हजारो मतदारांची नावे गायब ; जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता

एव्हरशाइन सिटी येथे राहणारे ६० वर्षीय दिलीप सावंत हे गेली अनेक वर्षे नियमित मतदान करत आहेत. मात्र त्यांचे नाव कुठल्याच यादीत आढळले नाही.

election voter list
संग्रहित फोटो

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे. अनेक प्रभागांतील हजारो मतदारांची नावे चक्क वगळण्यात आली आहेत. तर अनेक प्रभागांत अचानकपणे प्रभागाबाहेरची नावे घुसविण्यात आली आहेत. हा प्रकार विरोधी पक्षांच्या प्रभागात मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ४२ प्रभागांची त्रिस्तरीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आणि महिला तसेच अनुसूचित जाती जमातींचे आरक्षण सोडतीद्वारे नक्की करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या. त्या हरकती आणि सूचनांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या याद्या पाहून अनेक नागरिकांना धक्का बसला आहे. अनेक नागरिकांची नावेच याद्यांमधून गायब झाली आहेत.

एव्हरशाइन सिटी येथे राहणारे ६० वर्षीय दिलीप सावंत हे गेली अनेक वर्षे नियमित मतदान करत आहेत. मात्र त्यांचे नाव कुठल्याच यादीत आढळले नाही. असाच प्रकार वसंत नगरी येथे राहणाऱ्या सकीना नुरानी या महिलेच्या बाबतीत घडला. त्यांनी सर्व ४२ मतदार याद्या तपासल्या पण त्यांचे नाव कुठेच आढळले नाही. प्रभाग क्रमांक २९ मध्ये एकूण २१ हजार मतदार आहेत. परंतु त्यातील १ हजार १२ नावे गायब झाल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांनी केली आहे. माझ्या प्रभागातील मतदार शोधत असताना ती सापडली नाहीत अशी एकूण १ हजार १२ नावे गायब होती. ही नावे महापालिकेच्या हद्दीतून वगळून वसई विधानसभेत टाकली होती. म्हणजे या मतदारांना मतदान करता येऊ नये अशी ही व्यवस्था करम्ण्यात आली होती, असे किरण भोईरम् यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक ३६ हा वसई पूर्वेच्या नवघर येथून सुरू होऊन वसई पूर्वेच्या भोयदापाडा येथे संपतो. या प्रभागात नालासोपारा येतील अडीच हजार मतदारांची नावे घुसविण्यात आली आहेत, असा आरोप येथील शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी केला आहे. माझ्या प्रभाागातील ४५० नावे गायब करण्यात आली होती. मी ती शोधून काढली पण ती पालिका हद्दीच्या बाहेर टाकण्यात आली आहेत. अजूनही १२८ मतदारांची नावे कुठेच आढळलेली नाहीत. मिठागर वसाहतीमधील अनेक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. यामागे राजकीय षडय़ंत्र असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी जनक्षोभ उसळताच पालिका आयुक्तांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. या प्रकरणास जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे.

ज्या नावांची अदलाबदल झाली आहे, ज्यांची नावे ग्रामीण भागातील मतदार यादीत गेली आहेत किंवा वगळण्यात आली आहेत ती पडताळून पुन्हा संबंधित प्रभागात समाविष्ट करण्याच्या सूचना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्टय़ांच्या दिवशीदेखील कार्यालय सुरू ठेवून काम करण्यात येणार आहे  – अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

हरकती नोंदविण्याची मुदत ३ जुलैपर्यंत वाढवली

प्रारूप मतदार याद्यांवर हरकती नोंदविण्याची मुदत १ जुलैपर्यंत होती. ती ३ जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालिकेचे मुख्यालय, ९ प्रभाग समिती कार्यालय, संकेतस्थळ तसेच ट्रू व्होटर या अ‍ॅपवर या हरकती नोंदविता येणार आहेत.  नागरिकांनी आपली नावे तपासून काही हरकती असतील तर ती नोंदवावी असे आवाहन उपायुक्त (निवडणूक) किशोर गवस यांनी केले आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Voter name disappeared from draft voter list in vasai virar zws

Next Story
धोकादायक इमारतीत शाळा विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी