विरार : विरार पश्चिमेला असणाऱ्या आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात अस्वच्छता पसरली आहे. केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे यामुळे प्राथमिक केंद्रात जाणाऱ्या रुग्णांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

विरार पश्चिमेला आगाशी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात मोठ्या संख्येने नागरिक आणि रुग्ण आरोग्य सेवांचा लाभ घेण्यासाठी येत असतात. मात्र सध्या आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. केंद्राच्या परिसरात झाडे झुडपे उगवली असून ठीकठिकाणी झाडांच्या फांद्या पडलेल्या आहेत तसेच प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. तसेच केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दुरावस्था होऊन ठिकठिकाणी पाणी साचले आहे त्यामुळे नागरिकांना केंद्राकडे जाताना मोठी कसरत करावी लागते.

आरोग्य केंद्राच्या परिसरातच अस्वच्छता असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तात्काळ स्वच्छता करून रस्ता करण्यात यावा अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. याबाबत संबंधित केंद्रातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील व येत्या एक दोन दिवसांतच परिसर स्वच्छ करवून घेतला जाईल असे प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी ऋग्वेद दुधाट यांनी सांगितले आहे.