scorecardresearch

वर्सोवा पूल २० फेब्रुवारीला खुला; पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; मुंबई-वसई  दिशेच्या पुलाचे काम जलदगतीने

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते.

वर्सोवा पूल २० फेब्रुवारीला खुला; पुलाचे काम ८३ टक्के पूर्ण; मुंबई-वसई  दिशेच्या पुलाचे काम जलदगतीने
भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुल

भाईंदर/वसई:  मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भाईंदर खाडीवर तयार करण्यात येत असलेल्या नवीन वर्सोवा पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ८३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही जलदगतीने पूर्ण करून २० फेब्रुवारी रोजी हा पूल वाहतुकीला खुला केला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ हा मुंबई, ठाणे, वसईला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे.  दररोज या मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. वाहनांची वाढती संख्या, जुन्या पुलाची होत असलेली दुरवस्था  लक्षात घेऊन जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात येत आहे.

या कामाची सुरुवात ही २०१८ मध्ये करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ रोजी या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र सुरुवातीला या पुलाचे काम अगदी संथ गतीने सुरू होते. त्यामुळे या कामाला ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढही  देण्यात आली होती. त्यातच दोन वर्षे करोनाचे संकट उद्भवले आणि या पुलाचे काम आणखीनच लांबणीवर पडले होते. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने मुंबई- वसई या दोन्ही दिशांकडील पुलाचे काम जोरात सुरू असून आतापर्यंत या पुलाचे ८३ टक्के इतके काम पूर्ण झाले असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सध्या भाईंदर खाडीवर असलेल्या जुन्या वर्सोवा पुलावरूनच वाहनांची  ये-जा सुरू आहे. वाढते नागरीकरण यामुळे दिवसेंदिवस या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी व नवीन पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे यांनी शुक्रवारी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व वाहतूक विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पुलावर जाऊन कामाचा आढावा घेतला आहे. या वेळी पुलाच्या कामाला गती दिली असून येत्या २० फेब्रुवारीपर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण करून पूल हा वाहतुकीला खुला केला जाईल, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नागरिकांना दिलासा

पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. तसेच उर्वरित कामही प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. नवीन पूल वाहतुकीला खुला झाला तर वाहतूक नियोजन करणेही सोपे होणार आहे. मुंबई, ठाणे येथून  पालघर, वसईच्या दिशेने येणारी वाहने ही थेट नवीन पुलावरून जातील. यामुळे जुन्या पुलावर होणारी वाहतूक कोंडी सुटून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोंडीचा फटका गावपाडय़ांना

वर्सोवा पुलाच्या परिसरात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा फटका महामार्गालगतच्या गावपाडय़ातील नागरिकांना बसत आहे. वाहतूक कोंडी होते तेव्हा वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटपर्यंतच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे ससूनवघर, मालजीपाडा, ससूपाडा, बोबतपाडा, पठारपाडा यासह अनेक खेडीपाडी यांना अडचणी निर्माण होत असून येथे राहत असलेल्या नागरिकांच्या दळणवळणावर याचा मोठा परिणाम होतो.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 04:47 IST

संबंधित बातम्या