वसई: वसई विरार शहरात बांधकामाचा निघणाऱ्या राडारोड्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गोखीवरे येथे सीएनडी वेस्ट प्रकल्प उभारला जाणार आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक परवानगी अभावी रखडला होता. अखेर त्या परवानग्या मिळाल्या असल्याने लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे.
मुंबई, ठाणे या शहरांना लागूनच वसई विरारचा परिसर आहे. शहरात महामार्ग व मोकळ्या जागा अशा ठिकाणी बांधकामे तोडलेला राडारोडा आणून टाकला जात आहे. विशेषतः हा कचरा मुख्य रस्त्याच्या कडेला व रहदारी असलेल्या मार्गात टाकला जात असल्याने शहर ही विद्रुप आहे. याशिवाय सनसिटी, नालासोपारा श्रीप्रस्थ रस्ता, विरार रस्ता यासह अन्य ठिकाणच्या भागात ही राडारोडा सारखा कचरा टाकल्याचे निदर्शनास येत आहे.
या राडारोड्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालिकेने मागील दोन वर्षांपूर्वी सीएनडी वेस्ट प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. सुरवातीला या प्रकल्प उभारणीसाठी जागेचा शोध सुरू होता.मात्र जागाच उपलब्ध होत नसल्याने अखेर पालिकेने प्रकल्प वसई पूर्वेच्या गोखीवरे येथील कचराभूमीवरच पाच एकर जागेत उभारण्याचा निर्णय घेतला होता. १५० ते २०० मॅट्रिक टन इतक्या क्षमतेचा प्रकल्प असून यासाठी १२ कोटी रुपये निधीचे नियोजन केला आहे.
या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवला होता मात्र त्यात प्राधिकरणाने काही त्रुटी काढल्याने या प्रकल्पाचे काम रखडले होते.
आता प्रकल्पाच्या कामाच्या आवश्यक परवानग्या होत्या त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंजूर केल्या आहेत. पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मंजुरी मिळाल्याने मागील दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या यामुळे या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.
पालिकेचा सीएनडी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. लवकरच तो प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. : अर्चना दिवे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) महापालिका
राडारोडा टाकणाऱ्यावर कारवाई करा
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाठोपाठ आता वसई विरार शहरातील अंतर्गत रस्त्याच्या भागात ही काही जण राडारोडा टाकून पळ काढत आहेत. अशा प्रकारच्या राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.