मुंबईची खरी ओळख म्हणाल तर इतिहासात जमा झालेल्या कापड गिरण्या आणि दाटीवाटीने उभ्या असलेल्या चाळी, वाडय़ा, गल्ल्या! विशष म्हणजे यामधूनच खऱ्या अर्थाने संस्कार आणि संस्कृतीची बीजे रोवली गेली आणि जगण्यातील खरा आनंद उपभोगावयास मिळाला. परिवर्तन आणि बदललेल्या जीवनशैलीतून तसेच कापड गिरण्यांच्या संपातून मुंबईत खऱ्या अर्थाने क्रांतीला सुरुवात झाली. आजमितीस अनेक जीर्ण चाळी आणि कापड गिरण्यांच्या जागी उभे राहिलेले टोलेजंग टॉवर्स त्यामुळे आमूलाग्र बदल घडत गेला. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या चाळ संस्कृतीच्या जागेवर टॉवर्स उभे राहिले आणि मग चाळ नावाच्या जिवंत वस्तीने मुंबईतून काढता पाय घेतला. आज दक्षिण मुंबईतील गिरगाव, लालबाग, परळ, दादर येथे काही मोजक्या चाळी उरल्या असून, त्यासुद्धा पुनर्विकासाच्या प्रक्रियेत आहेत. यामधील बहुतांशी लोकांनी उपनगरांतून अथवा कोकणातून राहण्यातच धन्यता मानली. दहा बाय दहाच्या खोलीत चाळीतील शेअरिंग, परस्परांवरचे अवलंबित्व यामुळे वाढणारी भावनिक नाती उलटपक्षी सोसायटी व टॉवर्स संस्कृतीमधील आत्मकेंद्रीवृत्ती यांची सांगड घालणे आजही कठीण होतेय. कारण हे संस्कार चाळ संस्कृती आणि उत्सवाच्या माध्यमातून रुजले गेले आहेत. याला काही अंशी चाळीची वास्तुरचनाही कारणीभूत आहे. चाळीतील जिने, समोरील मोकळे अंगण, कॉमन खोल्यांपुढील गॅलरी, सार्वजनिक शौचालये येथेच खऱ्या अर्थाने भाषा, संस्कृती, उत्सव राजकारण आदी क्षेत्राच्या माध्यमातून जगण्याला दिशा मिळाली. रहिवाशांची आर्थिक परिस्थिती यथातथा असतानासुद्धा सत्यनारायणाची महापूजा, गोकुळअष्टमी, गणपती, कोजागिरी पौर्णिमासारखे सर्व सण-उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जात. आजही काही चाळी असेच उत्सव साजरे करत आहेत. महिन्याकाठी विशिष्ट वर्गणी निश्चित करून, काही दानशूर व्यक्तींची मदत घेऊन हे उत्सव पार पाडले जात. तेव्हा स्पॉन्सर, इव्हेंट, सेलिब्रेटी असे प्रकार नव्हते. जमा झालेल्या पैशातून योग्य त्या प्रकारे खर्चाचे नियोजन, अपार मेहनत, टीमवर्क, निर्णयक्षमता, जनसंपर्क, उत्सवाचे नियोजन आणि ताळेबंद जमा-खर्चाचा हिशेब सूचना फलकांवर लावला जाई. पण या सर्व गोष्टींसाठी कोणाकडे एमबीएची पदवी नव्हती. चाळीच्या पटांगणात सभा घेऊन प्रत्येकावर विशिष्ट जबाबदारी सोपवून, जिन्यावर बसून सजावटीचे आराखडे तयार करणे, टीम वर्कच्या माध्यमातून गणपतीसाठी मांडव घालणे, रात्री जागरण करून खोल्यांपुढील सामायिक गॅलरीत झोपणे अशी कामं होतं.
सकाळी उठण्यासाठी अलार्मची गरज नसे. नळाला पाणी आले, भांडय़ांचे आवाज सुरू झाले की उठवायचे हा गणपतीमधील दहा दिवस नित्यक्रम असे. अगदी कुटुंबातील बारशापासून ते मंगळागौरीपर्यंत एकमेकांशी सहकार्याने आणि परोपकाराने वागावयाचे. चाळीच्या या उत्सवी वातावरणामुळे खरे तर जगायला शिकवले. कुटुंबाप्रमाणे उत्सव हासुद्धा चाळीचा अविभाज्य भाग होता. इतकेच नव्हे तर जगण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा त्यातून मिळत असे. जीर्ण झालेल्या चाळी, बदललेली जीवनशैली यामुळे चाळीचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले हे जरी खरे असले, तरी पुढील पिढीला आठवणींच्या माध्यमातून ओळख देणे आपले सर्वाचे कर्तव्य आहे. आजची तरुण पिढी स्मार्ट व प्रगल्भ आहे. चाळीतून बाहेर पडून करिअरमध्ये स्थिरावलेली किंबहुना महत्त्वाकांक्षेबद्दल अधिक जागृत असलेले चाळी संदर्भातील विषय चवीचवीने ‘ब्लॉगवर आणि सोशल नेटवर्किंग साइटवर’ कथन करत असते. आपली चाळ ‘गुगल अर्थ’ पुन: पुन्हा सर्च करून कुठल्या टॉवर्सच्या ठिकाणी आपली चाळ होती ते पडताळून पाहतात आणि मग फेसबुक, आर्कुटवर कम्युनिटी बनवून उत्सवासंदर्भात चॅटिंग करतात. ते आता व्हच्र्युअल जगतात चाळ अनुभवणे जास्त पसंत करतात, पण राहाणे पसंत करत नाहीत. कारण ते वास्तवाला धरून नाही. आज मराठी, गुजराती, व्यापारी वर्ग, चाळीत राहात नसले तरी त्यांचे मूळ हे कुठल्या ना कुठल्या तरी चाळीत रुजलेले आहे. इतकेच काय, पण आजही कित्येकजण गोकुळ अष्टमी, गणपती या सणांच्या दरम्यान चाळीतच मुक्कामी असतात. कारण त्या चाळीतील उत्सवांनीच नाती, सहकार्य यांची शिकवण दिलेली असते. आज चाळींचा अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आहे. पुनर्विकासाच्या माध्यमातून व शासनाच्या धोरणातून चाळीच्या जागी उंच उंच टॉवर्स उभे राहू लागले आहेत. प्राइम लोकेशनमधील सेल्फकंटेंड वास्तवाबद्दल सर्वानाच आकर्षण आहे, याबाबत दुमत नाही. कारण सध्याच्या धावपळीच्या आणि ताण-तणावाच्या जीवनात स्वत:चे थोडेफार ऐसपैस घर असावे हे स्वाभाविकच आहे. पण जुन्या वास्तूंमधून मिळालेली शिकवण, संस्कार, जोपासावयाचे हे सर्वाचे कर्तव्य आहे. त्यासाठी चाळीच्या सार्वजनिक, सांस्कृतिक जागा नाहीशा होणार नाहीत, हे जरी स्पष्ट असले तरी त्याबाबत चाळकऱ्यांनी र्सवकष विचार करून जीवनमानाच्या गरजा उत्सवाच्या माध्यमातून जगण्यात मिळालेली ऊर्जा त्याबद्दलच्या अपेक्षा सरकार आणि विकासक यांच्यापुढे नीट मांडाव्यात. चाळीचे अस्तित्व संपले तरी उत्सवाच्या माध्यमातून तिने दिलेली डागण्याची शिकवण टॉवर्सच्या माध्यमातून अबाधित राहील, याचा विचार करणे आवश्यक आहे.