दक्षिणी परंपरेनंतर उत्तरी परंपराही अगदी थोडक्यात विचारात घेऊन आता आपण स्थापत्यशास्त्रातील शास्त्रीय विषयांकडे वळणार आहोत.
उत्तरी परंपरा – उत्तरी परंपरेत अशास्त्रीय ग्रंथांत कौटिलीय अर्थशास्त्र, पुराणं, बृहत्संहिता, तन्त्रग्रंथ, हयशीर्ष-पञ्चरात्र, विष्णुधर्मोत्तर पुराण (चित्रकलेवरील ग्रंथ), प्रतिष्ठा ग्रंथ (हेमाद्री तथा रघुनंदनाचे ग्रंथ), हरिभक्तिविलास अशा विविध ग्रंथांचा समावेश होतो. त्याचबरोबर विश्वकर्मप्रकाश, समरांगणसूत्रधार, सूत्रधारमंडन, वास्तुरत्नावली, वास्तुप्रदीप असे केवळ वास्तुशास्त्राला वाहिलेले ग्रंथ आहेत. या साऱ्या ग्रंथांतून जमिनीची निवड, वास्तूसाठी जमीन योग्य करणे, प्रवेशद्वार, विविध कक्ष, अंतर्गत सजावट अशा विविध विषयांसह अनेक मजली प्रासादांची रचना, नगररचना अशी वास्तुशास्त्राशी संबंधित विविध विषयांची सविस्तर चर्चा येते. वास्तुरचनेसाठी सर्वप्रथम जागेची निवड महत्त्वाची. जवळजवळ सर्व शास्त्रीय व अशास्त्रीय ग्रंथांत जागेची निवड कशी, करावी याविषयी सांगितले आहे.
मातीचे वर्गीकरण
प्राचीन वास्तूविषयक ग्रंथांत मातीचे वर्गीकरण प्राधान्याने स्निग्ध व अस्निग्ध असे केले आहे. स्निग्ध मातीत चिकण व वाळूचे प्रमाण थोडे असते. अशी माती पाया खोदण्यास कठीण मानली आहे. अस्निग्ध मातीत वाळूचे प्रमाण जास्त, वाळू जाड व दगडगोटय़ांनी युक्त खणण्यास सोपी असते. दोन्ही माती पायासाठी योग्य मानल्या असल्या तरी भरपूर पाणी, क्षार व दरुगधीयुक्त स्निग्ध माती पायासाठी त्याज्य मानली आहे.
मातीची परीक्षा
बऱ्याच वेळा अनेक वर्षांच्या अनुभवांनी पारंगत झालेला एखादा वास्तुविशारद पहार मारून ती पहार जमिनीत किती खोल जाते यावरून मातीची योग्यता ठरवतो. पण जेव्हा अशा सोप्या प्रकारे परीक्षा शक्य नसते तेव्हा प्रयोगशाळेत नेऊन मातीची धारणशक्ती (soil baring capacity) तपासली जाते. प्राचीन काळीसुद्धा मातीची परीक्षा केली जात असे. अशा परीक्षेत मातीचा सुगंध, चव, मातीत मिसळलेली द्रव्ये, मातीचा स्पर्श अशा गोष्टींचा विचार प्राचीन वास्तुग्रंथात दिसून येतो. मातीचा स्पर्श कोणत्या ऋतूत कसा असावा ते सांगताना समरांगण सूत्रधारकार म्हणतो,
घर्मागमे हिमस्पर्शा या स्यादुष्णा हिमागमे।
प्रावृष्युष्णहिमस्पर्शा सा प्रशस्ता वसुन्धरा॥
उन्हाळ्यात हिमासारखी थंड, थंडीत उष्ण, पावसाळ्यात उष्ण व थंड अशी जमीन उत्तम. पण जी जमीन ऋतुमानाप्रमाणे न बदलता सर्व ऋतूंत समान राहते, स्पर्शाला जी सुखकर वाटत नाही ती जमीन त्याज्य मानावी.
ज्या मातीला सुगंध येत असेल ती माती योग्य. जिला दरुगध आहे, जिच्यात वारूळ, मृत प्राणी, हाडे, कुजक्या लाकडाचे तुकडे, अर्धवट जळलेले कोळसे असे पदार्थ आहेत ती जमीन अयोग्य मानली जाई. यामागे अर्थातच मातीचा एकजिनसीपणा ठरवणे हा भाग महत्त्वाचा आहे. वर उल्लेखिलेले पदार्थ हळूहळू कुजत जातील, वारूळ आहे म्हटल्यावर ती जमीन मुंग्या पोखरणार, अशा प्रकारची माती हळूहळू दबत जाईल. माती दबत गेली की अर्थातच मातीला वरील वास्तूचा भार पेलणे कठीण होईल. अंततोगत्वा परिणाम वास्तूवर होणार याची जाणीव असल्यानेच अशी जमीन त्याज्य ठरवली आहे.
मातीच्या परीक्षेचा सर्वात प्राचीन उल्लेख शतपथ ब्राह्मण ग्रंथात आढळतो. ब्राह्मणकार म्हणतो, आता तो खड्डा खणत आहे. माती पूर्वदिशेला टाकत आहे. आता तो ती पुन्हा खड्डय़ात भरत आहे. मंत्र म्हणत माती दाबून मजबूत करत आहे. तो माती इतकी दाबतो की ती जमिनीच्या समतल होते किंवा जमिनीहून थोडी उंच भरते. ही उंची देवतापण आहे. म्हणजेच हा खड्डा असाधारण आहे.
समरांगणसूत्रधार, मानसार, अग्निपुराण इत्यादी ग्रंथांतून अशाच प्रकारची परीक्षा सांगितली आहे. एक हात लांब, रुंद व तितकाच खोल खड्डा खणून जी माती बाहेर काढायची ती पुन्हा खड्डय़ात दाबून भरायची. खड्डा पूर्ण भरून जास्त माती वर उरल्यास जमीन उत्तम, खड्डय़ातील सर्व माती पूर्वीच्याच पातळीत येण्यास लागली तर मध्यम व खड्डा भरण्यास अधिक भर घालावी लागली तर अशी माती कनिष्ठ मानली आहे.
दुसऱ्या परीक्षेनुसार खड्डा करून तो पूर्ण भरावा. खड्डय़ापासून शंभर पावले सावकाश दूर जाऊन त्याच गतीने पुन्हा परत यावे. या काळात पाण्याची पातळी तेवढीच राहिल्यास उत्तम, एक यव म्हणजे तीन मिलीमीटर पाणी कमी झाल्यास मध्यम व त्यापेक्षा खाली गेल्यास कनिष्ठ. विविध ग्रंथांत पाण्याची पातळी कमी होण्याच्या प्रमाणात थोडाफार फरक दिसून येतो.
मानसारानुसार जमिनीची निवड केल्यावर इमारतीच्या विस्तारानुसार एक क्युबीट खोल आयताकृती खड्डा खणावा. संध्याकाळी तो सर्व बाजूंनी त्याच पातळीत पाण्याने भरून टाकावा. दुसऱ्या दिवशी बांधकाम करणाऱ्याने स्थपतीसह येऊन त्याची पाहणी करावी. खड्डा पूर्णपणे वाळला असल्यास संपत्ती, उदरनिर्वाह व पर्यायाने संपूर्ण आश्रयाला धोका समजावा. खड्डा ओला असेल तरीही तो अयोग्य मानावा, पण थोडेसे पाणी उरले असल्यास तो उत्तम मानावा.
मातीचे स्थिरीकरण
ज्या ठिकाणी वास्तू बांधावयाची आहे ती भूमी वास्तूचा भार पेलण्यास योग्य आहे किंवा नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरते. पण एखादी जमीन योग्य नसेल तर तिला सुयोग्य करण्यातच तर विद्वानांची खरी कसोटी असते. यामुळे अयोग्य जमिनीला सुयोग्य करण्याच्या प्रक्रियेला ‘वृत्तिका स्थिरीकरण’ असा शब्दप्रयोग आहे.
* आहे त्याच जागी मातीचे स्थिरीकरण करणे किंवा
* माती दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करून वास्तूचा भार पेलायला ती योग्य करणे असा दुसरा प्रकार आहे.
आहे त्याच जागी मातीचे स्थिरीकरण
मातीचे जिथल्या तिथे स्थिरीकरण करण्याविषयी शिल्पशास्त्रात फारशी माहिती नाही. कदाचित लोकसंख्या कमी असल्याने सर्वार्थाने योग्य जमिनीचीच निवड करण्यात येत असावी. म्हणून आहे त्याच जमिनीच्या स्थिरीकरणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नसावी. मात्र पाणथळ जमिनीचे स्थिरीकरण कसे करावे याचे संदर्भ सापडतात. भृगुसंहितेनुसार (अनूपं जलपङ्कमयं देशं पूर्वोत्तरखाताभिरिष्टकोपलपूरिताभिर्गर्ताभिरास्रावयेत्।) पाणथळ जागेतील पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या जमिनीत आडवे-उभे चर खणून ते दगडगोटय़ांनी भरावेत. हे चर जवळच्या नाल्यात नेऊन सोडावेत म्हणजे पाण्याचा निचरा होऊन जमिनीचे स्थिरीकरण होईल.
विटा, लेप, शिल्प, किंवा गृहरचना अशा वेगवेगळ्या कारणासाठी मातीचे स्थिरीकरण केले जात असे. कोणत्या वस्तूसाठी माती वापरायची आहे यावर स्थिरीकरणाची पद्धत अवलंबून असे. स्थिरीकरणात मातीत डिंक, लोखंडाचे चूर्ण अशा वस्तू मिसळणे, धोपटणे, भाजणे अशा गोष्टींचा समावेश होतो.
प्रयत्नपूर्वक मातीचे स्थिरीकरण करण्याची पद्धत भारतात वेदळापासून अस्तित्वात होती. शुल्बसूत्रांत वर्षभर चालणाऱ्या सत्रासाठी लागणाऱ्या विटांच्या मातीचे स्थिरीकरण केले जाई. दीर्घकालीन सत्रांत यज्ञवेदी बांधण्यासाठी उख्मभस्मयुक्त मातीच्या विटा वापरीत. यजुर्वेदात उखा नावाचे पात्र कसे करावे त्याचे वर्णन सापडते. खणलेल्या मातीत बकऱ्याचे केस, अती बारीक वाळू, लोखंडाचे चूर्ण, दगडाची बारीक भुकटी असे पदार्थ मिसळून ती माती पुन्हा पुन्हा मळून घ्यावी. अशा प्रकारे स्थिरीकरण केलेल्या मातीपासून विटा व उखा नावाचे पात्र बनवले जाई. ‘या वस्तू एक दिवस सावलीत वाळवून नंतर घोडय़ाच्या लिदीच्या धुरात सर्व बाजूंनी धूपवीत. धूपवलेल्या या वस्तू एका खड्डय़ात ठेवून औदुंबर, पलाल अशा झाडांच्या फांद्यांसकट पेटवून देत. एक दिवस व एक रात्र अशी भाजवण केलेल्या या वस्तू एकदम पक्क्या होत. उखेचे हे पात्र बनवताना फुटल्यास त्याचे पुन्हा चूर्ण करून बकरीचे केस घातलेल्या मातीत ते चूर्ण मिसळून तयार केलेले पात्र भाजून काढल्यास फुटत नाही, असा उल्लेख शतपथ ब्राह्मणात आहे.
माती दुसरीकडे नेऊन स्थिरीकरण
विटांसाठी स्थिरीकरण –
विटांसाठी माती स्थिरीकृत करण्याच्या दुसऱ्या पद्धतीत मातीतील जाड वाळू, क्षार, लाकडाचे तुकडे, तांदळाची फोलपटं इत्यादी पदार्थ काढून माती खड्डय़ात घालून खूप दिवस तुडवली जात असे. नंतर तिच्यात बंधकद्रव्य घालावे. बंधकद्रव्य म्हणजे म्हणजे अश्वत्थ, वट अशा भरपूर दूध असणाऱ्या क्षीरवृक्षांचा डिंक व त्रिफळाचा कषाय आलून ही माती पुन्हा तुडवली जाई. माती तुडवणे हा भाग स्थिरीकरणात महत्त्वाचा होता. माती खूप तुडवल्यामुळे तिचे सर्वकण मूळ आकारात येतात व मातीच्या कणांची पुनर्रचना होते. डिंक त्याला घट्टपणा देतो, तर कषाय मातीतील कृमिकीटकांचा नाश करण्यास उपयुक्त ठरतो.
तटासाठी स्थिरीकरण –
तटासाठी लागणाऱ्या मातीचे स्थिरीकरण हत्ती व बलांनी तुडवून करण्याच्या पद्धतीचा उल्लेख इ.स.पूर्व चौथ्या शतकातील कौटिलीय अर्थशास्त्रात येतो. अशाच प्रकारे गावाच्या रक्षणासाठी बांधल्या जाणाऱ्या तटाची माती हत्तीच्या पायांनी तुडवावी, असा उल्लेख समरांगण सूत्रधारात केला आहे (१०.२०). याच प्रकारचा उल्लेख शिल्परत्न या ग्रंथात येतो. शिल्परत्नकाराच्या मते, गावाभोवती दोन्ही बाजूला उतार व वरच्या बाजूला गजाच्या पाठीप्रमाणे रुंदी असलेला तट बांधावा. त्यासाठी गावाभोवती खणलेल्या तटातील मातीचा उपयोग करावा. साखरेसारख्या बारीक कणांच्या वाळूने व बारीक दगड व पाण्याने हा खंद्रभरून काढावा. नंतर मुद्गर, मुसल, बृहच्छिरस (शिरस म्हणजे डोके. डोक्याकडे जाड असणारे आयुध) अशा आयुधांनी धोपटून माती दृढ करावी. त्यानंतर त्यावर गज नाचवावेत (शिल्परत्न १०.१४-१६). आधुनिक काळात रस्ता बांधून झाल्यावर तो पक्का करण्यासाठी रोड रोलर वापरतात. वजनदार हत्ती हे त्या काळचे ‘रोड रोलर’ होते.
लेपासाठी स्थिरीकरण –
काश्यपशिल्पानुसार चित्र काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या िभतीचा लेप तयार करण्यासाठी मातीचे स्थिरीकरण केले जाते. मातीत बंधकद्रव्य व शंख-िशपले इत्यादी पदार्थ भाजून केलेला चुना व बारीक वाळू समप्रमाणात घालावी. त्यात मुद्ग क्वाथाचे पाणी, गुळाचे पाणी व खूप पिकलेल्या केळ्याचे चूर्ण हे सारे पदार्थ वेगवेगळे चुन्याच्या एकचतुर्थाश भाग घेऊन चुना व वाळूच्या मिश्रणात घालावे. हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मर्दन करावे. तीन महिन्यांनंतर यात पुन्हा गुळाचे पाणी घालून हे मिश्रण लोण्याप्रमाणे गुळगुळीत होईपर्यंत मर्दन करावे. अशा प्रकारे तयार झालेल्या गुळगुळीत मातीचा लेप ज्या िभतीवर चित्र काढावयाचे आहे त्यासाठी वापरला जात असे.
मूर्तीसाठी स्थिरीकरण –
देवमूर्ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मातीत गाईचे दूध, दही, तूप व बेल तेल मिसळावे. गोटे, दगड व लोखंड यांचे समभाग चूर्ण मातीत घालावे. चूर्ण मातीच्या एकचतुर्थाश भाग असावे, खैर व अर्जुन यांच्या झाडांच्या सालींचा कषाय घालून ते पिठाप्रमाणे मऊ होईल इतके मळावे. यात श्रीवेष्टकरस, सर्जरस (शाल वृक्षाचा िडक), कुंकू, कुष्ठ व कुन्दरू (एक प्रकारचे गवत) घालून त्यात नदीसंगमाजवळील गाळ मिसळावा. या मिश्रणाचे एक महिन्यापर्यंत मर्दन करावे. नंतर मूर्ती तयार करून तीन दिवस सुकत ठेवावी. अशी मूर्ती दगड किंवा लोखंडासारखी मजबूत होते, असे मानले जाते.
मातीच्या स्थिरीकरणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करणे महत्त्वाचे वाटते. आयुर्वेदात द्रव्यगुण विज्ञान असा विभाग आहे. यानुसार प्रत्येक द्रव्याचे विशिष्ट गुण मानले आहेत. या पाश्र्वभूमीवर विटा व उखापात्र घोडय़ाच्या लिदीत भाजावे असा सांगितले आहे. अन्यत्र गाईचे शेण वापरात असताना इथे मात्र घोडय़ाचे शेण का, असा विचार मनात येतो. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहे. घोडा हा अत्यंत ताकदवान प्राणी. देवांचे वैद्य असणाऱ्या अश्विनीकुमार या नावातसुद्धा अश्व शब्द आहे. हा अश्व शब्द या कुमारांची बौद्धिक व शारीरिक ताकद दाखवणारा असावा. अशा परिस्थितीत अश्वाच्या शेणापासून निघणाऱ्या धुरामुळे ती वस्तू अधिक कठोर होण्यास मदत होत असावी.
डिंकाचा उपयोग जोडण्यासाठी, घट्टपणासाठी प्राचीन काळापासून होत होता. शक्तिवर्धन, हाडांच्या मजबुतीसाठीदेखील आजही नियमित डिंकाचे लाडू खाल्ले जातात.
आयुर्वेदात वटाचा संबंध सामर्थ्यांशी आहे. त्याच्या या गुणामुळेच वटाचा िडक मातीत वापरत असावेत. अशा प्रकारे इतरही द्रव्यांचा व त्यांचा परस्परांवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला गेल्यास काही उत्तरे मिळू शकतील.
उत्तरार्ध