क्षिती जोग-हेमंत ढोमे

व्यंकूची आणखी एक गंमत म्हणजे, प्लास्टिक बॉटल व प्लास्टिकची पिशवी घरी आणलेली त्याला खपत नाही. त्याला घरात कुठे चुकून प्लास्टिकची पिशवी किंवा हवाबंद पाण्याची बाटली दिसली की तो प्रचंड भुंकतो. सरकारने उठवलेल्या प्लास्टिक बंदीला कुणी देवो न देवो व्यंकूभाऊ जबरदस्त पाठिंबा देत आहेत.

अतिशय शिस्तप्रिय, गोड असणारा हेमंत व क्षितीचा व्यंकू हा अखिल मराठी तारे-तारकांच्या गळ्यातला ताईत आहे. पुलंच्या भाषेत सांगायच झालं तर- कुत्रं कसं हसत, खेळत, भुंकतं हवं. तसंच काहीसं क्षिती व हेमंतच्या भू भू चं आहे. ज्याचं नाव आहे ‘व्यंकू’. लहानपणी क्षितीच्या घरी कोणतेही प्राणी नव्हते. तिच्या बाबांना कुत्र्यांची आवड होती, पण तिची आई कुत्र्यांना घाबरायची. तिच्या आईच्या आयुष्यातला व्यंकू हा पहिला पाळीव कुत्रा आहे, ज्याला ती हातबीत लावते, असं क्षिती सांगते. हेमंतच्या घरी मात्र लहानपणी एक कुत्रा होता.

क्षिती-हेमंतला एक कुत्रा पाळायचा होता. म्हणून त्यांनी चिन्मय मांडलेकरच्या पत्नीचा सल्ला घेऊन पुण्यातील कात्रजमधील एका कॅनलला भेट दिली. तिथे सर्वात पहिले क्षिती-हेमंतच्या जवळ जो भू भू करत धावत आला तो व्यंकू होता. तेव्हा व्यंकू ४० दिवसांचा होता. व्यंकूचा पहिला पुणे-मुंबई प्रवास कसा होईल याची क्षितीला काळजी होती. कारण एखाद्या प्राण्याला पहिल्यांदाच प्रवासादरम्यान काही त्रास झाला तर तो परत गाडीतून प्रवास करत नाही. तो गाडीला आणि प्रवासाला पुढे खूप घाबरू लागतो. पण व्यंकू मस्त गाडीत खेळत होता. त्याला प्रवासात काहीच त्रास झाला नाही.

व्यंकूचा पहिला गृहप्रवेश क्षिती-हेमंतच्या जुन्या घरी झाला. जुन्या घरी क्षितीने व्यंकूला खेळण्यासाठी,  झोपण्यासाठी काही जागा ठरवल्या होत्या. क्षितीचं जुनं घर सहाव्या मजल्यावर होतं.  बाल्कनीतून व्यंकू रस्त्यावरील कुत्र्यांशी तासन्तास ‘गप्पा’ मारायचा. व्यंकूला घरात एकटं राहण्याची सवयदेखील क्षितीने पहिल्या दोन दिवसांत लावली. त्याला सवय व्हावी म्हणून दुसऱ्याच दिवशी क्षिती एक तास बाहेर गेली होती, पण तो व्यवस्थित राहिला. व्यंकूची पूर्वतयारी करून, त्याची काळजी घेऊन, त्याचं आवरून क्षिती-हेमंत घराबाहेर पडतात. आता व्यंकू व्यवस्थित घरात एकटा राहतो. न त्रास देता आणि न उद्योग करता, हे विशेष आहे.

१ सप्टेंबरला क्षिती आणि हेमंत नवीन घरी राहायला आले. नवीन घराचं फर्निचर असं तयार करायचं- ज्याचा वापर व्यंकूलासुद्धा करता येईल. म्हणून क्षितीने बेडरूममधील बेड उंचीला कमी ठेवलाय. जेणेकरून व्यंकूसुद्धा बेडवर झोपू शकेल. उडय़ा मारू शकेल. नवीन घरातल्या जागा क्षितीने ठरवण्याऐवजी व्यंकूनेच स्वत: ठरवल्यात असं क्षिती सांगते.  ‘‘नवीन घरातील हॉलमध्ये एके ठिकाणी कारपेट आहे, त्याच जागेवर जाऊन व्यंकू जेवतो. त्याला अधे-मधे काही खायला दिलं तर तो तिथेच जाऊन खातो. व्यंकूची दुपारची झोप हॉलमध्ये आणि रात्रीची झोप आमच्यासोबत बेडरूममध्ये होते. सुट्टीच्या दिवशी आम्ही घरी असल्यावरसुद्धा व्यंकू हॉलमध्येच झोपतो. त्याला कितीही विनवण्या केल्या तरी तो ऐकत नाही. बऱ्याचदा त्याच्या हट्टापायी आम्हालाही दुपारची वामकुक्षी हॉलमध्ये घ्यावी लागते.’’ असं क्षिती सांगते.

व्यंकूची सकाळी अंघोळ झाली की, त्याचं अंग कोरडं करण्यासाठी क्षिती त्याला डायिनग टेबलवर ठेवून त्याचं अंग ड्रायरने कोरडं करते. त्यामुळे तो उंचावर असलेल्या डायिनग टेबलला तसा घाबरतो. घरातल्या व्यंकूच्या गमतीजमती सांगताना क्षिती म्हणाली, ‘‘व्यंकू मला बेडवरची चादर बदलू देत नाही. कपाटातून नवीन चादर काढली रे काढली की तो लगेच बेडवरची चादर तोंडात धरून बेडवरच बसून राहतो. बेडवरची चादर बदललेली त्याला सहन होत नाही. मी आणि व्यंकू जेव्हा दोघंच घरात असतो तेव्हा तो मला स्वयंपाक करू देत नाही. कांदा चिरू देत नाही. कांदा चिरण्याचा आवाज आला रे आला की व्यंकू खूप भुंकतो. मी आणि व्यंकू आम्ही दोघंच घरी असताना मी स्वयंपाक करणं म्हणजे एक दिव्यच असतं. व्यंकूला भारतीय बठक प्रचंड आवडते. घरी त्याला भेटायला म्हणून आमचे अनेक मित्र, नातेवाईक येत असतात. त्यांनी सोफा, खुर्चीवर बसलेलं व्यंकूला खपत नाही. आम्ही पण त्याच्यासाठी सोफ्यावर बसणं बंद करून भारतीय बठक स्वीकारलीय.’’ क्षिती सांगते.

क्षितीच्या घरी दुपारी घरकामाला मावशी येतात. व्यंकूची आणि त्यांची घट्ट मत्री आहे. त्यांनी कचरा काढायला घेतला की तो गुणी बाळासारखा सोफ्यावर जाऊन बसतो. बेडरूममध्ये सामानाची आवराआवर करायला घेतली की त्यांच्यावर लक्ष ठेवत बेडवर बसून राहतो. व्यंकूची आणखी एक गंमत म्हणजे, प्लास्टिक बॉटल व प्लास्टिकची पिशवी घरी आणलेली त्याला खपत नाही. त्याला घरात कुठे चुकून प्लास्टिकची पिशवी किंवा हवाबंद पाण्याची बाटली दिसली की तो प्रचंड भुंकतो. सरकारने उठवलेल्या प्लास्टिक बंदीला कुणी देवो न देवो व्यंकूभाऊ जबरदस्त पाठिंबा देत आहेत.

व्यंकूच्या या करामती ऐकून तो किती गोड आणि मस्तीखोर आहे याची कल्पना आपल्यालादेखील आली असेलच. त्याच्यासोबत खेळण्यासाठी,  त्याला भेटण्यासाठी क्षिती हेमंतचे अनेक कलाकार मित्र त्यांच्या घरी येत असतात. व्यंकू त्यांनासुद्धा सोफ्यावर बसू देत नाही. प्लॅस्टिकच्या वस्तू वापरू देत नाही. क्षिती हेमंतला भेटण्याऐवजी सगळी मंडळी आजकाल व्यंकूला भेटायला येतात, त्याला गिफ्ट्स घेऊन येतात, त्याच्याशी गप्पा मारतात. पाहुण्यांना आमचं घर आवडो ना आवडो घरातला हसता खेळता व्यंकू भयंकर आवडतो एवढं मात्र नक्की! असं क्षिती सांगते.

शब्दांकन- मितेश जोशी

mitesh.ratish.joshi@gmail.com