News Flash

मुंबईची वास्तुप्रकृती

गेल्या शंभर वर्षांत मुंबईकरांच्या राहणीमानात आणि गृहरचनेत बदल घडले. कोळी समाजाच्या झावळीच्या घरांपासून नारळी-पोफळीच्या वाडय़ा मुंबईनं पाहिल्या.

| June 21, 2014 01:01 am

गेल्या शंभर वर्षांत मुंबईकरांच्या राहणीमानात आणि गृहरचनेत बदल घडले. कोळी समाजाच्या झावळीच्या घरांपासून नारळी-पोफळीच्या वाडय़ा मुंबईनं पाहिल्या. त्यातल्या वाडी या शब्दाचा उपयोग आंग्रेवाडी, झावबाची वाडी, खोताची वाडी असा झाला त्या सगळ्या चाळी. मुंबई म्हणजे चाळींचं गाव. चाळींच्या रचनेत लाकूड-विटांचा वापर होता. कापड गिरण्यांच्या गिरणगावातही चाळी अवतरल्या. गावाकडच्या घरांपेक्षा वेगळ्या गृहरचनेत राहावं लागल्यानं जीवनशैलीत बदल घडला. अनेक वर्षांनंतर घरातली माणसं वाढली. चाळीमध्ये गर्दी झाली. बरेच लोक खोलीतल्या तीन बाय तीनच्या मोरीतल्या आंघोळीला कंटाळले होते. तसेच चाळीच्या चौकस स्वभावाला कंटाळले होते. २०११ च्या शिरगणतीत मागच्या दहा वर्षांपेक्षा सात बेटांवरच्या मुंबईतली दोन लाख माणसं कमी झालेली आढळली. ते सगळे चाळकरी उपनगरांत गेले असतील. त्यांना आरोग्यदायी स्वतंत्र बाथरूम, चकचकीत शौचालय हवे होते. स्वतंत्र आणि प्रायव्हसी असलेलं जीवन जगायला हवं होतं. पण त्यात सहजीवनाचा चाळीतला आनंद दुरावला. आíकटेक्ट लोकांना त्या सद्गुणाचा समावेश अपार्टमेंटच्या रचनेत करायला जमला नाही.
चाळ ही मुंबईची वास्तू ओळख होती. १९११ साली ग्रँट रोडजवळची पन्नालाल चाळ ही विशाल चौक असलेल्या चाळीचं गुजराती शैलीचं उदाहरण. गुजरातेत खडकी नावाचा गृहसमूहाचा प्रकार आहे. त्याला भक्कम िदडी दरवाजा असतो तसं मुंबईतल्या काही चाळीत आढळतं. रात्री दरवाजा बंद केला की चाळीच्या आतल्या भागात कोणी भुरटा शिरू शकत नसे.
तसं एलफिन्स्टन रोडला धनमिल कंपाऊंडजवळच्या अंदाजे साडेतीनशे फूट असलेल्या लांब चाळीचं मुंबईचं मोकळ्या शैलीचं उदाहरण. अशा शतकी चाळींची आधुनिक पद्धतीनं डागडुजी केली तर त्यांचं आयुष्यमान नक्की वाढेल. त्या पाडून नव्यानं बांधण्यात जास्त खर्च होईल. शिवाय माहोल अपरिचित होईल ते वेगळंच!
घराला खोली म्हणायचं कोणी ठरवलं ते माहीत नाही, पण तो शब्द मुंबईनं जन्माला घातला. एका पिढीपर्यंत चाळीचाळींत लोक मजेत राहिले, पण चाळ जीवनाचं सामाजिक वर्णन फारच झालं. पण एका कुटुंबाचं घर या दृष्टिकोनातून कधी कोणी केलं नाही. ज्यांनी ते रोमँटिक पद्धतीनं रंगवलं ते त्यांनी चाळ सोडून गेल्यावर लिहिलं.  चाळ जीवनानंतर लोकांनी अपार्टमेंटला आपलंसं केलं.
फोर्ट, बॅलार्ड इस्टेट हे विभाग सुंदर दगडी  इमारतींनी सजले. मालाड, कुर्ला या भागात उत्तम दगड मिळत असल्याने त्याचा उपयोग सार्वजनिक बांधकामात सुरू झाला. मुंबई विद्यापीठ तसेच छत्रपती शिवाजी टर्मिनस यांसारख्या पिवळ्या दगडाच्या इमारती, तर चर्चगेट स्टेशनशेजारी असलेल्या पश्चिम रेल्वेची तसेच बॅलॉर्ड इस्टेट येथील काळ्या दगडाच्या वास्तू. राज्य इंग्रजांचं असल्याने अनेक इंग्रज वास्तुशिल्पी अभियंते भारतात आले. त्यांना मुंबईत आणि इतरत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी दगड वापरून चाळीही बांधल्या.
१९३० नंतर वास्तुनिर्मितीचा नवा प्रकार मुंबईत लोकप्रिय झाला. जे जे नवं ते अंगीकारणं हा मुंबईकरांचा स्वभाव. त्यानुसार आर्ट डेको ही शैली मुंबईत आली. पश्चिमेत जन्माला आलेल्या वास्तुप्रकारानं मुंबईवर जादू केली. जो तो त्या शैलीच्या इमारती पसंत करू लागला. रीगल सिनेमा, मेट्रो, न्यू एम्पायर ही सिनेमागृहं आणि मरीन ड्राइव्हला गोंडस रूप देणारी घरं या ‘आर्ट डेको’ शैलीतल्या वास्तू. ती शैली इतकी लोकप्रिय झाली की गुजरातेतल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे राजवाडे त्या शैलीत बनवून घेतले.
एकोणीसशे चाळीसनंतर ती शैली मागे पडली. सिमेंट कॉन्क्रीटचा जन्म होऊन बराच काळ लोटला होता. आणि त्यानंतर युरोपात त्याच सुमारास जन्माला आलेल्या आधुनिक वास्तुकलेच्या शैलीचं मुंबईत आगमन झालं. चर्चगेटजवळची स्टॅनव्हॅक किंवा जीवन बीमा निगमची गोलाकार इमारत किंवा अनेक तारांकित हॉटेलं या नव्या शैलीची उदाहरणं. भारतीय वास्तुकलावंतांनी जन्माला घातलेली एकही शैली प्रचलित झाल्याचे उदाहरण सापडत नाही. चाळ ही शेवटची भारतीय शैली होती.
नाटकाचा प्रयोग उभा करण्यासाठी जशी अनेकांची मदत लागते तशी इमारत बांधणीसाठी सुतार, प्लम्बर, सळया बांधणारे, प्लास्टर करणारे, टाक्या बनवणारे अशा अनेक क्षेत्रांतल्या पारंगतांची मदत लागते. या तीस-चाळीस कसबी कारागिरांच्या कामात जराशी चूक झाली तर संपूर्ण इमारतीवर पाणी फिरतं.
नव्या रचना करण्यासाठी चांगल्या कॉन्ट्रॅक्टरची गरज असते. अनेक कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल इंजिनीअरांनी मुंबईत नाव कमावलं. सगळ्यांना मुंबईनं संधी दिली. मुंबई हुशारीची कदर करणारं आणि त्यासाठी मोबदला चुकवणारं शहर आहे, याचा अनुभव अनेक कलावंतांनी घेतला आहे. इंग्लंड-अमेरिकेतील नामांकित विद्यापीठांतून शिक्षण घेऊन मुंबईत आलेल्यांनी मुंबईचं दृश्यचित्र पालटवून टाकलं. त्यांच्यामुळे आधुनिक शैली प्रचलित झाली. कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करावा, याबाबतीत जपान सोडला तर मुंबईच्या आíकटेक्ट आणि कारागीरांचा हात कोणी धरू शकेलसं वाटत नाही.
  गेल्या काही वर्षांपासून मुंबईकर उंच इमारती बांधल्या जात असताना पाहताहेत. काही पूर्ण झाल्यात. काहींचे सांगाडे हिरवी आलवणं नेसून उभ्या आहेत. काहींना काचा बसवून झाल्यात, काहींना बसवणं चालू आहे. काही ठिकाणी बाल्कन्यांमध्ये वर्दळ दिसते. बाल्कनीत लुगडी वाळत घालण्याची प्रथा बंद झाल्यानं दिवसा किती घरात लोक राहायला आलेत ते कळत नाही. रात्री घराघरांत दिवे लागले की कळतं की किती घरांचा लोकांनी ताबा घेतला आहे. उंच इमारतींच्या पायथ्याशी तीनमजली चाळी आहेत. तिथे गॅलरीत कपडे बाहेर वाळत असतात. काही गगनचुंबी इमारती पाश्चात्य आíकटेक्टकडून डिझाईन करवून घेतल्यात. त्या सदनिका लोकप्रिय होतील याची खात्री नाही. कारण त्यांना भारतीय जीवनशैलीचा परिचय नसतो. चार-पाच कोटी खर्चून अपरिचित वातावरणात राहावं लागलं तर लोक कसा प्रतिसाद देतील ते पाच-दहा वर्षांत कळेल.
गेल्या शंभर वर्षांत अनेक चांगल्या वास्तूंची निर्मिती झाली आहे, पण शिकागो स्कूलसारखी एखादी शैली मुंबईत जन्माला आली नाही. शिवाय गृहनिर्मिती बिल्डरांच्या हाती गेली आहे तेव्हापासून आíकटेक्टचं काम सॉलिसिटर किंवा इंटेरियर डिझायनरपेक्षा खालच्या पायरीवर आलं आहे. उद्या काय होतं ते पाहायचं. नवी शैली जन्माला आली तर मुंबईची वास्तुप्रकृती सुधारल्याचा आनंद होईल.                                      
prakashpethe@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2014 1:01 am

Web Title: changing architect in mumbai
टॅग : Building,Flat
Next Stories
1 सबकुछ फोल्डिंग आणि स्लायडिंग…
2 घर शोधण्याच्या खाणाखुणा
3 घर घ्यायचे ते प्रकल्पाचा आराखडा बघूनच!
Just Now!
X