पालकमंत्री दादा भुसे यांचे आश्वासन

वसई: वसई-विरार महापालिका हद्दीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पालिकेकडे हस्तांतरित केल्या जाणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. जिल्हा परिषद शाळांची बिकट अवस्था, धोकादायक इमारती, शिक्षकांचा अभाव, पुरेशा सोयीसुविधा नसणे यामुळे या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे हा प्रश्न निकाली निघणार आहे.

वसईत पूर्वी ग्रामपंचायत आणि नंतर ४ नगर परिषदा होत्या. ग्रामपंचायत असल्यापासून वसई तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यरत होत्या. शहरात एकूण २२५ हून जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली असून विविध राज्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील लोक उदरनिर्वाहासाठी शहरात येत आहेत. त्यात कष्टकरी, मजूर वर्गाचा मोठा भरणा शहरात होत आहे. खाजगी शाळांतील शिक्षण या वर्गाला परवडत नाही. महापालिकेच्या शाळा नसल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांचाच पर्याय असतो. शहरात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्या केवळ मराठी माध्यमाच्या असून केवळ सातवीपर्यंत आहेत. सातवीनंतरचे शिक्षण घ्यायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. परिणामी दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना सातवीनंतर शिक्षण नाइलाजाने सोडावे लागते. शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलांचे भवितव्य पुन्हा अंधारात जाते आणि किरकोळ कामे करत ते वाममार्गाला लागतात. जिल्हा परिषद शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. या शाळांमध्ये साधनसामुग्री नाहीत. अनेक शाळांमध्ये पुरसे शिक्षकही नाहीत. प्राथमिक सुिवधांचा अभाव असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असतो. धोकादायक इमारतींमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना सतत भीतीच्या वातावरणात शिकावे लागते. त्यामुळे या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित कराव्यात अशी मागणी गेल्या   अनेक वर्षांपासून करम्ण्यात येत होती. वसई विरार महापालिका नागरिकांकडून दरवर्षी शिक्षण कर आकारत असते. मात्र पालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या शाळाच नाहीत. हा मोठा विरोधाभास होता.

पालिका फक्त जिल्हा परिषद शाळांना साहित्य पुरवते आणि मोफत पास देते. परंतु पालिकेने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते असे युवा शिवसेना नेते पंकज देशमुख यांनी सांगितले. पालिकेने शाळा हस्तांतरित करून घेतल्या तर शहरातील सर्व भाषिक विद्यार्थ्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण घेता येईल असे त्यांनी सांगितले.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन जिल्हा परिषद शाळांच्या बिकट अवस्थेबाबत माहिती दिली. गेली अनेक वर्षे हस्तांतरणाची प्रक्रिया रखडल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी वसई विरार शहरातील सर्व जिल्हापरिषदेच्या शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल असे आश्वासन पालकमंत्री भुसे यांनी दिले.