विरार : विरार पश्चिमेच्या मारंबळपाडा जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
विरार पश्चिमेला मारंबळपाडा जेट्टी आणि गाव आहे. काही महिन्यांपूर्वी मारंबळपाडा जेट्टी ते जलसार रो-रो सेवा सुरु करण्यात आली. विरार ते सफाळे या दरम्यान असणाऱ्या या फेरीबोटीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मारंबळपाडा रस्त्यावरील वाहतुकीत वाढ झाली आहे. तसेच या परिसरात मोठा गाव आणि शेती असल्याने गावातील नागरिकही या रस्त्याचा वापर करत असतात.
जुनी जेट्टी ते नवी जेट्टी या दरम्यान नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे. मात्र त्याआधी असणाऱ्या रस्त्याची कोणतीच दुरुस्ती न केल्याने दोन्ही बाजूने रस्ता खचून मध्ये उंच भाग तयार झाला आहे. यामुळे मोठे खड्डे निर्माण होऊन अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे कामही अजून अपूर्ण असल्याने अनेकदा इथे वाहतूक कोंडी होत असते. अशातच आता खड्डयांमुळे रात्रीच्या वेळी इथे अपघात होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ता रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.