ज्या काळात मुलींना शाळेत जाऊ देणे व त्यांच्या बुद्धीचा विकास मान्य करणे हे समाजाला कठीण वाटत असे, त्याच काळात स्वत:ला मिळालेल्या संधीचा समर्थपणे उपयोग करून इतरांच्या सुखसोयी वाढविणारी, अडचणी दूर करणारी राज्यकर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर. राजगादीवर असलेल्या पतीच्या निधनानंतर त्यांना अनपेक्षितपणाने राजगादीची जबाबदारी सांभाळावी लागली, मात्र यामुळे हबकून न जाता त्यांनी आपली कामे अपेक्षेपलीकडे यशस्वी करून दाखवली.
मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’ असे आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, टोपली उलटी ठेवल्याप्रमाणे दगडी बांधकाम दिसते. असे बांधकाम कधी राहत्या घराचे किंवा मंदिराचे असत नाही. दरवेळी तिथून जाताना ‘हे काय असेल? ’ असा प्रश्न पडत असे. एकदा थांबून बांधकामाभोवती असलेल्या दहा-बारा महिलांना तेथे जाऊन विचारले. तेव्हा कळले की, ती एक मोठी, जवळ जवळ चाळीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. विहिरीत काठोकाठ स्वच्छ पाणी भरलेले होते. आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला चारही बाजूंना कठडय़ाच्या वर बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरतात. ही विहीर आणि हे छप्पर या जंगलामध्ये कुणी बांधले? तर या घाटाची जी पूर्वी पायवाट होती त्या वाटेने चढून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना आणि यात्रेकरूंना वाटेत विसाव्याचे ठिकाण तयार करण्यासाठी ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्पर अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५) यांनी काळ्या दगडाचे घडीव बांधकाम करून बांधले. दोनशे वष्रे होऊन गेली तरी ही विहीर तिचे पुण्यकर्म इमानेइतबारे करते आहे आणि तिचे घुमटासह बांधकामही अजून मजबूत आहे.
अहिल्याबाई होळकरांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांमधील अनेक तीर्थक्षेत्रांवर नदीकाठी प्रशस्त दगडी घाट, देखणी मंदिरे व यात्रेकरूंच्या सोयीसाठी पाणपोया व धर्मशाळा बांधल्या. जनतेच्या सोयीसाठी त्यांनी बांधकामे केली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2014 रोजी प्रकाशित
थळ घाटामधली अहिल्याबाईंची बावडी
ज्या काळात मुलींना शाळेत जाऊ देणे व त्यांच्या बुद्धीचा विकास मान्य करणे हे समाजाला कठीण वाटत असे, त्याच काळात स्वत:ला मिळालेल्या संधीचा समर्थपणे उपयोग
First published on: 29-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ahilya bai well in thal ghat