14 October 2019

News Flash

वास्तुसंवाद : दिवे लागले रे..

घराच्या किंवा कार्यालयाच्या अंतर्गत रचनेचा विचार करताना प्रकाशयोजना हा भाग अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा असतो.

(संग्रहित छायाचित्र)

सीमा पुराणिक

‘‘दिवे लागले रे दिवे लागले रे

तमाच्या तळाशी दिवे लागले रे..’’

‘‘अज्ञानरूपी अंध:काराच्या मुळाशी ज्ञानाचा प्रकाश जन्माला येतो.’’ हे खरे पाहता आध्यात्मिक सत्य, पण शब्दार्थाने ते व्यावहारिक जगातही जसेच्या तसे लागू पडते. अर्थातच सूर्यप्रकाशाच्या अनुपस्थितीत आपल्याला कृत्रिम प्रकाशाची गरज पडली खरी; परंतु  गरज ही तर शोधाची जननी आहे. तेला-तुपाच्या आणि रॉकेलच्या दिव्यांनंतर गॅसच्या बत्त्या आल्या. कालांतराने विजेचा आणि बल्बचा शोध लागला..  फ्लुरोसन्ट लाइट, हॅलोजन- निऑन लाइट्स आले..  आणि आता तर एलईडी लाइट्सचे ((Light  Emitting Diodes) युग आहे. आधुनिक जगात ऊर्जा बचत करणे अनिवार्य असल्याने विजेची बचत करण्यासाठी हे तंत्रज्ञान आता काळाची गरज झाली आहे.

घराच्या किंवा कार्यालयाच्या अंतर्गत रचनेचा विचार करताना प्रकाशयोजना हा भाग अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा असतो. नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्हीही प्रकारच्या प्रकाश स्रोताची दिशा, तीव्रता ठरविताना त्या जागेची आणि तेथील वस्तूची मोजमापे, मांडणी, उपयुक्तता, रंगसंगती  इत्यादी अनेक मुद्दय़ांचा विचार करावा लागतो. आपल्या वास्तूतील प्रकाशयोजना ही उपयुक्तता आणि सुंदरता या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणारी असली पाहिजे. प्रकाशयोजना करताना आपण फक्त कार्यात्मक पलूंचाच विचार करतो का? तर तसे नसून ती प्रकाशयोजना नेत्रसुखदही असली पाहिजे. त्याचप्रमाणे अंतर्गत सजावटीचे मूल्य वाढवणारी असली पाहिजे.

नैसर्गिक प्रकाशयोजनेबाबत आपण मागील लेखात चर्चा केलीच.

कृत्रिम प्रकाशयोजना (Artificial Lighting) करताना पुढील तीन मुद्दय़ांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो.

१.  सभोवताली पुरेसा आणि स्वच्छ प्रकाश असणे (Ambient Lighting)

२.  विशिष्ट कामांसाठी विशेष प्रकाशयोजना करणे (Task Lighting)

३. सौंदर्य दृष्टिकोनातून वैशिष्टय़पूर्ण आणि आकर्षक प्रकाशयोजना करणे. (Accent or Focussed Lighting)

सुयोग्य प्रकाश आपली क्रियाशीलता वाढवतो. आणि मन:स्थितीत सकारात्मक बदल घडवतो. घरात तसेच ऑफिसमध्येही प्रकाशयोजना उत्तम असेल तर कार्यक्षमता वाढते. कामाचे सातत्य वाढते. याउलट अंधाऱ्या अडगळीच्या खोलीत निराशेचे वातावरण अनुभवावयास मिळते. नैसर्गिक सूर्यप्रकाशाची कमतरता असेल तर कॉर्नर लाइट्स, वॉल वॉशर्स यांसारख्या कृत्रिम प्रकाशयोजनेद्वारे खोलीला उजाळा देता येतो. बरेचदा मोठय़ा हॉलच्या मध्यभागी जे झुंबर असते ते केवळ देखाव्यासाठी नसून संपूर्ण हॉलमध्ये भरपूर प्रमाणात उजेड देण्यासाठी असते.

खोलीतील प्रत्येक भागात पुरेसा उजेड असावा, हे कितीही खरे असले तरी सध्याची काळाची गरज म्हणजे ऊर्जा बचत (Energy Saving) पूर्वीच्या टय़ूबलाइट्सची जागा आता एल. ई. डी. लाइट्सने घेतली आहे. केवळ पंधरा वॅट्सच्या एल.ई.डी. लाइट्स खोलीतील त्या त्या मर्यादित भागात पण पुरेसा प्रकाश देतात, त्यामुळे कार्यात्मक मूल्यांचा विचार तर होतोच शिवाय विजेचीही बचत होते. अर्थातच वीजबिल कमी येते आणि ही वैयक्तिक दृष्टय़ा नक्कीच जमेची बाजू होय.

कोणत्याही गोष्टीचा कार्यकारण भाव लक्षात घेऊन ती कृती करणे हे केव्हाही उत्तम. यानुसार कामाचे स्वरूप लक्षात घेऊन प्रकाशयोजना करणे हे महत्त्वाचे असते. जसे की घरासाठी किंवा एखाद्या शोरूमसाठी प्रकाशयोजना करताना कार्यकारण भाव नक्कीच वेगवेगळा असतो. तसेच गरजेपेक्षा प्रकाशाची तीव्रता जास्त असेल, तर विनाकारण डोळ्यांवर आणि मेंदूवर ताण येतो किंवा अतितीव्र प्रकाशात सतत राहिल्यासही डोळ्यांची कार्यक्षमता मंदावते. मानवी डोळ्यांची रचना ही थेट प्रकाशाकडे बघण्याच्या दृष्टीने केलेली नसून, प्रकाशाच्या माध्यमाद्वारे बघण्यासाठी केलेली आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे शक्यतोवर प्रकाशाचे किरण सरळपणे डोळ्यात जाणार नाहीत अशा पद्धतीने प्रकाशयोजना केल्यास (Indirect Lighting) डोळ्यांना सुखकारक होते. डीमर स्विचेसचा वापर करून आपण प्रकाशाची तीव्रता गरजेनुसार कमी-जास्त करू शकतो.

दैनंदिन पण विशिष्ट अशा कामांसाठी विशेष प्रकाशयोजना केली जाते. (Task Lighting) जसे की बिछान्याजवळ वाचनाकरिता दिलेला विशेष लाइट जो त्याच्या फ्लेक्सिबल रॉडमुळे आपल्याला हव्या त्या दिशेने सेट करता येतो किंवा स्वयंपाक घरातील कटिंग प्लॅटफॉर्मसाठी दिलेला लाइट कामामध्ये सहजसुलभता आणि गती आणतो.

अंतर्गत सजावटीतील काही वैशिष्ट्यपूर्ण भाग किंवा विशेष चित्राकृती, कलाकृती याकडे त्वरित लक्ष वेधले जावे या दृष्टिकोनातून प्रकाशयोजना केली जाते. (Accent or Focussed Lighting) यासाठी हॅलोजन स्पॉट लाइट्स किंवा वॉल लाइट्स यांचा वापर केला जातो.

अंतर्गत सजावटीत सौंदर्य दृष्टिकोनातून भर घालणारी प्रकाशयोजना ही त्या जागेच्या रचनेमध्ये स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवते. जसे की डेकोरेटिव्ह वॉल लाइट्स, हँगिंग लाइट्स.. डाइिनग टेबलवरील हँगिंग लॅम्पशेडसची छान छान डिझाइन्स मात्र उपयुक्तता आणि सौंदर्यता या दोन्हीचा सुरेख मेळ घालताना दिसतात. अगदी स्टँडिंग लाइट्सदेखील स्वतच्या उपस्थितीने आजूबाजूच्या अंतर्गत रचनेला एक वेगळीच नजाकत देतात.

प्रकाशयोजनेतील मांडणी आणि प्रकाशाची तीव्रता यानुसार त्या खोलीतील रंगसंगतीचाही प्रभाव बदलतो. खोलीतील भिंतीवरून आणि वस्तूंवरून परावर्तित झालेल्या प्रकाशामुळेही त्या खोलीच्या आकर्षकतेत फरक पडतो. गडद रंगाच्या भिंती कमी प्रमाणात प्रकाश परावर्तित करतात तर फिक्कट रंगाच्या भिंती अधिक प्रमाणात. त्यानुसार खोलीची भव्यता कमी अधिक प्रमाणात जाणवत असते. काही प्रकारचे लाइट्स विशिष्ट दिशेने प्रस्थापित केले की भिंतीवरील रंगांना उजाळा देतात. (Directional  Lighting, Track Lighting) तर काही लाइट्सच्या बाबतीत प्रकाशाचा झोत भिंतींवर न पडता सरळपणे जमिनीवर प्रकाश देतो. (Recessed Can Lighting) दोन्ही बाबतीत प्रकाशामुळे रंगांमध्ये बदलाव जाणवतो.

अंतर्गत रचना करताना त्या त्या वास्तूमध्ये उपलब्ध होऊ शकणारा नसर्गिक सूर्यप्रकाश आणि कृत्रिम प्रकाशयोजना यांची योग्य ती सांगड घालणे हे जास्त महत्त्वाचे. बाजारात तर विविध प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित नानाविध डिझाइन्सचे लाइट्स मिळतात, परंतु आपल्या घरातील अंतर्गत योजनेला साजेसे लाईट फिटिंग योग्य त्या जागी लावणे आणि त्यामागील उद्देश सफल होणे महत्त्वाचे. अन्यथा ते अंतर्गत सजावटीच्या खर्चात उगीचच भर घालतील आणि विजेचा उपयोगही सार्थ नसेल. म्हणूनच बाजारातील सर्व प्रकारच्या लाईट्सची नीट माहिती असेल, तसेच अंतर्गत रचना आणि प्रकाशयोजना या दोहोंचा सुयोग्य

मेळ घालण्याचे कौशल्य असेल तरच प्रकाशयोजना आणि वीजवापरासाठी केलेला खर्च फलदायी ठरेल.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)

First Published on May 11, 2019 1:14 am

Web Title: article on lights in home