वसई:- विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.

विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरात पालिकेने अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत तयार केली आहे.या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आजूबाजूच्या भागातील नागरिक मृतदेह घेऊन येत असतात. मात्र मागील महिनाभरापासून मृतदेह जाळण्यासाठी लागणारी लाकडेच यात पुरेशा प्रमाणात नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

तर दुसरीकडेफुलपाडा स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा देखील अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. फुलपाडा स्मशानभूमीच्या कार्यालयात पंखा नाही, तसेच तडे गेलेल्या भिंतींमधून पावसाचे पाणी झिरपून सर्वत्र अस्वच्छता पसरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार महापालिका अधिकाऱ्यांना पत्र पाठवूनही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.

फुलपाडा स्मशानभूमीची दयनीय अवस्था पाहता, स्थानिक नागरिकांकडून या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील वेळी कुटुंबीयांना लाकडांसाठी धावपळ करावी लागत असल्यामुळे वसई-विरार महानगरपालिकेकडे स्मशानभूमीतील लाकडांचा पुरवठा पूर्ववत करण्याची आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. पालिकेने लाकडाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराचे देयक न दिल्याने पुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

स्मशानभूमीत लाकडे पुरविण्याच्या संदर्भात ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे देयक थांबले होते. ती अडचण दूर करून लाकडाचा पुरवठा सुरू झाला आहे असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.