अमराठी इसमाचा धक्का लागला, ज्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला.या धक्काबुक्कीदरम्यान, धक्का मारणाऱ्या व्यक्तीसोबत असणाऱ्या दुसऱ्या तरुणाने शिवीगाळ केली. यानंतर मराठी तरुणाने त्याला जाब विचारला असता, वादाने अधिक टोक गाठले.

या वादादरम्यान, अमराठी तरुण स्वतः ठाण्यात लहानाचा मोठा झाल्याचे सांगतो, पण त्याला मराठी बोलता येत नाही. मराठी तरुणाने त्याला ‘तुला मराठी का येत नाही?’ असा सवाल विचारताच, त्या अमराठी तरुणाने आक्षेपार्ह उत्तर दिले.”मला मराठी बोलता येत नाही,” असे म्हणत या अमराठी तरुणाने उद्धटपणे, “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीची येण्याची काय गरज?” असा प्रतिसवाल केला.

इतर प्रवाशांचाही सहभाग

या वादादरम्यान लोकलमध्ये उपस्थित इतर काही प्रवाशांनीही या अमराठी तरुणाला विरोध केला. “हा महाराष्ट्र आमचा आहे, मराठी बोलता आलंच पाहिजे!” असे म्हणत अनेक प्रवासी मराठी तरुणाच्या बाजूने उभे राहिले.

या घटनेमुळे लोकलमधील भाषिक तणाव आणि स्थानिकांच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच, मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनादर करणाऱ्या या वक्तव्याचा नेटकऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवासातील अशा तणावावर तातडीने लक्ष देऊन कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.