वसई:- विरारमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर होऊन शहरातील दळणवळण सुलभ व्हावे तसेच नारींगी रेल्वे फटकातील वाहतूक बंद व्हावी यासाठी नारिंगी उड्डाणपूलाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही उड्डाणपूल पूर्ण झाला नाही. सद्यस्थितीत पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम नोव्हेंबर अखेर पर्यँत पूर्ण करू असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरिकरणा दृष्टीने शहरातील विविध रस्ते व उड्डाणपूल तयार करून दळणवळण सुलभ करण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरार जवळील नारिंगी विरार पूर्व व पश्चिम जोडता यावे यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नारिंगी उड्डाणपूल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा ७२५ मीटर लांबीच असून १४ मीटर रुंद आहे. यासाठी २४ कोटीं रुपये खर्च केला जाणार आहे. मात्र मागील चार ते पाच वर्षापासून विविध प्रकारच्या अडचणीमुळे या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले आहे. याचा फटका आता सामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. 

दिवसेंदिवस विरार परिसरात नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने ये जा करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जेव्हा रेल्वे फाटक पडते तेव्हा तर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. पूर्व पश्चिम असा प्रवास करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा असून पूल सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. यासाठी रखडलेले काम तातडीने पूर्ण करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आतापर्यंत या पुलाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मध्यंतरी पालिकेचे काम अपूर्ण होते ते पूर्ण झाले आहे. तर आता रेल्वेच्या भागातील काम बाकी आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पुढील कामास चालना मिळेल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत ठाकरे यांनी सांगितले आहे. पुलाचे काम नोव्हेंबर अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे ही त्यांनी सांगितले.

नारिंगी फाटक परिसरात खड्डे 

पुलाचे काम सुरु असल्याने विरार पूर्वेच्या फाटक परिसरात बांधकामाचे साहित्य, खडी आणि इतर वस्तू रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या परिसरात मोठ्ठे खड्डे पडले असून त्याचा त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या परिसरात डांबरीकरण करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.

पूल झाल्यास कोंडी फुटेल

विरार पूर्व पश्चिम अशी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विरारच्या उड्डाणपुलावर कोंडी निर्माण होते. याशिवाय विरार पूर्वेच्या साईनाथ नाका येथे ही मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होते. जर नारिंगी पूल झाला तर बहुतांश वाहने ही त्या मार्गावरून जातील त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नियंत्रणात येईल असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.