* पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच करार होईल असे गृहीत धरून इमारतीमधील ८ सदस्यांनी गाळे खाली करून दिले व उर्वरित ८ जण तेथेच राहात आहेत. त्यामुळे मासिक देखभाल वर्गणी घेणे बंद केले आहे. इमारतीच्या देखभालीचा, इ. दैनंदिन खर्च हा मुदतठेवी मोडून केला जात आहे हे योग्य आहे का?
– वसंत जोशी, डोंबिवली.
*     सर्वप्रथम पुनर्विकासाच्या कामी आय.ओ.डी. मिळाल्याशिवाय इमारतीमधील जागा खाली करून देणे बरोबर नाही. आपण अजूनही चूक सुधारू शकता. त्या सदस्यांना पुन्हा राहण्यास या, असे सांगावे व पूर्ववत मेंटेनन्स चालू करावा व आय.ओ.डी. मिळाल्यावर वैयक्तिक करारनामे नोंद झाल्यावरच आपण इमारतीचा ताबा बिल्डर अथवा विकासकाला द्यावा.
* गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याबाबत ३/१/२००९ च्या शासकीय निर्देश क्र. ७ (अ) प्रमाणे करावयाचे सर्वेक्षण शासकीय खात्याकडूनच करून घेणे अपेक्षित आहे का? तसे न करता सादर केलेला प्रकल्प अहवाल वास्तववादी होईल का? निविदा मसुदा हा कायदेशीर असेल का?
– वसंत जोशी, डोंबिवली
* आपण ज्या शासकीय परिपत्रक ३/१/२००९ चा उल्लेख केला आहे ते आपण संपूर्णपणे व शांतपणे वाचावे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्यात त्यांनी वास्तुविशारद/ प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार कसे नेमायचे याची पद्धत सांगितली आहे. त्यात त्यांनी शासकीय पॅनलवरील तज्ज्ञ अनुभवी वास्तुविशारद/ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची निवड करावी असे सुचवलेले आहे. त्यामुळे आपण म्हणता त्याचप्रमाणे सर्वेक्षण हे शासकीय खात्याकडून करून घेणे अपेक्षित नाही, तर ते त्यांच्याकडून करून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे ते वास्तववादी व कायदेशीर असेल.
* बिल्डरला स्टँप डय़ुटी, रजिस्ट्रेशन, व्हॅट आणि सव्‍‌र्हिस टॅक्स या सर्व गोष्टींसाठी २, ५२, २५०/ रु. दिले आहेत. त्यापैकी रजिस्ट्रेशन व स्टँप डय़ुटीची पावती १,५०,४८०/- रु.ची मिळली. मात्र सव्‍‌र्हिस टॅक्स व व्हॅट भरण्याची पावती मिळाली नाही. बिल्डरकडे तोंडी व लेखी मागणी करूनदेखील बिल्डरने कसलाही प्रतिसाद दिला नाही. याबाबत काय करावे?
 – शुभांगी भोसले,  चेंबूर
*  आपल्या प्रश्नात बिल्डरने आपणाकडे लेखी अमुक एक रक्कम भरण्यासाठी आपल्याला पत्र पाठवले होते. त्याला प्रतिसाद म्हणून आपण सदरचे पैसे दिले होते का? पैसे देताना सोबत पत्र/पोच घेतली होती का? यासारख्या गोष्टींचा उलगडा होणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्याला योग्य ते उत्तर देता येईल. दरम्यान, आपण बिल्डरला लेखी पत्र पाठवून मी इतके पैसे या कारणासाठी दिले होते, त्यातील उर्वरित पैसे भरले का? अशी विचारणा करावी. सदर पत्राची कोणत्याही परिस्थितीत पोच घ्यावी व त्याचे उत्तर काय येते ते पाहावे.
* मी माझ्या फ्लॅटचा ताबा २३/१२/२०१३ रोजी घेतला. त्या वेळी फ्लॅटच्या किमतीमध्ये बिल्डरने १ वर्षांचा देखभाल खर्च वसूल केला आहे. अजून गृहनिर्माण संस्थापण झालेली नाही. आता बिल्डर पुन्हा पुढील देखभाल खर्च रोखीने मागत आहे, तो मी द्यावा का? याबद्दल मार्गदर्शन करावे.
– शुभांगी भोसले, चेंबूर.
*    कायद्याने जेथपर्यंत कोणतीही संस्था उदा. गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट, इ. स्थापन होत नाही तोपर्यंत मेंटेनन्स चार्ज हे बिल्डरला देणे गृहीत आहे.
मात्र सदर पैसे कॅशमध्येच का? याचे उत्तर त्याला विचारा व तो जर त्या कालावधीची पावती देत असेल व त्यात पैसे कशासाठी मिळाले हे स्पष्ट करत असेल, तर आपण पैसे रोख स्वरूपातदेखील देण्यास हरकत नाही. मात्र या अगोदरच्या पेमेंट काळजीपूर्वक करावे.
* अ‍ॅग्रीमेंट करतानाच बिल्डरने संस्था स्थापन करणे, वीज जोडणी देणे, त्याची अनामत रक्कम देणे, लीगल चार्जेस, इ.साठी लागणारे सर्व पैसे करारनाम्याच्या माध्यमातून वसूल केलेले आहेत. तरीसुद्धा खरेदीपत्र करण्यासाठी बिल्डर अजून ५०००/- रु.ची मागणी करतो तर ते पैसे मी देऊ का?
– शुभांगी भोसले, चेंबूर.
*    आपले म्हणणे बरोबर आहे. सदर मागणी केलेल्या पैशाच्या खर्चाचा लेखी तपशील मिळाल्याशिवाय आपण कोणतेही पैसे देऊ नयेत. आपण बिल्डरला एक सविस्तर पत्र लिहावे, त्यात करारनाम्यात कोणते चार्जेस लावले आहेत ते आपल्या पत्रात कलमासह नमूद करावे व आणखी रु. ५००० कशासाठी जास्त मागत आहे, याचा लेखी खुलासा मागवावा. असा खुलासा आला व तो योग्य असेल तरच पेमेंट करावे. मात्र सर्व पेमेंट चेकनेच करावे.    
श्रीनिवास घैसास -ghaisas_asso@yahoo.com