आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये आपण जल – संवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर लायटिंग, सोलर वॉटर हिटिंग, इ.बद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये आपण बायोगॅस व त्याचे उपयोग याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात.  बायोगॅसची निर्मिती ही सेंद्रिय पदार्थापासून (विशेषत : organic waste) हवाबंद परिस्थितीमध्ये होत असते. बायोगॅस हा अनेक वायूंनी मिळून बनलेला असतो, पण त्यामध्ये मुख्य प्रमाण हे मिथेन (५० ते ७०%) व कार्बन डायऑक्साइड  (३० ते ४०%) या वायूंचे असते. सामान्यत:  बायोगॅस हा फक्त गायी-म्हशींच्या शेणापासून तयार झालेला गोबरगॅसच असतो, असा गरसमज आहे. तर बायोगॅसची निर्मिती शेणाव्यतिरिक्त अन्य सेंद्रिय पदार्थापासूनदेखील होते. उदा.  शिळे/ नासके/ वाया गेलेले अन्न, भाजीपाला, गवत (नेपियर ग्रास ), M. S. W.  (Municipal Solid Waste ) मधील सेंद्रिय भाग,  तेलाची पेंड, तेलबियांचा चोथा, भाताचा कोंडा, गहू/तांदूळ/मका/उस इ. ची चिपाडे, उसाची मळी, प्रेस मड, अन्नप्रक्रिया कारखान्यातील टाकाऊ/उत्सर्जति पदार्थ/घटक, कारखान्यातील सेंद्रिय उत्सर्जति पदार्थ, शेवाळे, जलपर्णी (वॉटर हाय सिंथ), इ. व मानव आणि पशुनिर्मित उत्सर्जति पदार्थ जसे, मल, मूत्र,  मांस, इ. व अशा अनेक सेंद्रिय पदार्थापासून बायोगॅसची निर्मिती होऊ शकते. या व अशा सर्व  प्रकारच्या जैविक अथवा सेंद्रिय पदार्थामध्ये बायोगॅसचे प्रमाण हे कमीजास्त असू शकते. म्हणजे साधारणपणे १ घ. मी. बायोगॅस मिळविण्यासाठी गायी/ म्हशींचे शेण २० ते २५ किलो लागते, परंतु तेवढाच गॅस मिळण्यासाठी शिळे/उरलेले अन्न हे १२ ते १५ किलो लागू शकते. अर्थात, जनावरांचे शेण हे मुबलक प्रमाणात आणि अगदी स्वस्तात मिळू शकते, पण मोठय़ा प्रमाणावर उरलेले/ वाया गेले अन्न मात्र हॉटेल्स, खानावळी, देवस्थाने इथेच मिळू शकते!
बायोगॅसचा उपयोग हा अनेक प्रकारे होऊ शकतो. लहान अथवा मध्यम प्रमाणावर उपलब्ध असलेला बायोगॅस हा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरता येतो. याचा आकार साधारणपणे २ घ. मी.  ते ३०/४० घ. मी. असू शकतो. लहान म्हणजे २ ते ४ घ. मी. आकाराचे बायोगॅस प्लांट म्हणजे मुख्यत्वे  शेतकऱ्यांना अगदी वरदानच आहे! ज्याच्या घरी ३ ते ४ गायी अथवा म्हशी आहेत किंवा जो रोज ४० ते ५० किलो शेण उपलब्ध करू शकतो तेथे २ घ. मी. क्षमतेचा बायोगॅस प्लांट बांधता येतो. यातून मिळणाऱ्या गॅसवर दररोज ४ ते ५ जणांच्या कुटुंबाला पुरेल असा साधारण स्वयंपाक होऊ शकतो! स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरल्याने रॉकेल, एलपीजी सिलेंडर, जळाऊ लाकूड, इ.ची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊन त्यावरील खर्च वाचतो. तसेच, लाकूड, रॉकेल वापरून होणाऱ्या धुरापासून सुटका होऊन कुटुंबातील स्त्रियांचे आरोग्य चांगले राहते!
बायोगॅसचा दुसरा मुख्य उपयोग म्हणजे वीजनिर्मिती. मध्यम ते मोठय़ा प्रमाणावर (४० घ. मी. ते पुढे कितीही) उपलब्ध असलेल्या बायोगॅसवर तितक्याच प्रमाणात वीजनिर्मिती होऊ शकते. मग ही वीजनिर्मिती रोज ३० ते ४० युनिट्सपासून काही मेगावॅट्सपर्यंत असू शकते!
बायोगॅसचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे औद्योगिक वापरासाठी व बॉयलरमध्ये इंधन म्हणून जाळण्यासाठी! या प्रकारच्या ज्वलनामुळे पारंपरिक इंधनाची उदा. फन्रेस ऑइल, डीझेल, सीएनजी, एलपीजी, लाकूड, इ.ची मोठय़ा प्रमाणावर बचत होऊन परकीय चलन वाचते, तसेच निसर्ग संवर्धनासदेखील हातभार लागतो!
बायोगॅसचा अजून एक महत्त्चाचा उपयोग म्हणजे तो शुद्ध करून, त्यातील  मिथेन  व्यतिरिक्त इतर सर्व वायू काढून त्याचा सीएनजीप्रमाणे वापर करणे. या प्रकारच्या बायो सीएनजीमध्ये ९४ ते ९७% शुद्ध मिथेन असतो. हा बायो सीएनजी सिलेंडरमध्ये भरला जात असल्याने जिथे गरज असेल तिथे हे सिलेंडर नेऊन स्वयंपाकाच्या इंधनासाठी किंवा वीजनिर्मितीसाठी त्याचा उपयोग करता येतो. तसेच हा बायो सीएनजी वाहनांमध्ये इंधन म्हणूनदेखील वापरता येतो. परदेशांत, मुख्यत: युरोपियन देशांत अनेक ठिकाणी वाहनांसाठी, बसेस, मोटार गाडय़ा, इ. साठी अशा बायो सीएनजीचा वापर करतात. आपल्याकडेदेखील यावर विचार चालू आहे व लवकरच तो वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरला जाण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
बायोगॅसच्या अशा इंधन म्हणून होणाऱ्या उपायोगाव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे बायोगॅस प्लांटमधून मिळणारे सेंद्रिय खत! कोणतेही सेंद्रिय पदार्थ बायोगॅस प्लांटमध्ये टाकल्यावर त्यातून बायोगॅस काढून घेतल्यावर प्लांटमधून बाहेर पडणारी द्रवायुक्त राड
(slurrey) ही एक उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत असते. हे खत आहे तसेच किंवा त्यामध्ये अन्य काही घटक मिसळून ते शेती, बागा, झाडांसाठी खत म्हणून वापरता येते!
बायोगॅस प्लांटचा उपयोग हा शहरी, निमशहरी भागात फारसा होऊ शकत नसला तरी मोठय़ा सोसायटय़ा, हॉटेल्स, खानावळी, मंगल कार्यालये, कंपनी कॅन्टीन इ. ठिकाणी होऊ शकतो. या ठिकाणी वाया जाणाऱ्या जैविक/सेंद्रिय पदार्थाचा उपयोग करून मिळणारा बायोगॅस  शक्यतो अन्न शिजविण्यासाठी इंधन म्हणून वापरता येतो. तसेच प्लांटमधून मिळणारी स्लरी ही परिसरातील झाडांना, बागेला खत म्हणून वापरता येते व कचरा निर्मूलनाच्या समस्येवर काही प्रमाणात तोडगा निघू शकतो! अशा शहरी भागातील सोसायटय़ा, कंपनी कॅन्टीन किंवा हॉटेल्ससाठी बाजारामध्ये २ घ. मी. क्षमतेचे तयार बयोगॅस प्लांट्सही मिळतात. त्यांची किंमत साधारणपणे २५ ते ३५ हजारांपर्यंत असते. अर्थात, वाहतूक, प्लांट बसविणे, तो चालू करणे (installation & commissioning) इ. चा खर्च वेगळा असतो.
बायोगॅस प्लांट बांधताना आणि नंतर तो वापरताना  बऱ्याच प्रमाणात काळजी घ्यावी लागते. प्लांट बांधताना योग्य त्या डिझाइनप्रमाणे तो बांधणे जरुरीचे आहे. त्याकरिता त्यातील अनुभवी व्यावसायिकांचीच  मदत घ्यावी. तसेच  योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या प्रकारचे सेंद्रिय पदार्थ प्लांटमध्ये टाकणे, त्यावर देखरेख ठेवणे, तो प्लांट व्यवस्थित चालविणे (operation & maintenance) इ. साठी प्लांटच्या क्षमतेप्रमाणे कुशल तसेच अकुशल कामगारांची त्यास जरुरी असते.
शासनाकडून बायोगॅस प्लांटसाठी काही प्रमाणात अनुदान मिळते. घरगुती वापरासाठीच्या तसेच औद्योगिक प्लांटसाठी काही हजार रुपयांपासून ते दोन कोटी रुपयांपर्यंत सरकारी अनुदान मिळू शकते. याबद्दलची अधिक माहिती जिल्हा परिषद/पंचायत समिती कार्यालय येथे मिळू शकेल. तसेच काही शासकीय संकेतस्थळे जसे www.mnre.gov.in  किंवा www.mahaurja.com वर  माहिती मिळू शकेल.

What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला