वसई: विरार येथील मारंबळपाडा जेट्टीवर शनिवारी दुपारी २ च्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. रो रो बोटीतून बाहेर येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार थेट समुद्रात कोसळली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस आणि इतर प्रवाशांच्या मदतीने कारमधील दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाकडून विरार आणि जलसार दरम्यान रोरो सेवा चालवली जाते. या बोटींमधून दररोज अनेक नागरिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी प्रवास करतात. शनिवारी दुपारी जलसारहून परतलेली बोट विरारच्या मारंबळपाडा जेट्टीवर आल्यानंतर, एका चारचाकी वाहनाचा चालक गाडी बाहेर काढत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी किनाऱ्यावर येण्याऐवजी थेट समुद्रात पडली.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस, जेट्टीवरील कर्मचारी आणि उपस्थित प्रवाशांनी बचावकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखत त्यांनी कारमधील दोन प्रवाशांना वेळीच बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर काही वेळाने चालकाची गाडीही पाण्यातून बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.