विरार : नालासोपारा परिसरात एका महिला रिक्षाचालकाला मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. यामुळे महिला रिक्षाचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात मागणी करूनही महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबे नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करवा लागत आहे. त्यात महिलांना प्रवासी भाडय़ात आणि सीएनजी भरण्यासाठी प्राधान्य दिल्याने अनेक वेळा पुरुष रिक्षाचालकांशी खटके उडत असतात. यामुळे प्रमुख रेल्वे स्थानकच्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबे तयार करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. सध्या शहरात एकही महिलांसाठी रिक्षा थांबा नाही.
वसई-विरार शहरात आता पुरुषांबरोबर महिला रिक्षाचालकसुद्धा दिसू लागल्या आहेत. मागील वर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महिलांना रोजगार म्हणून मोठय़ा प्रमाणात रिक्षाचे परिमिट देण्यात आले आहेत. यामुळे अनेक महिलांनी रोजगारासाठी रिक्षा चालविण्याकडे आपला कल वाढविला आहे. पण महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबे नसल्याने या रिक्षाचालक महिलांना अनेक अडचणीचा समान करावा लागत आहे. वसई-विरार शहरात परिवहन कार्यालयाकडून परवाने देण्यात आले आहेत. पण सोयी नसल्याने हाताच्या बोटांवर महिला चालक रिक्षा चालवत आहेत.
महिला रिक्षाचालक या नियमांचे पालन करून रिक्षा चालवत असतात. बेदरकारपणे रिक्षा हाकत नाहीत यामुळे प्रवासी महिला रिक्षातून प्रवास करणे पसंत करतात. त्यात महिला स्वत:ला अधिक सुरक्षित समजतात. यामुळे महिला रिक्षाचालकांची संख्या शहरात वाढताना दिसत आहे. असे असले तरी या महिला रिक्षाचालकांना रिक्षा चालवताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो. यात अनेक वेळा प्रवासी भाडय़ावरून पुरुष रिक्षाचालकांशी वाद होतात. अनेक वेळा काही रिक्षा थांब्यांवर महिला रिक्षाचालकांना रिक्षा लावू दिल्या जात नाहीत. तर काही वेळेस आंबटशौकीन प्रवाशांच्या टीकेला सामोरे जावे लागते. तर त्यांना प्रवासी भाडय़ात प्राधान्य दिले जात असल्याने अनेक पुरुष रिक्षाचालक त्यांच्यावर खार खात असतात. यामुळे अनेक वेळा त्यांच्याशी हुज्जत घालावी लागत आहे.
महिला रिक्षाचालकांची स्वतंत्र युनियन नसल्याने अनेक प्रश्न प्रशासनाकडे मांडले जात नाहीत. यामुळे त्यांना पुरुष रिक्षाचालकांच्या दबावाखाली काम करावे लागते. या महिला रिक्षाचालकांनी अनेक वेळा वाहतूक शाखा आणि परिवहन कार्यालय यांच्याकडे स्वतंत्र रिक्षा थांब्याची मागणी केली आहे. पण त्यांच्या मागणीला अजूनही प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. करोनाकाळात अनेक महिलांच्या घराची आर्थिक स्थिती खालावल्याने अनेक महिला या क्षेत्रात येत आहेत. पण मूलभूत सुविधा नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे अनेक महिलांनी परमिट घेऊनही पुरुष रिक्षाचालकांना भाडय़ाने रिक्षा चालवण्यास दिली आहे.
वसई-विरारमध्ये अजूनही महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबे नाहीत. विरारमधील महिलांनी याची मागणी परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेकडे केली आहे. या मागणीनुसार प्रशासनाकडून लवकरच महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबे केले जातील.
– शेखर डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक, वसई
स्वतंत्र रिक्षा थांबे नसल्याने त्रास
नालासोपारा येथील महिला रिक्षाचालक मिनाज नदाफ या राज्यस्तरीय धावपटू आहेत. त्यांना शनिवारी किरकोळ कारणावरून अशाच पद्धतीने मारहाण झाली. केवळ रिक्षा वळवताना गर्दी झाल्याने एका पुरुष रिक्षाचालकाने त्यांना मारहाण केली. यासंदर्भात तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नदाफ यांनी माहिती दिली की १०० हून अधिक महिला रिक्षाचालक वसई-विरारमध्ये आहेत. पण संघटित नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात महिलांसाठी स्वतंत्र रिक्षा थांबे नसल्याने अधिक त्रास होतो.