वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रेल्वेमार्गावर उभारण्यात येणाऱ्या चार उड्डाणपुलांसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या कामासाठी ८०० कोटी रुपयांच्या निधीसाठीचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’ च्या पुढील बैठकीत सादर करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच शहरातील उड्डाणपूल उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. याशिवाय शहरात वाहनांची संख्या बेसुमार वाढत आहे. त्यामुळे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार करून एमएमआरडीएकडे पाठविला होता.
यात नायगाव व वसई रोड रेल्वे स्थानकादरम्यान उमेळमान, वसई रोड ते नालासोपारा दरम्यान अलकापुरी, नालासोपारा ते विरार दरम्यान ओसवाल नगरी आणि विराट नगर या रेल्वे पुलांचा समावेश आहे. एमएमआरडीएने या रेल्वे उड्डाणपूलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर पालिकेने त्यासंदर्भातील सर्वेक्षण आणि आराखडे पालिकेने सादर केले होते. त्या आराखड्यालाही नुकतीच रेल्वेने मंजुरी दिली होती.
मात्र हे पूल वेळेत तयार होणे आवश्यक असल्याने याबाबत नुकतीच नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी `एमएमआरडीए’च्या महानगर आयुक्तांबरोबर विशेष बैठक घेतली. यात नाईक यांनी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. या पुलांच्या कामासाठी ८०० कोटी रुपयांच्या निधीसाठीचा प्रस्ताव एमएमआरडीएच्या पुढील बैठकीत सादर करण्यात येईल असे आश्वासन `एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी आमदार राजन नाईक यांना दिले आहे. यामुळे लवकरच उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.