नॉमिनेशन लागू होण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे कुठे मिळतील याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करावे.

– धनश्री ढवळे, ठाणे.

आपण नॉमिनेशनच्या आधारावर जर एखादी सदनिका हस्तांतरित करू इच्छित असाल तर आपणाला एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर त्याच्या नावावर सदनिका करायची आहे त्याच्याव्यतिरिक्त उर्वरित नॉमिनींची ना हरकत प्रमाणपत्रे, नॉमिनीचा अर्ज, नॉमिनेशनच्या जोरावर ज्याच्या नावे सदनिका करायची आहे त्याचे हमीपत्र व सदनिका हस्तांतरण करून घ्यावयाच्या वेळी विहित नमुन्यात भरून द्यावे लागणारे अर्ज, इ. कागदपत्र सादर करावी लागतील. आता हमीपत्राचा नमुना, ना हरकतप्रमाणपत्र हस्तांतरणाच्या वेळी लागणारे निरनिराळे अर्ज या सर्वाचे नमुने गृहनिर्माण संस्थांच्या उपविधीमध्ये दिलेले आहेत. कृपया आपण नवीन उपविधीचे पुस्तक घ्यावे त्यात सर्व नमुने मिळतील उपविधी हे दोन्ही भाषेत (मराठी व इंग्रजी) आहेत.

ऑडिट आणि अकाउंटिंगसाठी काही दर निश्चित केलेले आहेत का? आमची गृहनिर्माण संस्था ३६ जणांची आहे.

– सुधीर रानडे, पनवेल.

गृहनिर्माण संस्थाच्या ऑडिटसाठी पुढीलप्रमाणे दर निश्चित केलेले आहेत. ते असे-

१)    मेट्रोपॉलिमन एरिया आणि ए ग्रेड एरिया, अ‍ॅडजार्निग  कन्टेनमेंट एरिया रु. १००/ प्रत्येक सदस्यासाठी.

२)    म्युनिसीपल कॉर्पोरेशनअंतर्गत मोडणाऱ्या व कॅन्टोनमेंट एरियासाठी रु. ७५/- (प्रत्येक सदस्यासाठी).

३)    तालुका आणि नगर परिषदेअंतर्गत मोडणाऱ्या संस्थांसाठी रु. ५०/- प्रत्येक सदस्यासाठी.

४)    गावातील गृहनिर्माण संस्थांसाठी रु. ४०/-(प्रत्येक सदस्यासाठी).

५)    मोडीत निघालेल्या गृहनिर्माण संस्थांसाठी रु. २०००/- अकाऊंट लिहिण्यासाठी असे दर निश्चित केलेले नाहीत.

माझ्या कुटुंबाची मु. पो. कलाडा, ता. फलटण, जि. सातारा या ठिकाणी मोकळी जमीन आहे. सदर जमीन कलाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोडते. या ठिकाणी आम्हाला घर बांधायचे आहे त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागेल? त्या ठिकाणी एफएसआय किती मिळेल.

– विकास बर्गे,

मु. पो. कलाज, ता. फलटण, जि. सातारा

आपणाला जर आपल्या मोकळ्या जागेत घर बांधायचे असेल तर आपणाला आपली जमीन बिनशेती करून घ्यावी लागेल. त्यानंतर आपल्याला घराच्या क्षेत्रफळावर कुणाकडून परवानगी घ्यावी लागेत हे ठरवावे लागेल. सर्वसाधारणपणे अगदी छोटय़ा आकाराची घरे वगळता घर बांधण्यासाठी घराचा आराखडा (पॅटर्न) हा जिल्हा सिटी सव्‍‌र्हे ऑफिसकडून मंजूर करून घ्यावा लागतो. त्याची चौकशी आपण स्थानिक कार्यालयात करणेच इष्ट होईल. एफएसआय किती मिळेल याबाबत आपण स्थानिक वास्तुविशारदाकडून माहिती करून घ्यावी.

आम्ही ४ भाऊ आणि एक बहीण अशी सख्खी भावंडे आहोत. आम्ही सर्वजण जेष्ठ नागरिक आहोत. आमची आई तिच्या स्वत:च्या सदनिकेत आमच्या सगळ्यात लहान भावाबरोबर राहत होती. आमच्या लहान भावाचे नाव सदनिका सहधारक म्हणून नोंद केले आहे. नुकतेच आमच्या आईचे निधन झाले. तिने नॉमिनेशन केलेले नव्हते. अशा परिस्थितीत आम्ही ३ भाऊ व बहीण आपले हक्क आमच्या लहान भावाच्या नावे सोडू इच्छितो. आमचा लहान भाऊ हा त्या सदनिकेचा मालक व्हावा व गृहनिर्माण संस्थेचा सदस्य व्हावा अशी आमची इच्छा आहे. तर त्यासाठी आम्हाला वेगवेगळे प्रतिज्ञापत्र की एकत्रित एक असे प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर बनवून घ्यावे लागेल?

– आर. डी. परब, मुंबई.

आपण आपल्या प्रश्नामध्ये असे नमूद केले आहे की तुमच्या भावाचे नाव सहसदनिकाधारक म्हणून नोंदलेले आहे. याबाबत अधिक खुलासा झाला असता तर आपल्या अधिक सविस्तर उत्तर देता आले असते. आपल्या भावाचे नाव सदर सदनिका घेताना करारनाम्यात असेल तर हे काम सोपे आहे. अन्यथा आपण उपविधीमध्ये नमूद केलेल्या पद्धतीप्रमाणे आपल्या धाकटय़ा भावाला नामनिर्देशित न केलेल्या भागांचे हस्तांतरण करण्याची पद्धत अनुसरायला सांगा. त्याला उपविधी क्र. ३५ प्रमाणे प्रतिज्ञापत्र व हानिरक्षण बंधपत्र लिहून घ्यावे व आपल्या धाकटय़ा भावाला संस्थेचे सदस्यत्व करण्यास सांगावे. संस्थेने हा मार्ग अवलंबला तर ठीकच नाहीतर आपणाला न्यायालयाकडून सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावे लागेल. जरी संस्थेने वरील मार्गातील पहिल्या मार्गाने संस्थेचे सदस्यत्व दिले व भाग प्रमाणपत्र दिले तरीसुद्धा भविष्यात कुठलीही अडचण उद्भवू नये म्हणून आपण सर्वानी लहान भावाच्या नावे सदर सदनिकेच्या अनुशंगाने एक नोंदणीकृत हक्क सोड पत्र बनवून द्यावे. यालाच इंग्रजीमध्ये रिलीज डीड असे म्हणतात. म्हणजे आपल्या धाकटय़ा भावाला भविष्यात कोणताच प्रश्न उद्भवणार नाही. आमच्या मते, सर्वानी एकच प्रतिज्ञापत्र, हक्क सोडपत्र एकत्रितरीत्या बनवता येईल. रक्ताच्या नात्यासाठी स्टॅम्प पेपर फक्त रु. ५००/-चा चालतो. त्याला स्टॅम्प डय़ुटी लागू होत नाही.

माझी मेव्हणीला तिचा स्वत:चा प्लॅट तिच्या बहिणीच्या म्हणजेच माझ्या पत्नीच्या नावे हस्तांतरित करायचा आहे. त्या सदनिकेची म्हणजे फ्लॅटची किंमत तिला घ्यायची नसून तिला तो फ्लॅट बक्षीस म्हणून द्यायचा आहे. तर त्यासाठी कोणती पद्धत अवलंबवावी लागेल. सदर हस्तांतरणाला हस्तांतरण शुल्क लागू होईल का?

– कमलाकर नाईक, मुंबई.

आपल्या मेव्हणीने आपल्या पत्नीच्या नावे बक्षीस पत्र करून द्यावे. सदर बक्षीस पत्र उपनिबंधक कार्यालयात जाऊन नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर बक्षीस पत्राची प्रत जोडून सदनिका हस्तांतरणासाठी आवश्यक असणारे सर्व अर्ज, डिक्लरेशनस, मूळ शेअर सर्टिफिकेट आदी सर्व गोष्टी संस्थेकडे सादर कराव्यात. आमच्या मते, बहिणी बहिणी (सख्या) असल्याने हस्तांतरण शुल्क लागू होणार नाही. तसेच सदनिका हस्तांतरणासाठी मोबदलादेखील घेतलेला नाही; परंतु याबाबत आवश्यक तर फेडरेशन कार्यालयाशी संपर्क साधावा.

आपण दिनांक १७ जून २०१७ च्या प्रश्नोत्तर सदरात मी गोरेगाव मुंबई येथील सदनिकेच्या अनुषंगाने मृत्युपत्र केले असल्याने त्यावर प्रोबेट घ्यावे लागेल असे लिहिले आहे. पण मला असे वाटते की प्रोबेट हे फक्त ते मृत्युपत्र योग्य तऱ्हेने बनवलेले नसल्यास किंवा त्यासंबंधी वादविवाद निर्माण झाल्यास, असे प्रोबेट घ्यावे लागते.

-विजय गोखले

यापूर्वी दिलेले उत्तर बरोबर आहे. कारण निला देशपांडे यांची सदनिका गोरेगाव, मुंबई येथील आहे. त्यामुळेच आम्ही त्यांनी त्या सदनिकेच्या अनुषंगाने केलेल्या मृत्युपत्रावर प्रोबेट घ्यावे लागेल असे म्हटले आहे. मुंबई येथील मालमत्तेच्या अनुषंगाने केलेल्या कोणत्याही मालमत्तेसंबंधी केलेल्या मृत्युपत्रावर प्रोबेट (न्यायालयाचा हुकूमनामा) घ्यावे लागते; मग त्या मृत्युपत्राच्या बनवण्याविषयी शंका असोत वा नसोत.

आमच्या वडिलांच्या नावे शेतजमीन आहे. आमचे वडील वारले. आम्ही एक भाऊ, आई व मी असे सर्वजण मिळून ३ जण त्यांचे वारस आहोत. तर त्या अनुषंगाने आम्ही सदर जमिनीच्या ७/१२ वर वारसांची नोंद कशी करावी? त्याला वारसप्रमाणपत्र घ्यावे लागेल का?

– गणेश राऊत, मुंबई.

७/१२ वर नावे चढविण्यासाठी आपल्या वारसांमध्ये काही वादविवाद नसतील तर वारसप्रमाणपत्र घेण्याची जरुरी नाही. आपण तलाठय़ाकडे त्यांच्या विहित नमुन्यातील एक अर्ज सादर करावा हा फॉर्म विहित नमुन्यात उपलब्ध आहेत. त्यासोबत आपल्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे व अर्ज भरून तलाठय़ांकडे सादर करावा. मग ते त्यांच्या पद्धतीने पंचनामा करून सर्व वारसांची नावे जमिनीच्या ७/१२ वर चढवतील.

वारसप्रमाणपत्र कसे घ्यावे? हे प्रमाणपत्र मिळवताना ग्रामीण व शहरी भागामध्ये काही फरक असतो का? मी मुंबई उपनगरात राहतो तर त्याबाबत मार्गदर्शन करावे?

– गणेश राऊत, मुंबई.

आपण मुंबई येथे राहत असल्याने आपणाला मुंबई येथेच वारसप्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागेल. ग्रामीण भागातील व शहरी भागातील वारसप्रमाणपत्र मिळवण्याची पद्धत एकसारखीच असते. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात वारसप्रमाणपत्रासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करावा लागतो.

शेतजमीन बरेच दिवस पडिक असल्यास काही अडचण निर्माण होऊ शकते का? शेतजमिनीसाठी काही कर वगैरे भरावा लागतो का?

– गणेश राऊत, मुंबई.

होय. शेतजमीन बरेच दिवस पडीक ठेवू नये. तलाठय़ाकडून ७/१२ वर तशी नोंद झाल्यास ती त्रासदायक ठरू शकते. शेतजमिनीतील दरवर्षी शेतसारा भरावा लागतो.

ghaisas2009@gmail.com