नळ जोडणीसाठी प्रयत्न; उत्तन येथील १४ हजार मच्छीमारांची पालिकेकडे मागणी

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात सतत उद्भवत असलेल्या पाणीटंचाईमुळे उत्तन येथील मासेमारी बोटींना महानगरपालिका प्रशासनाकडून स्वतंत्र नळजोडणी देण्याची मागणी मासेमारी वर्गाने केली आहे.

भाईंदर पश्चिम परिसरात उत्तन हा परिसर आहे. या परिसराला विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभला असल्यामुळे येथील नागरिक मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. मुंबई लगत असलेल्या समुद्र किनाऱ्यापैकी सर्वात अधिक मासे हे उत्तन किनाऱ्यावर मिळत असल्यामुळे येथील माशांचा खप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुमारे ७०० बोटी हे या किनाऱ्यावर आहेत. मासेमारी मौसमात येथील उलाढाल प्रति दिवस ५० लाखांच्या घरात असते. त्यामुळे समुद्रात मासेमारी करण्याकरिता एका बोटीत साधारण १५ ते २० खलाशी हे जात असतात. त्यांना जेवण व इतर कामाकरिता साधारण तीन हजार लिटर पाण्याची गरज भासत असते. हे पाणी हे मच्छीमार आपल्या घरातूनच घेऊन जात असत.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिका प्रशासनाकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे. त्यामुळे घरातील पाणी समुद्रास घेऊन गेल्यास घरात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. तर हे पाणी बाहेरून विकत घेतल्यास त्याकरिता चार ते पाच हजारांचा अतिरिक्त खर्च पडत आहे. हा खर्च उचलणे प्रत्येक मच्छीमारांना शक्य होत नसल्यामुळे पालिका प्रशासनाकडून पाण्याची सोय करण्याची मागणी मच्छीमाऱ्यांनी केली आहे. तर याकरिता १० बोटींना मिळून एक नळ उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केली आहे.

बोटीच्या परवान्याच्या आधारे नळजोडणी

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील उत्तन किनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाह मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र टाळेबंदी काळानंतर येथील मच्छीमाऱ्यांना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत समुद्रात मासेमारी करण्याकरिता जाणाऱ्या बोटीवर पिण्याकरिता तसेच इतर कामाकरिता साधारण चार ते पाच हजार रुपये खर्च करून पाणी खरेदी करण्याची वेळ मच्छीमाऱ्यांवर येत आहे. मात्र हा खर्च उचलणे मच्छीमाऱ्यांना अवघड आहेत. त्यामुळे बोटीच्या परवानाच्या आधारे दहा बोटींकरिता एक नळजोडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.