वसई किल्ल्याच्या परिसराचा विकास करणार ; वसई-विरार महापालिकेतर्फे सोयीसुविधा

सोयीसुविधांअभावी वसई किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत असते.

वसई किल्ल्याच्या परिसराचा विकास करणार ; वसई-विरार महापालिकेतर्फे सोयीसुविधा

वसई: सोयीसुविधांअभावी वसई किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत असते. त्यामुळे किल्ल्याच्या परिसरात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला आहे. त्यात बसण्यासाठी बाके, पाणपोई, प्रसाधनगृह आदींचा समावेश आहे.

वसईच्या गौरवशाली इतिहासात चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकलेला वसईचा किल्ला महत्त्वाचा मानला जातो. पुरातन संस्कृती आणि इतिहासाची साक्ष असणारा हा किल्ला आजही अभेद्य अवस्थेत आहे. हा किल्ला बघण्यासाठी दररोज शेकडो अभ्यासक आणि पर्यटक येत असतात. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र किल्ल्याच्या परिसरात कसल्याच मूलभूत सोयीसुविधा नसल्याने इथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत असते. त्यामुळे पालिकेने या ठिकाणी मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत माहिती देताना पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले की, वसईचा किल्ला शहराची शान असून तो सांस्कृतिक वारसा आहे. इथे येणाऱ्या पर्यटक आणि अभ्यागतांची गैरसोय होत असते. त्यामुळे किल्ल्याच्या परिसरात सोयीसुविधा पुरविण्याचा विचार आहे.
त्यासाठी पुरातत्त्व खात्याशी विचारविनिमय करून त्यांच्या परवानगीने या सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत. ते करताना किल्ल्याचे सौंदर्य आणि महत्त्व अबाधित राहील याची काळजी घेतली जाणार आहे.

हा परिसर मुळात निसर्गसंपन्न असून त्यात नागरिकांना सोयीसुविधा मिळाल्या तर त्याचा अधिक आनंद घेता येईल, असे आयुक्तांनी सांगितले. सुभोभिकरणाचा आराखडा तयार करून त्यानुसार निविदा मागवून पुढील कामे केली जाणार आहेत.

सुविधा काय?
पर्यटकांना बसण्यासाठी बाके, पाणपोई, ऊन आणि पावसापासून संरक्षण करणाऱ्या छोटय़ा शेड्स, मुलांना खेळण्यासाठी साहित्य, फिरते प्रसाधनगृह आदींचा सुविधांमध्ये समावेश आहे. किल्लय़ाकडे जाणारा रस्त्याच्या दुतर्फा सुभोभित झाडे लावण्यात येणार असून बसण्यासाठी बाके ठेवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Will develop vasai fort area amy

Next Story
ई-वाहनांच्या ‘कोंडी’तून महापालिकेची सुटका; अन्य वाहने खरेदी करण्यासाठी राज्य शासनाची विशेष सवलत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी