नालासोपारा पुर्वे्च्या सेंट्रल पार्क परिसरात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी शुल्लक कारणावरून मारहाण केली या नंतर इतर सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद करत तुळींज पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. सफाई कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतल्याने पोलिसांनी काही फेरीवाल्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नालासोपारा परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागीरी समोर आली आहे. मंगळवारी सेंट्रल पार्क येथे महापालिका सफाई कर्मचारी आदित्य बावकर हा सफाईचे काम करत होता. यावेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका फेरीवाल्याला त्याने कचरा इकडे तिकडे टाकू नकोस, एका ठिकाणी जमा करत जा असे सांगितले असता या फेरीवाल्याला याचा राग आला आणि त्याने त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी इतर सफाई कर्मचारी सोडवायला गेले असता त्यांना सुद्धा शिवीगाळ केली. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद करत तुळींज पोलीस ठाणे गाठले आणि फेरीवाल्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल एका फेरीवाल्याला ताब्यात घेतले.

नालासोपारा परिसरात फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे. दिवसागणिक फेरीवाले प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक यांच्यावर हल्ले चढवत आहेत. या अगोदरही फेरीवाल्यांनी मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या परिसरात अवैध आठवडे बाजार भरविले जात असल्याने फेरीवाल्यांची संख्या अधिक वाढत चालली आहे. राजकिय वरदहस्त असल्याने या फेरीवाल्यांची दादागीरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.