वसई : विरार इमारत दुर्घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारती खाली करून त्या जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. मात्र इमारती रिकामी केल्यानंतर येथील रहिवाश्यांचा हक्क अबाधित राहावा यासाठी पालिकेने अशा मालमत्ता धारकांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली आहे.
आठवडा भरापूर्वी विरार येथे धोकादायक इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली होती. यात १७ जण मृत्युमुखी पडले होते.या घटनेनंतर शहरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात मागील वर्षी आणि चालू वर्षातील अशा मिळून १९० हून अधिक धोकादायक इमारती आहेत. अशा इमारती रिकाम्या करून त्या जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार अशा इमारतींना पुन्हा नोटीस बजावून त्या खाली केल्या जाणार आहेत.
मात्र काही ठिकाणी ज्या जागेवर या इमारती उभ्या आहेत. त्या मूळ मालक व विकासक यांच्या नावे आहेत. जर घर खाली केले तर आमचा येथील हक्क ही निघून जाण्याची भीती नागरिकांना असते.त्यामुळे धोकादायक इमारती खाली करण्यासाठीही नागरिक सरसावत नाहीत. पुनर्विकास करताना ही अडथळे निर्माण केल्या जातील अशी भीती असते. त्यामुळे धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचे मालकी हक्क अबाधित राहावे यासाठी त्यांना पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. भविष्यात त्या जागेवर एखादा प्रकल्प उभा राहील तेव्हा त्यांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे. किंवा पुनर्विकासा दरम्यान ही त्याचा लाभ होणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.
विविध विभागाला नोटीस द्वारे सूचना
धोकादायक इमारतींच्या जागेवरील सातबाऱ्यावर या मालमत्ता धारकांची ही इतर हक्कात नोंद केली जावी यासाठी महसूल विभागाकडे पत्रव्यवहार केला जाणार आहे. याशिवाय त्या फेरफार मध्ये नोंद करताना तेथील नागरिकांचा हक्क आहे याची माहिती महसूल व्हावी यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना कळविले जाणार आहे.
शहरात अतिशय जीर्ण इमारती झाल्या आहेत. त्या रिकाम्या करून जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. तसेच धोकादायक इमारतींत राहणाऱ्या नागरिकांचे हक्क अबाधित राहावे यासाठी त्या नागरिकांना पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येतील. त्यासाठी आमची तयारी सुरू आहे. मनोजकुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महापालिका
दहा दिवसांची मुदत
धोकादायक इमारती रिकाम्या करण्यात येणार आहेत. यासाठी नोटिसा बजावण्यात येत असून इमारत खाली करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. त्यानंतर पोलिसांची मदत घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. इमारत खाली करताना आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पोलीस आयुक्तलयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे पालिकेने सांगितले आहे.