अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

* नवीन सदनिका खरेदी करताना विकासकाने सदनिकेचा ताबा घेतल्यापासून पुढील तीन वर्षांकरिता देखभाल शुल्क रुपये एक लाख आगाऊ वसूल केलेले आहे. सदनिकेचा ताबा घेतल्यानंतर केवळ तीन महिन्यांच्या आत सहकारी गृहसंस्थेची नोंदणी करण्यात आली आणि लगेचच विकासकाने पुढाकार घेऊन सर्वसाधारण सभा आयोजित केली आणि नवीन व्यवस्थापन समितीकडे गृहसंस्थेचे व्यवस्थापन सोपविले. या सर्वसाधारण सभेत, नवीन व्यवस्थापन समितीने विकासकाने आगाऊ वसूल केलेल्या देखभाल शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त देखभाल शुल्क दरमहा रुपये १०००/- वसूल करण्याचा प्रस्ताव दाखल करून पारित केल्याचे सांगितले. त्यानुसार या शुल्काची मागणी केलेली आहे आणि ही रक्कम न दिल्यास त्यावर रीतसर विलंब शुल्क देखील आकारले जाणार असल्याचे सांगितले आहे. विकासक स्वत: देखभाल करत असताना आणि व्यवस्थापन समिती कोणताही खर्च करत नसताना, केवळ भविष्यात लागतील म्हणून अतिरिक्त देखभाल शुल्काची मागणी, देयक न देता करू शकते काय?

– जगन्नाथ कुलकर्णी, कोलशेत रोड, ठाणे.

*  हा प्रश्न वाचल्यावर काही गोष्टींचा उलघडा झाला नाही. विकासकाने आगाऊ घेतलेली रक्कम गृहनिर्माण संस्थेकडे हस्तांतरित केली आहे का? अशी रक्कम हस्तांतरित केल्यावर देखील गृहनिर्माण संस्था दरमहा रु. १०००/-  देखभाल शुल्क लावते का? दरमहा रु. १०००/- देखभाल शुल्क लवाण्याचा ठराव संस्थेने मंजूर केला आहे का? विकासक स्वत: देखभाल करतात म्हणजे नक्की काय करतात? विकासक संस्थेच्या वॉचमन, नोकर यांचा पगार, कॉमन लाइट बिल, महानगरपालिकेचे कर इत्यादी स्वत: भरतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावरच या प्रश्नाला योग्य उत्तर देता येईल. तरीसुद्धा एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, ती म्हणजे- देखभाल शुल्क आकारण्याचा अधिकार गृहनिर्माण संस्थेला आहे. एखादा ठरावीक शुल्क वसूल करण्याचा ठराव एखाद्या गृहनिर्माण संस्थेने बहुमताने मंजूर केला असेल तर तो सर्व सदस्यांवर बंधनकारक असतो. आपण कोणत्याही कारणास्तव संस्थेने आकारलेले देखभाल शुल्क देण्याचे थांबवू शकत नाही. आपण जर असे शुल्क न भरल्यास संस्था आपणाला विलंब शुल्क आकारू शकते. म्हणूनच आपला एखाद्या बाबीबद्दल वाद असेल तरीसुद्धा देखभाल शुल्क भरण्याचे थांबवू नये. ते भरताना फार तर सर्व अधिकार शाबूत ठेवून (‘अंडर प्रोस्टेस्ट’) म्हणून भरावे.

* मूळ सदस्याने एखाद्याला सहयोगी सभासद नेमले तर त्याचे सहयोगी सभासदत्व रद्द अधिकार मूळ सभासदाला असतो का? अर्जासोबत प्रवेश फी भरली नसेल तर अर्ज बाद ठरतो का? सहयोगी सभासदत्व व्यवस्थापक कमिटीच्या मान्यतेशिवाय देता येते का?

– डॉ. आनंद अल्वा, ठाणे

* आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. मूळ सदस्याने एखाद्याला सहयोगी सभासद नेमले तर त्याचे सहयोगी सभासदत्व रद्द करण्याचा अधिकार मूळ सभासदाला असतो. आपल्या दुसऱ्या, तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. अर्जासोबत प्रवेश फी भरणे आवश्यक आहे. तसेच सहयोगी सभासदासाठी व्यवस्थापक कमिटीची मान्यता असावी लागते.

ghaisas2009@gmail.com