25 January 2020

News Flash

पिशव्याच पिशव्या,सर्वत्र कोंबलेल्या!

वस्तू आणि वास्तू

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कागदी आणि कापडी पिशव्या बाजारात मोठय़ा संख्येने दिसू लागल्या आहेत. केमिस्टकडे टॅबलेट्ससोबत मिळणाऱ्या छोटय़ाशा पाकिटांपासून ते फळवाल्याकडे मिळणाऱ्या तपकिरी पाकिटांपर्यंत विविध आकार-प्रकार यात दिसून येतात. बरेचसे खाद्यपदार्थ आता कागदी पिशव्यांमध्ये भरून दिले जातात. इडलीवाल्याकडेसुद्धा इडली कागदी पिशवीत मिळायला लागली आहे. हार्डवेअर दुकानात वरचेवर लागणाऱ्या वस्तू, स्क्रू, छोटेमोठे सामान कागदात गुंडाळून किंवा अशाच साध्या कागदी पिशव्यांमध्ये पॅक करून मिळते. कपडय़ांच्या दुकानात ड्रेसेस, टॉप्स कागदी बॅग्जमध्ये भरून मिळतात. ब्रँडेड उत्पादनांच्या कागदी बॅग्ज आकर्षक तर असतातच, पण त्या आकार-प्रकाराने इतर बॅग्जपेक्षा भिन्न असतात. ही झाली कागदी बॅग्ज किंवा कागदी पाकिटांमधली विविधता.

ज्यूटच्या पिशव्या, जाड कॅनव्हास कापडाच्या पिशव्या, जुन्या साडय़ांपासून केलेल्या हॅण्डी पिशव्यादेखील सर्वत्र मोठय़ा संख्येने दिसू लागल्या आहेत. भाजीपाला खरेदीसाठी सहा ते आठ कप्पे असलेल्या बॅग्ज कोणाकडे दिसतात. एकाच मोठय़ा बॅगमध्ये असे छोटे छोटे कप्पे आतून केलेले असतात. अतिशय भक्कम अशी तिची शिवण असते. एकाच वेळी चार-सहा प्रकारच्या वस्तू, भाज्या वेगवेगळ्या करून त्यातून आणता येतात. फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी ताजी राहावी यासाठी ‘रिफ्रेश बॅग्ज’ मिळायला लागल्या आहेत. त्या ओलसर करून त्यात भाजी भरून ठेवता येते. अशी भाजी दीर्घकाळ ताजी राहते. चटकन खराब होत नाही. काळी पडत नाही. या बॅग्ज प्रत्यक्ष दुकानांपेक्षा ऑनलाइन खरेदी करायचा एक ट्रेंड सध्या दिसून येत आहे. त्यावर विविध ऑफर्स सुरू असतात. जाळीदार मटेरिअलच्या आणि चेन असलेल्या बॅग्ज लिंबं, टमाटे, काकडय़ा, आलं वगरे ठेवण्यासाठी मिळतात. काही जण फोल्डिंग बॅग्ज वापरत असतात. या बॅग्ज अतिशय छोटी घडी होऊन खिशातसुद्धा बसतात. आपल्या गरजेनुसार त्या मोठय़ा करून घेता येतात. कॅरी करायला अतिशय सोप्या, कुठेही चटकन फोल्ड करून ठेवता येतील, अशा या बॅग्ज असतात. चष्म्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅग्ज आणखीन वेगळ्या असतात. बटव्यांचीदेखील भरपूर विविधता बाजारात उपलब्ध आहे. त्यात अतिशय महागडे बटवे, फंक्शन वेअर कपडय़ांवर जाणारे बटवे ते रोजच्या वापराचे बटवे, अशी भरपूर रेंज आहे. गरीब-धडपडय़ा कार्यकर्त्यांची म्हणून प्रसिद्ध असलेली शबनम पिशवीसुद्धा अतिशय ट्रेंडी असू शकते. त्यातही भरपूर आकार-प्रकार मिळतात. प्लास्टिक पिशवीसारखेच बंद असलेल्या, पण मऊ कापडी अशा बॅग्ज त्यांना असलेल्या बंदामुळे सामान भरून न्यायला, गाठ मारायला सोप्या पडतात. त्यांचीही चलती आहे. ‘नॉन वोव्हन पॉली प्रॉपिलिन बॅग्ज’ या प्रकारच्या बॅगांमध्ये तर प्रचंड व्हरायटी बाजारात उपलब्ध आहे. कॅमेऱ्याच्या दुकानापासून ते स्टेशनरी दुकानांपर्यंत या बॅगांमधील विविधता आपल्याला बघायला मिळते.

या सर्व बॅग्ज आकर्षक असतात. एकाच वापरात त्या अगदीच खराब झाल्या नसतील तर त्या जपून ठेवाव्याशा वाटतात. ‘लागतील कधी’ म्हणूनसुद्धा त्यांचा साठा केला जातो. असं असूनही ऐनवेळी त्या मिळत नाहीत, ते वेगळेच. मग घरात वेगवेगळ्या जागी बॅग्ज, पाकिटं साठवून ठेवली जातात. त्या घाईघाईत कुठेही कोंबलेल्या असल्याने नेमकी गरज असते तेव्हा त्या एकतर खराब झालेल्या असतात किंवा जुन्या खाद्यपदार्थाच्या राहून गेलेल्या अवशेषांमुळे सडूनसुद्धा गेलेल्या असतात. काही कागदी बॅग्ज, पाकिटे जिथे चिकटवलेली असतात, तिथूनच मोकळी होऊन जातात आणि ऐनवेळी फजिती होते. त्यांना सेलो टेप लावावी लागते. त्याशिवाय त्या वापरता येत नाहीत. कापडी बॅग्ज उसवणे, बंद तुटणे असेही प्रकार होऊ शकतात. त्या साठवतानाच नीट तपासून, आधीचं सामान पूर्ण काढून, स्वच्छ करून आणि एकाच जागी साठवल्या, तर गरजेच्या वेळी त्या चकटन मिळतीलच. पण तेव्हा ज्या कोणत्या नेमक्या आकाराची पिशवी आपल्याला लागणार असते, तशी निवडायला वावसुद्धा राहील. म्हणूनच कागदी आणि कापडी पिशव्या घरात एक जागा नेमून तिथेच साचवत राहत. कुठेही हात घातल्यावर हाताशी येणारा पसारा त्याने कमी होतो. कपाटांमध्ये अशा बॅग्ज कोंबून ठेवल्याने कपाट उघडल्या उघडल्या जो काही गाठोडय़ांचा पसारा भस्सकन अंगावरच येतो, तोसुद्धा या नेटकेपणाने आटोक्यात राहील.

बॅग्ज, पाकिटं नवी असताना ज्या फोल्डवर फोल्ड केलेली असतात, ती रचना बघून त्यांची नीट घडी घालून ठेवली तर त्या जास्त टिकतातसुद्धा. बाहेर पडताना आपल्याच अशा बॅग्ज, पाकिटे सोबत नेली तर नव्याने घरात येणारे आणि कचऱ्यात जाणारे किंवा साचून राहणारे सामान आटोक्यात राहील. घरच्या घरी पर्यावरण विचार जगून बघायची संधी!

करून तर बघा हे पिशव्यांचं ऑडिट आणि त्यांचं नियोजन.

prachi333@hotmail.com

First Published on January 12, 2019 1:43 am

Web Title: article about bags
Next Stories
1 ‘गंध’ घरातील गेला सांगून..
2 ऑफिस.. एक ऊर्जास्रोत
3 आग दुर्घटना पुढच्यास ठेच, मागचा अनभिज्ञच
Just Now!
X