वसई : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी तिचा प्रियकर मोहम्मद झिशानला वसईच्या सत्र न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी स्टुडिओतील नऊ जणांचे जबाब नोंदवले. तनुशा आत्महत्याप्रकरणी आरोपी झिशानला रविवारी न्यायालयात हजर केले असता २८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत, असे वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सांगितले. झिशानशी असलेले प्रेमसंबंध तुटल्याने नैराश्यातून तुनिशाने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तुनिशा शनिवारी सेटवर नेहमीसारखीच वागत होती. परंतु तिने अचानक मेकअपरूममध्ये जाऊन आत्महत्या का केली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

तिच्या मृतदेहाचे रविवारी पहाटे जे. जे. रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. ती गर्भवती असल्याचे वृत्त निराधार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले. नातेवाईक परदेशातून आल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तुनिशा हिने शनिवारी दुपारी वसईतील एका स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मालिकेतील सहकलाकार मोहम्मद झिशान याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. झिशानने प्रेमसंबंध तोडल्यानेच तुनिशाने आत्महत्या केल्याची तक्रार तिची आई वनिता यांनी केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी झिशानला अटक केली होती.

प्रेमसंबंध का तुटले? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जुलैमध्ये मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान तुनिशा आणि झिशान यांचे प्रेमसंबंध जुळले होते. मात्र नोव्हेंबरमध्ये श्रद्धा वालकर प्रकरण घडले आणि त्याचे  पडसाद देशभर उमटले. त्यामुळे सध्याच्या वातावरणात आपले प्रेमसंबंध पुढे टिकणार नाहीत, असे वाटल्याने नोव्हेंबरअखेरीस झिशानने संबंध तोडले होते. त्याची माहिती दोघांच्याही कुटुंबियांना होती. त्यांनतरही ते एकत्र मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान भेटत होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.