19 October 2019

News Flash

आखीव-रेखीव : आनंदी घराचा संकल्प!

आपले घर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी काही अगदी सोप्या गोष्टी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

कविता भालेराव

आपण सगळेच नवीन वर्षांसाठी काही ना काही संकल्प करतो. बऱ्याचदा ते स्वत:साठी असतात आणि असायलाच हवेत; पण निरोगी मनासाठी आपले घरही निरोगी लागते आणि त्यासाठी फार काही वेगळे खर्चीक करायची गरज नसते. थोडा वेळ आणि थोडे कष्ट एवढेच पुरे असतात. आपले घर निरोगी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी काही अगदी सोप्या गोष्टी आहेत.

*     व्यवस्थित आणि नीटनेटके घर

मी मुद्दाम इथे ‘स्वच्छ’ हा शब्द वापरलेला नाही. कारण स्वच्छता ही आवश्यकच असते. घर नुसते स्वच्छ असून चालत नाही तर ते व्यवस्थित आणि नीटनेटके असेल तर ते जास्त सुंदर दिसते. घर नीटनेटकं आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला दिवसातली फक्त पंधरा मिनिटंही पुरेशी असतात. त्यासाठी रोज दीड-दोन तास काढायची गरज नसते. रोजच्या वस्तू जागेवर जरी ठेवल्या तरी आपल्या दिवसातला खूप वेळ वाचतो आणि दिवसाचे नियोजनही चांगले होते.

*     लेस इज मोअर

‘लेस इज मोअर’ ही गोष्ट आपल्या घराला अगदी लागू पडते. घरात जेवढं कमीत कमी सामान ठेवू किंवा कमीत कमी फर्निचर असेल तर ते आवरायला खूपच सोपे जाते. फर्निचर बनवताना संख्येने कमी, पण उपयुक्त असे बनवले तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो.

*     डिजिटल होम

नवीन वर्षी आपण कुठला फोन घेणार याबरोबरच आपण घरात ऑटोमेशन करणार का किंवा आधुनिक सेक्युरिटी सिस्टीम बसविणार का याचाही विचार झाला पाहिजे.

*     गो विथ स्टाइल

आपल्याला इंटिरियरची कोणती स्टाइल आवडते- जसे पारंपरिक, आधुनिक, अर्बन इंडस्ट्रियल, इत्यादी. त्यानुसार जर का घर सजवले तर फारच छान दिसेल आणि घरात जरा बदलही होईल.

*     बदलातील सातत्य

बदल मग तो कोणताही असो, आपण फ्रेश राहतो बदलामुळे. मग घराची सजावटही बदलत राहायला हवी. जसे पडदे, कुशन कव्हर, शोभेच्या वस्तू, गालिचे.. छोटे बदलही मोठा रिझल्ट देतात आणि आपणही फ्रेश राहतो.

*     मस्त आणि टिकाऊ

वस्तू किंवा फर्निचर काहीही घेताना ते टिकाऊ तर हवेच, पण सौंदर्याच्या दृष्टीनेही सुंदर हवे. टिकाऊ म्हणजे बोजड असे नाही. शक्यतो बनवूनच घ्यावे आणि ते बनवून घेताना त्यातील बारकाव्यांकडे लक्ष देणे आवश्यक  असते.

*     अचूक निवड

वस्तू निवडताना नजर खूपच पारखी असावी. ती वस्तू आपल्या घराच्या सजावटीस साजेशी असावी. बजेटबरोबरच त्या वस्तूचे सौंदर्य आणि उपयुक्तताही महत्त्वाची असते. शोभेच्या वस्तू या उपयुक्त नसतात. मग अशा वेळी त्यांचा टिकाऊपणा, फिर्निशिंग या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

*     दर्जेदार वस्तूंची निवड

‘आमचे फार बजेट नाही’ या वाक्याने आपण काहीही घरात आणतो. अनेकदा कंटाळा करून ऑनलाइन खरेदी करतो. बऱ्याचदा तर स्वस्त म्हणूनही ऑनलाइन खरेदी करतो. थोडे फिरायला लागते, पण मार्केटमध्ये दर्जेदार, किफायतशीर वस्तू मिळतात आणि फार सुरेख वस्तू मिळतात. नेहमीच दर्जेदार वस्तू घेण्याकडे कल ठेवा. ट्रेजर हंट म्हणू आपण. मजा येते ट्रेजर हंटलाही.

*     सुरक्षितता महत्त्वाची!

नवीन बाथरूमचे काम असो किंवा एखादा नवीन इलेक्ट्रिकचा पॉइंट असो, सुरक्षितता ही पहिल्या क्रमांकावरच असायला हवी. उत्तम दर्जाचे सामान वापरणे आणि योग्य माणसांकडूनच काम करून घेणे आवश्यक ठरते. दोन पसे जास्त जातील, पण तुमच्या घरापेक्षा अधिक महत्त्वाचे दुसरे काहीच असू शकत नाही.

*      तज्ज्ञांचा सल्ला आणि बजेट

जर का घरात मोठे काम करून घ्यायचे असेल तर तज्ज्ञ व्यक्तीलाच नेमा. स्वत: काम करून घेऊन खर्च कमी होत नाहीच, पण सुंदरही होत नाही. घराचे इंटिरियर हे सुंदर, वेगळे आणि उपयुक्त हवे. यासाठी आपल्यालाही बजेट ठरवायला लागते आणि बजेटमध्येच काम होणे ही तज्ज्ञांची जशी जबाबदारी आहे तशीच आपलीही आहे.

*     हिरवाई

छोटेसे झाडही आपला मूड बदलवतं. त्यामुळे घरात इनडोअर प्लॅन्ट अवश्य ठेवा. बाल्कनी असेल तर त्यातही खूप झाडं लावा. हिरव्या रंगाने फ्रेश वाटते आणि ऊर्जाही मिळते.

हॅपी न्यू इअर विथ हॅपी होम..

(इंटिरियर डिझायनर)

kavitab6@gmail.com

First Published on January 5, 2019 1:38 am

Web Title: article about resolve the happy house