सायकल ही आपल्या जीवनातून कधी अलगद दूर फेकली गेली ते कळलंही नाही. मुंबईमध्ये ती फार पूर्वीच बाजूला सारली गेली. मात्र पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसारख्या शहरांतही गेल्या दशकभरात दिसेनाशी झालेली ही सोनेरी दिवसांची सोबती घराघरांत मानाने परतताना दिसते आहे.
गे ल्या आठवडय़ात दोन अतिशय विरोधाभासी अशा घटना कानावर पडल्या. एक म्हणजे मुंबईत झालेली मोनोरेलची सुरुवात आणि नागरिकांनी त्याला दिलेला उदंड प्रतिसाद. आणि दुसरी माझ्या एका जवळच्या मत्रिणीची तक्रार, ‘‘अरे काय सांगू तुला, समीरने रोज शाळेत सायकलवरून जायचा हट्टच धरला आहे. आईकडे तो वीकेण्डचे दोन दिवस अखंड सायकलवरून फिरत असतो. जेवायला आणि झोपायला घरी येतो तेवढाच. आमच्या घरासमोरच्या फ्लायओव्हरवरून सुसाट जाणाऱ्या गाडय़ा पाहिल्या म्हणजे सायकलने शाळेत जायची परवानगी कशी देऊ मी याला?’’
या दोन गोष्टी ऐकताना मला खरंच मनापासून वाटलं की महानगरांच्या विस्तारात, वेगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे खरंच. मात्र या वेगाची किंमत काय असावी हे आपण ठरवतो का? या वेगाच्या वेडापायी आपण घरात, समाजात विषमता पसरवत आहोत, हे आपल्याला कळतं तरी का? या बदलांच्या मुळाशी असलेले प्रश्न प्रवाहासोबत वाहताना कळले नाहीत.
मलादेखील माझ्या पिढीतल्या शाळेतल्या मुलांप्रमाणेच सायकलचं अतिशय वेड होतं. ऐपत नाही म्हणून नव्हे, तर वेगवान पश्चिम द्रुतगती मार्गावर मी सुरक्षित नाही या भीतीपोटी
माझ्या पालकांनी मला स्वत:ची सायकल लहानपणी घेऊन
दिली नाही. त्यावेळी माझ्या सुदैवाने भाडय़ाने सायकल मिळण्याची दुकानं उदंड होती, त्यामुळे सायकल चालवण्याची हौस भागली. पुढे दहावीच्या वेळी मामाने एक सायकल घेऊन दिली. महाविद्यालयात असताना केव्हातरी ती विकून नवी, अत्याधुनिक सायकल घेतली. आणि मग स्वतंत्रपणे पसे मिळवायला लागल्यावर एक महागडी सायकल घेतली. मुबंईत राहतानाही घराजवळची अनेक कामं मी सायकलवरून जाऊन करत असे. मात्र हेदेखील हळूहळू थांबलं आणि ही माझी
सुरेख सायकल गेली काही र्वष चक्क घरात एक शोभेची वस्तू बनून राहिली.
माझ्या मत्रिणीच्या मुलाच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न पुन्हा पडले!
या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली ती माझ्याच सायकलपासून. वापर कमी होत घरीच राहिलेली ही माझी सोबती घरी येणाऱ्या अनेकांचा कुतूहलाचा विषय होत राहते हे लक्षात आलं. घरच्या उपकरणांच्या दुरुस्तीला येणारी माणसं, लहान मुलं, मित्रंमंडळी, सगेसोयरे या सगळ्यांच्या मनात या वाहनाविषयी एक प्रेम, जिव्हाळा वाटतो हे जाणवलं. सायकल वापरणाऱ्या माझ्या मित्रांना विचारलं तर त्यांचा अनुभवही तोच. मुंबईचा माझा एक मित्र त्याची हकीकत सांगताना म्हणाला, ‘‘अरे माझ्या पल्सरपेक्षा माझी हीरोची सायकल मला जास्त कूल बनवते हे माहीत असतं तर दोन-तीन सायकलीच घेतल्या असत्या!’’ त्याच्याच प्रोत्साहनामुळे मी रोज नाही तरी निदान सुटीच्या दिवशी सकाळी सायकलवरून लांबची रपेट मारायला निघायला लागलो.
पुणेकर सायकलवर अधिक शोभतो
ही अशी रपेट मारतानाच ओळख झालेली लक्ष्मीप्रिया हे एक अजबच रसायन आहे. साधारण पंचविशीतली ही पुण्याची मुलगी हट्टाने सायकल वापरते. वाढदिवस, दिवाळी या दिवशी मिळालेल्या पशांची साठवण करून साधारण आठवीत असताना मी माझी पहिली सायकल विकत घेतली. तेव्हापासून मी किराणा दुकानात जाण्यापासून ते शाळा-महाविद्यालयात जाण्याकरता सायकलच वापरते. मधल्या काळात त्यात खंड पडला आणि सायकल फक्त वीकेण्डपुरती मर्यादित झाली.’’ आपल्या नव्या सायकलविषयी सांगताना ती पुढे म्हणते, ‘‘माझ्या मित्राकडून त्याची नवी, इंपोर्टेड सायकल मी विकत घेतली. साधारण सहा महिन्यांपूर्वी. तेव्हापासून मी ठरवून कार्यालयात जाण्यासाठी तिचाच वापर करते. पंधराएक किलोमीटरचं अंतर मी सायकलवरून जाते. सायकलवरून जाण्यात अनेक फायदे आहेत. एकतर शरीरातल्या अनेक स्नायूंचा एरवी बठय़ा जीवनशैलीत वापरच होत नाही त्यांना सायकलमुळे व्यायाम मिळतो. दुसरं म्हणजे मी इंधन वाचवते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी निसर्गाच्या अधिक जवळ जाते. कार्यालयातल्या अनेक सहकाऱ्यांनी माझ्याकडून प्रेरणा घेत सायकल वापरायला सुरुवात केली हा फायदा मोठा आहे.’’ लक्ष्मीप्रिया एक महत्त्वाची अडचण सांगते, ‘‘सायकल चालवताना, चालताना रस्त्यावर मी जणू अदृश्य असते. इतर वाहन चालकांच्या खिजगणतीतही मी नसते. हे फारच चीड आणणारं आहे. विशेषत: एक मुलगी म्हणून तर हा त्रास अधिकच जाणवतो.’’ मात्र या सगळ्यापलीकडे जाऊन लक्ष्मीप्रियाने मांडलेला एक मुद्दा मला फारच महत्त्वाचा आणि मोलाचा वाटला. सायकल लोकप्रिय करण्याकरता जनजागृती, जागोजाग सायकल भाडय़ाने मिळणारी दुकानं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच शाळेत प्रत्येकाला सायकल शिकवणं, खाजगी-सरकारी कंपन्यांनी सायकलवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. कारण इतर खाजगी वाहनांपेक्षा सायकल वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने सभोवतालाशी – निसर्ग, समाज आणि माणसं – यांच्याशी तुम्हाला जोडून ठेवते.’’
खाजगी वाहन आणि सार्वजनिक वाहतूक या दोहोंतले चांगले गुण सायकलमध्ये एकवटलेले दिसतात. खाजगी वाहनाची सोय आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये होणारा सामाजिक संवाद अशी सुरेख गंमत सायकलवरून प्रवास करताना अनुभवायला मिळते. इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याने सायकल खरेदी अगदी गोरगरिबाच्याही आवाक्यात असते. मोठय़ा, अगदी शहराच्या स्केलवर पाहिलं तरी मेट्रो-मोनोसारखे अवाढव्य प्रकल्प बांधण्यापेक्षा सायकलसाठी आणि पादचाऱ्यांकरता राखीव माíगका ठेवणं हे अधिक व्यवहार्य पर्याय ठरतात. हे प्रकल्प राबवले तर नक्कीच अधिकाधिक सामान्य माणसं सायकलसारख्या स्वस्त माध्यमातून खाजगी वाहतुकीचा सोयीचा पर्याय निवडू शकतील. खरी गंमत म्हणजे, इतर कोणत्याही खाजगी वाहनापेक्षा सायकलकरता प्रोत्साहन देत पायाभूत सुविधा उभारल्यास मिळणारे फायदे बहुस्तरीय असतात. इंधन बचत, प्रदूषणात घट होण्यासोबतच रस्त्यावरची गर्दी कमी होते. अधिकाधिक लोक सायकलसारख्या पर्यायांचा वापर करायला लागल्यास सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. साहजिकच अगदी खऱ्या अर्थाने ती एक लोकशाहीवादी वाहन ठरते. घरात सायकल चालवणारी एखादी जरी व्यक्ती असेल तरी सामाजिक जाणीव घरात प्रवेश करते. नव्याने ओळख झालेली जुनीच सायकल संस्कृती अनेक अर्थाने आपल्या घराची नतिक जडणघडणदेखील करते हे विसरून चालणार नाही.
 कल्ट ते कल्चर
पुण्यात आणि कोल्हापुरात यशस्वीपणे ही संस्कृती रुजवण्याची शपथ घेतलेल्यांपकी एक तरुण उद्योजक म्हणजे लाइफसायकल या भव्य सायकल-मॉलचा व्यवस्थापकीय भागीदार नचिकेत जोशी. वडिलांच्या सायकलवेडाचं बाळकडू घेऊन मोठा झालेला नचिकेत रूढार्थाने पुणेकर आणि कोल्हापूरकरांना सायकली, त्यांचे सुटे भाग असं सारं एका चकचकीत, आधुनिक मॉलमध्ये विकतो. मात्र सायकल विकण्याच्या मार्गाने लोकांपर्यंत सायकल-संस्कृती पोहोचवण्याची त्याची धडपड गेल्या काही वर्षांत मूळ धरताना दिसते आहे. ‘‘आमच्याकडून सायकल विकत घेतलेल्या ग्राहकांचे पत्ते, फोन, ई-मेल आम्ही नोंदवून ठेवतो. आम्ही त्यांच्या संपर्कात राहतो. त्यांना आमच्या अनेक कार्यक्रमांची माहिती सातत्याने देतो. सायकल देखभाल आणि दुरुस्तीची वर्कशॉप्स, सायकलविषयी व्याख्यानं, महिन्यातून दर दुसऱ्या-चौथ्या रविवारी सकाळी सायकलवरून शहरात किंवा शहराजवळ छोटय़ा सहली अशा अनेक कार्यक्रमांच्या आयोजनांमधून आम्ही ग्राहकांना सायकल वापरण्याकरता प्रोत्साहित करतो. यासोबतच, लाइफसायकल मॉलने प्रायोजित केलेली, एक सायकलपटूंची टीम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतींतून आता भाग घेते, पारितोषिकं जिंकते आहे.’’ स्वत: उत्तम सायकलपटू असलेला नचिकेत सांगतो, ‘‘आमच्या प्रयत्नांना यश येतं आहे याची पावती म्हणजे आमच्या सायकल सहलींना मिळणारा वाढता प्रतिसाद. गेल्या चार वर्षांत अनेक नव्या लोकांची साथ आम्हाला मिळालेली आहे. अगदी लडाख आणि कोंकण या सायकलवरून केलेल्या सहलींनादेखील उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे.’’
घरभर सायकल
सायकल प्रेमात आकंठ बुडालेल्या माझ्या एका दोस्ताच्या घरी सायकलची अनेक रूपं पाहायला मिळतात. शिवाजी पार्कच्या सेना भवनाच्या कोपऱ्यावर मिळणाऱ्या तारेपासून बनवलेल्या सायकलच्या मॉडेलपासून त्याच्या स्वतच्या एक-दोन नव्हे तर तब्बल तीन सायकलींपर्यंत अनेक गोष्टी त्याच्या घरी पाहायला मिळतात. हौसेला मोल नाही या उक्तीप्रमाणेच त्याच्या तीन सायकलींच्या किमतीच मुळी प्रत्येकी तीसएक हजारांच्या घरात आहेत. तिन्ही सायकली त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या 1इऌङफ्लॅटच्या दिवाणखान्यात ठेवलेल्या असतात. त्यांना इमारतीच्या आवारात, उन्हातान्हात कसं ठेवायचं!!!
त्याच्या घरात जागोजागी सायकल्सची स्केल मॉडेल्स, सायकल सफरींची छायाचित्रं, अनेकविध आकार-प्रकारांची सायकलस्वारांसाठी असलेली हेल्मेट्स आहेत. त्याहीपुढे जाऊन या पठ्ठय़ाने अनेक ठिकाणांहून सायकलच्या विविध भागांपासून बनवलेल्या अनेक वस्तू आहेत. सायकलच्या चेन्सचा कलात्मक वापर करून तयार केलेली पुरुषांसाठीची ब्रेसलेट्स आहेत, गळ्यातल्या चेन्स आहेत. सगळ्यात अफलातून म्हणजे त्याच्या सगळ्यात पहिल्या सायकलच्या चाकाचा वापर करून तयार केलेल्या िभतीवर टांगायचं घडय़ाळ आहे. फोटो फ्रेम्स टांगण्याकरता सायकलच्या ब्रेक-वायरपासून तयार केलेल्या सुबक विणीच्या दोऱ्या आहेत. घरात अनेक ठिकाणी टांगलेल्या फोटो आणि स्केल मॉडेल्ससाठी प्रकाश रचना करण्याकरता सायकलच्या जुन्या दिव्यांचा वापर केलेला आहे. त्याने बनवून घेतलेल्या त्याच्या घरातल्या आरामखुर्चीला सायकलची दोन मोठी आणि दोन छोटी चाकं लावलेली आहेत. त्या चार चाकांवर तोललेली ती खुर्ची घरात कुठेही फिरवता येते – अगदी आळसावलेल्या क्षणांसाठीही त्याच्या सोबतीला सायकल आहेच!
गद्रेकाकांची सायकल
आईबाबांची नोकरी, त्यामुळे आईच्या शाळासोबतीणीकडे मी सांभाळायला असायचो. मोहिनीमावशी आणि गद्रेकाका. त्यांची दोन्ही मुलं मोठी होती, मात्र मला शाळेत सोडण्याकरता गद्रेकाकांनी त्यांची सायकल सज्ज करून घेतली होती. वरच्या दांडय़ावर माझ्याकरता एक छोटी सीट. हँडलला पुढे दप्तर वगरे ठेवण्याकरता छोटी टोपली, माझे पाय ठेवण्याकरता पुढच्या तिरक्या दांडय़ावर दोन बाजूला फोिल्डग पायटय़ांची व्यवस्था आणि मागच्या चाकावर काकांचं सामान मावेल असं कॅरियर. काका स्वत: ऑफिसला जाण्याआधी मला शाळेत सोडायचे. सकाळी त्या सायकलवरून दूध घेऊन येण्याकरता त्यांची रपेट असायची. सायंकाळी आईबाबांनी मला घरी घेऊन जाण्याआधीही कधी त्यांच्यासोबत मी फिरून यायचो. गद्रेकाका आणि ती सायकल बरीचशी माझ्याच दिमतीला असायची!
पुढे केव्हातरी सकाळी सायकलवरून दूध आणायला गेलेले असताना काकांना मोठा अपघात झाला. अनेक दिवस ते इस्पितळात होते. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि कितीतरी महिन्यांनी ते पुन्हा पहिल्यासारखे चालायला लागले. या दरम्यान त्यांची सायकल मात्र कुठेच दिसली नाही. आईबाबांसोबत त्यांना भेटायला जाताना मला सायकलविषयी काहीही न विचारण्याची दटावणी मिळालेली असायचीच, त्यामुळे त्या अपघाताविषयी माझ्या मनात एक विचित्र भीती निर्माण झालेली होती. पुढे कधीच काकांनी सायकल चालवली नाही आणि त्यांची सायकल त्या अपघातामुळेच नाहीशी झाली हे माझ्या मनात पक्क बसलं.
आज मोठं झाल्यावर नेमकेपणाने वाटतं, नव्या पिढीला गद्रेकाका अनुभवायचे असतील तर प्रत्येक घरात निदान एक सायकल तरी असायलाच हवी. प्रत्येक घरात सायकल असली म्हणजे गद्रेकाकांना अपघात करणाऱ्या त्या वाहन चालकाच्या मुजोरीला, त्या मुजोर वृत्तीला आवर बसेल. सायकल चालवण्याला, पायी चालण्याला प्रतिष्ठा मिळेल. सायकल चालवणारे, पायी चालणारेदेखील रस्त्यावर सुरक्षित प्रवास करू शकतील. मी सायकल चालवतो तेव्हा किंवा तुमच्याशी हा संवाद साधतो तेव्हा माझ्या मनात ही सायकल संस्कृती घराघरांत रुजवण्याची, तिला वाढवण्याची तीव्र इच्छा असते. प्रत्येक नव्या सायकलस्वारामध्ये मला ही सोनेरी दिवसांची सोबती दिसते!    ल्ल

     

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..