12 December 2017

News Flash

आरोग्य आणि रंग

रंगांमधून परावर्तित होणाऱ्या ऊर्जेचा विचार करून रंगांची निवड आणि एकूणच रंगसंगती यांचा विचार होणं

मनोज अणावकर | Updated: October 7, 2017 1:06 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आतापर्यंत आपण रंगविश्व या सदरातून वेगवेगळ्या रंगांचं एकमेकांशी असलेलं नातं, त्यांच्या फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंग्थ अर्थात वारंवारता आणि तरंगलांबी यानुसार त्यांच्याकडून परावर्तित होणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण आणि त्याचे मनावर होणारे परिणाम या सगळ्याबद्दल जाणून घेतलं. तसंच घरातल्या विविध खोल्यांमध्ये या रंगसंगतीचा कसा वापर करून घेता येईल याबद्दल आपण माहिती घेतली. पण रंगांचं हे व्यवस्थापन केवळ घरातल्या खोल्यांपुरतंच मर्यादित नसतं. रुग्णालयं, शाळा-महाविद्यालयं यांसारख्या शैक्षणिक संस्था, मॉल्स, विविध प्रकारची कार्यालयं अशा अनेक ठिकाणी कोणत्या स्वरूपाची कामं चालतात, ते लक्षात घेऊन ही कामं अधिक प्रभावीपणे करता यावीत, या ठिकाणी वावरताना मनावर दडपण येऊ नये, तर उलट मन प्रसन्न राहावं, यासाठी योग्य रंगांची निवड केली, तर योग्य तो परिणाम साधायला मदत होऊ शकते. त्याकरता रंगांमधून परावर्तित होणाऱ्या ऊर्जेचा विचार करून रंगांची निवड आणि एकूणच रंगसंगती यांचा विचार होणं आवश्यक आहे.

आजच्या या भागात म्हणूनच आपण रुग्णालयांसाठी रंगसंगती कशी असावी हे जाणून घेणार आहोत. या विषयावर इमारत संशोधनाशी संबंधित असलेल्या इंग्लंडच्या बीआरई आणि लंडन साउथ बँक युनिव्हर्सिटी यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या अहवालात आधुनिक नैसर्गिकच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचे विचार अहवालाच्या सुरुवातीलाच मांडले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, एकाच खोलीत दीर्घकाळ राहणाऱ्या किंवा एकाच प्रकारच्या वातावरणात वावरणाऱ्या व्यक्तींच्या मनात नराश्याची भावना असते, तर विविध ठिकाणी वावरणाऱ्या माणसाचं मन प्रसन्न राहायला मदत होते. या एकसाचीपणाचा केवळ मनावरच परिणाम होत नाही, तर शरीरावरही मोठा परिणाम होतो, म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या रंगांतल्या वस्तू जर रुग्णांच्या आजूबाजूला ठेवल्या, तर त्यांना त्यांच्या आजारातून लवकर बरं व्हायला मदत होते. नाइटिंगेल बाईंनी व्यक्त केलेल्या या विचारांना जरी शंभराहून अधिक वर्ष लोटली असली, तरी त्यांचं हे निरीक्षण आजही तंतोतंत लागू पडतं.

रुग्णालयात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातले रुग्ण असू शकतात. या सर्वाच्या आवडीनिवडी भिन्न असणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांचे मूड अर्थात मन:स्थितीही वेगवेगळी असते. शिवाय एकाच व्यक्तीची शस्त्रक्रियेआधी, शस्त्रक्रिया झाल्यावर लगेचच, तसंच काही दिवसांनी प्रकृतीला जसा आराम पडतो, तशी मन:स्थिती बदलत जाते. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यावर मनावर ताण असताना आजूबाजूला जे वातावरण असतं, त्याची दडपण असलेल्या मन:स्थितीतली एक प्रतिमा मनावर कुठेतरी खोलवर कोरली गेलेली असते आणि त्याचा परिणाम जर तसाच शस्त्रक्रियेनंतर राहिला, तर रुग्णाच्या परिस्थितीत सुधारणा होणं कठीण होऊन बसतं. रुग्णाला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणल्यावर आधी रिकव्हरी रूममध्ये अ‍ॅनेस्थेशियाचा परिणाम उतरेपर्यंत काही काळ ठेवलं जातं. नंतर मग अतिदक्षता विभागात नेलं जातं. त्यानंतर काही दिवसांनी जनरल वॉर्डमध्ये नेलं जातं. वैद्यकीय कारणांसाठी जरी हे बदल केले जात असले, तरी आजूबाजूच्या या बदलत जाणाऱ्या या वातावरणातले बदल जाणवता येण्याजोगे असावेत, यासाठी या वेगवेगळ्या खोल्यांमधल्या भिंती, पडदे, सोफे आणि इतर वस्तू यांच्या रंगसंगतीत जाणीवपूर्वक बदल करणं गरजेचं असतं.

ऑपरेशन थिएटरमध्ये जास्त रंगसंगतीचा वापर करून उपयोग नाही. तसंच रंगांच्या भडक छटाही असता कामा नयेत. ऑपरेशन करत असताना ऑपरेशन टेबलवर कुठूनही सावली पडता कामा नये म्हणून मल्टीबीम लाइटिंग केलं जातं. त्यामुळे अनेक दिशेने येणाऱ्या प्रकाशाची तीव्रता जास्त असते. अशा वेळी जर भडक रंग असतील, तर रुग्णाच्या तसंच डॉक्टरांच्या आणि परिचारिकांच्याही डोळ्यांवर प्रकाशाचा प्रचंड झोत येऊ शकतो. तो टाळण्याकरता शक्यतो निळ्या रंगासारख्या थंड रंगाचा किंवा न्यूट्रल म्हणजेच स्थितप्रज्ञ रंगांचा वापर करावा. त्यातही निळ्या रंगाचा वापर हा अधिक चांगला. कारण त्यातून अधिक ऊर्जा मिळते. तसंच तो थंड रंग असल्यामुळे जर रुग्णाला संपूर्ण अ‍ॅनेस्थेशिया दिलेला नसेल, तर त्याच्या डोळ्यांना प्रकाशझोत जाणवणार नाही आणि डोळे मिटल्यानंतरही डोळ्यांपुढे मंद -शांतपणा जाणवेल. छायाचित्र १मध्ये दाखवल्याप्रमाणे भिंतीच्या विशेषत खालच्या भागात अधिकच फिक्कट निळ्या रंगाचा वापर केल्यामुळे ऑपरेशन टेबलच्या पातळीवर रंगाचा भडकपणा कमी होईल. पण खोलीच्या वरच्या भागातून नैसर्गिक प्रकाशही येत असल्यामुळे दिवसा केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांना कृत्रिम दिव्यांची आवश्यकता कमी प्रमाणात भासेल. तसंच नैसर्गिक प्रकाशामुळे मनाला प्रसन्नता मिळायलाही मदत होईल.

छायाचित्र २ मध्ये दोन प्रकारच्या रिकव्हरी रूम दाखवल्या आहेत. इथे छायाचित्र २ (अ) मध्ये नैसर्गिक प्रकाशामुळे मिळणाऱ्या मनाला अधिक प्रसन्नता कशी मिळते ते ठाशीवपणे जाणवतं. त्याउलट छायाचित्र २(ब) मधली बंदिस्त रिकव्हरी रूम कदाचित रुग्णाच्या रिकव्हरीसाठी अधिक वेळ घेऊ शकते.

छायाचित्र ३मध्ये अतिदक्षता विभागातली रंगसंगती दिसते आहे. इथे पुन्हा एकदा न्यूट्रल रंगांचा वापर केलेला दिसतो. तजेलदारपणा देणाऱ्या मातकट तांबडय़ा असलेल्या पण मातकट असल्यामुळे स्थितप्रज्ञ या प्रकारात मोडणाऱ्या रंगांचा वापर तजेला आणण्यासाठी केलेला असला, तरी या रंगाचा वापर बेड असलेल्या ठिकाणी करताना पाळायचं पथ्य इथे पाळलं गेलेलं दिसतंय आणि ते म्हणजे हा रंग थेट डोळ्यांवर येऊ नये यासाठी डोक्यामागे त्याचा वापर केलेला दिसतो आहे. बाजूच्या भिंतींसाठी म्हणूनच फिक्कट गुलाबसर रंगाचा वापर केलेला दिसतो. म्हणजे खरंतर तांबडय़ा रंगाच्याच या दोन छटांचा वापर या ठिकाणी केलेला आपल्या दिसतोय.

रुग्णाच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर त्याला सामान्य वॉर्डमध्ये हलवलं जातं. तिथे त्याच्या नातेवाईकांनाही प्रवेशाची परवानगी दिली जाते. रुग्ण अशा तऱ्हेने पुन्हा एकदा एकटेपणातून बाहेर येऊन माणसात येतो. अशा वेळी त्याच्या आशा पल्लवित करणी रंगसंगती त्याच्या अवतीभवती असणं गरजेचं असतं. छायाचित्र ४मध्येही दोन वॉर्ड्स दिसत आहेत. छायाचित्र (अ) मध्ये आहे, मोठय़ांसाठीचा सामान्य वॉर्ड, तर छायाचित्र (ब)मध्ये लहान मुलांसाठीचा वॉर्ड दिसतोय. यात आपल्या प्रामुख्याने दिसतो आहे, तो चतन्यदायी पिवळा आणि टवटवीत हिरवा त्या दोन रंगांचा वापर. शिवाय आणखी एका गोष्टीची काळजी प्रामुख्याने घेतलेली दिसते आहे आणि ती म्हणजे खिडक्यांच्या माध्यमातून भरपूर नैसर्गिक प्रकाश या वॉर्डसमध्ये येईल याची पुरेपूर काळजी घेतली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणजे चतन्य, प्रसन्नता आणि त्यातून मनाला पुन्हा एकदा घरी जाण्यासाठी मिळणारा टवटवीतपणा, यामुळे रुग्णांच्या परिस्थितीत झपाटय़ाने सुधारणा होण्यासाठी मिळणारी मदत!

अशा प्रकारे सुयोग्य रंगसंगती आणि रुग्णाच्या आजूबाजूच्या परिस्थितीत नाइटिंगेलबाईंनी म्हटल्याप्रमाणे होत जाणारे बदल यामुळे पुन्हा एकदा रुग्णाची परिस्थिती सुधारून तो पूर्णपणे बरा होऊन घरी जायला वैद्यकीय उपचारांबरोबरच रंगांचाही हातभार लागतो.

– मनोज अणावकर

anaokarm@yahoo.co.in

(इंटिरियर डिझायनर)

First Published on October 7, 2017 1:06 am

Web Title: articles in marathi on health and colour