News Flash

रंगविश्व ; रंगमैत्री

रंगसंगती ठरवताना केवळ विविध रंगछटा एकमेकांबरोबर कशा दिसतील याचाच विचार करून चालत नाही

खोलीतली इतर रंगसंगती आकर्षक आणि नेत्रसुखद कशी होईल, हे ठरवायचा पुढला टप्पा असतो.

एखाद्या व्यक्तीशी वैचारिक नाळ जुळणं, संसारात आयुष्याच्या जोडीदाराबरोबर चांगले सूर जुळणं किंवा शाळा-कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या मुलांमध्ये विशिष्ट मुलांची मत्री होऊन त्यांचे गट तयार होणं या सगळ्या प्रक्रियेचा जर नीट, खोलवर आणि साकल्याने विचार केला; आणि हे नेमकं घडतं कसं, याचा शोध घ्यायला गेलं तर प्रामुख्याने काही गोष्टी जाणवतात. कधी वैचारिक पातळीवरती दोन किंवा अधिक व्यक्तींची काही गोष्टींबाबत ‘वेव्हलेंग्थ’ जुळते म्हणजेच विचार जुळतात. म्हणजेच मतक्य अथवा सारखेपणा असल्यामुळे त्या दोन एकत्र आल्या तर संसार सुखाचा होतो. किंवा अशा समविचारी व्यक्तींचा समूह तयार झाला, तर एखादी चांगली संस्था किंवा सामाजिक कार्यही घडू शकतं. अर्थात असे गट आयुष्याला उठाव आणतात; पण केवळ समविचारी असून भागत नाही, तर कधीकधी एखाद्या व्यक्तीकडे ज्या गोष्टीची किंवा गुणांची कमतरता आहे, त्या बाबतीत दुसऱ्या व्यक्तीकडे असलेल्या त्या गुणामुळे पहिली व्यक्ती तरून जाते. कमी बोलणाऱ्या किंवा व्यवहारापेक्षा भावनेवर अधिक जगणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचा जोडीदारापाशी जर वाक्चातुर्य आणि व्यवहारचातुर्य हे गुण असतील तर संसार तरून जातो. हेच दोन सच्च्या मित्रांनाही लागू आहे; पण हेही सरसकट लागू नाही, तर काही बाबतीत व्यावहारिक संकुचितपणापेक्षा मनाचा भावनिक मोठेपणा हा खूप काही समाधान आणि माणुसकीचं मोठेपण देऊन जातो, अशा ठिकाणी मात्र दुसऱ्या जोडीदाराचं अशा बाबतीतलं उणेपण हे पहिल्यामुळे दुणावतं. म्हणजेच एखाद्या विशिष्ट परिस्थितीत असलेले गुण हे दुसऱ्या परिस्थितीत गुण ठरतीलच असं नाही. दोन व्यक्तींचं किंवा व्यक्तिसमूहाचं एकमेकांबरोबर असणं आणि त्यातून त्यांची आयुष्यं जशी पाहणाऱ्याला उठावदार, आनंदी वाटू शकतात, तसंच विविध रंग हे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तेसुद्धा अशा व्यक्तींप्रमाणेच कधी समानतेतून, तर कधी विरोधाभासातून उठून दिसतात. मात्र, ज्याप्रमाणे आपण पाहिलं की, एखाद्या विशिष्ट परिस्थितीत असलेले गुण हे दुसऱ्या परिस्थितीत कमतरता ठरू शकते, तसंच रंगांचं उठून दिसणं किंवा खुलून दिसणं हे त्या रंगांची व्यापकता किती यावरही अवलंबून असतं. विविध रंगांची लहानशा भिंतीवरची गुंफण ही मोठय़ा भिंतींवरही तितकीच प्रभावी दिसेल असं सांगता येत नाही. एकूणच काय, तर घरासाठी, ऑफिससाठी किंवा इतर ठिकाणांसाठी रंगांची व्यामिश्रता ठरवताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो.

vs03rrघराच्या बाबतीत विचार करायचा झाला, तर घरातल्या एखाद्या खोलीतल्या भिंतींसाठी रंगछटा ठरवताना त्या खोलीचा उपयोग कोणत्या कारणांसाठी होतो आहे, याचाही विचार रंगछटा निवडताना केला जायला हवा. भिंतींचा रंग ठरवताना आपण नसíगक आणि कृत्रिम प्रकाश किती आहे, कृत्रिम प्रकाश पांढरा आहे की पिवळा, थेट आहे की अप्रत्यक्ष अशा अनेक गोष्टींचा विचार केलेला असतो. तसंच टेक्शचर असेल, तर ते कुठल्या भिंतींसाठी असेल आणि कुठल्या भिंती साध्या रंगात रंगवायच्या आहेत वगरे गोष्टीबाबतही निर्णय घेतलेला असतो. भिंतींना कुठला रंग द्यायचा हे एकदा ठरलं की मग फर्निचरच्या पॉलिशचा किंवा सनमायकाचा रंग, सोफ्याच्या आणि तक्क्यांच्या कव्हर्सचे रंग आणि खोलीतली एकूणच रंगसंगती कशी असावी, याबाबत विचार करावा लागतो. त्यामुळे आता खोलीतली इतर रंगसंगती आकर्षक आणि नेत्रसुखद कशी होईल, हे ठरवायचा पुढला टप्पा असतो.

रंगसंगती ठरवताना केवळ विविध रंगछटा एकमेकांबरोबर कशा दिसतील याचाच विचार करून चालत नाही, तर त्या त्या रंगाचे टोन म्हणजेच निवडलेल्या रंगछटांच्या गडदपणाची किंवा फिकेपणाची तीव्रता किती आहे, याचाही विचार करावा लागतो. कारण भिंती, बेडशीट्स किंवा उशा आणि सोफा कव्हर्स यासाठी जरी मोनोक्रोम म्हणजे एकाच रंगाचा वापर करून खोलीतल्या रंगांच्या कुटुंबाचं व्यवस्थापन केलं असलं, तरी खोलीत रंगांचं वैविध्य जाणवलं पाहिजे. त्यामुळे एकाच रंगाच्या वेगवेगळ्या टोन्सचा वापर अशा वैविध्याचा आभास निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरतो. याचं एक चपखल उदाहरण म्हणजे कृष्णधवल छायाचित्र होय. त्यामध्ये केवळ काळा आणि पांढरा असे दोनच रंग असूनसुद्धा आपल्याला त्या छायाचित्रात विविध रंगछटांचा आभास तर होतोच, पण त्या छायाचित्रातल्या वस्तूंचे असलेले निरनिराळे आकार आणि त्यांची खोलीही जाणवते. रंगांच्या टोनबाबतचा विचार हा केवळ अशा प्रकारच्या मोनोक्रोम कलर स्कीममध्येच केला जातो असं नाही, तर वेगवेगळे रंग जेव्हा खोलीत वापरले जातात तेव्हाही हा विचार करावा लागतो. गडदपणाच्या किंवा फिकेपणाच्या एकसारख्याच तीव्रतेचे विविध रंग जर वापरले, तर खोली अधिक उठावदार दिसते; पण ही तीव्रता एकसारखीच आहे की नाही किंवा सोप्या भाषेत सांगायचं, तर हे रंग एकमेकांना शोभून दिसत आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. भिंतींना रंग आधी काढून झालेला असतो. त्यानंतर साधारण एक फूट बाय एक फूट आकाराचा कार्डबोर्ड घेऊन त्यावर पांढरा कागद चिकटवून मग त्यातला थोडासा उरलेला रंग त्यावर लावावा. सोफ्याची आणि उशांची कव्हर्स आणि कारपेट निवडण्यासाठी जेव्हा तुम्ही दुकानात जाल, तेव्हा हा कार्डबोर्डचा रंगवलेला तुकडा बरोबर घेऊन जा. या दुकानांमध्ये सनमायकाची, कव्हर्सच्या कापडाची आणि कारपेटची सँपल्स ठेवलेली असतात. ही सँपल्स या कार्डबोर्डच्या तुकडय़ावर लावून बघावीत, म्हणजे भिंतीच्या पाश्र्वभूमीवर हे फíनचर किंवा जमिनीवरचं कारपेट कसं दिसेल, ते आपल्याला कळू शकेल आणि आपण निवडलेल्या रंगांच्या कुटुंबातल्या रंग-सदस्यांचे स्वभाव एकमेकांशी जुळत आहेत की नाहीत, ते कळेल. मात्र, याआधी सांगितल्याप्रमाणे विविध रंगांची गुंफण करताना लहान आकाराच्या कार्डबोर्डच्या तुकडय़ावर जरी काही रंग बरे दिसत असले, तरी ते प्रत्यक्ष मोठय़ा भिंतीवर तसेच उठावदार दिसतील की नाही याचा विचार करूनच रंगांची निवड करावी. एकाच टोनचे विविध रंग जसे एकमेकांवर उठून दिसतात, तसेच रंगचक्रावर एकमेकांच्या विरुद्ध असलेले ‘कॉम्प्लिमेंटरी कलर्स’ही एकमेकांबरोबर असताना उठावदार दिसतात. विरोधी रंगांमध्येही जेव्हा उबदार आणि थंड रंग एकत्र असतात, तेव्हा उबदार रंगामुळे डोळ्यांना जाणवणारा भडकपणा त्याबरोबर असलेल्या थंड रंगामुळे कमी होऊन संतुलन साधलं जातं. अशा प्रकारे आपण निवडलेल्या रंगांची मत्री जेव्हा जुळलेली असते, तेव्हा त्या खोलीत आपल्यालाच नव्हे, तर बाहेरून येणाऱ्या एखाद्या व्यक्तीलाही आल्हाददायक, नेत्रसुखद आणि उत्साहित वाटतं.

मनोज अणावकर  anaokarm@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 3:36 am

Web Title: important tip to select the right paint and color for home and office
Next Stories
1 गुढी  उभी  ऐटीत दारी..
2 रिअल इस्टेट क्षेत्राला गुढीपाडव्याची संजीवनी!
3 मोबाइल टॉवर्स, फलक उत्पन्न ५०% रक्कम सिंकिंग फंडमध्ये गुंतवणे आवश्यक!
Just Now!
X