News Flash

रंगांच्या रांगोळीत वास्तूचे सौंदर्य

मेकओव्हरचं स्वागत करण्यासाठीच जणू  उत्सवाचं आयोजन असतं.

नुकतंच पाय फुटलेलं लहानगं मनसोक्त बागेत खेळून मातीत मस्त ‘रंगून’ जातं, ‘आला वसंत देही मज ठाऊकचि नाही’ असं गुणगुणताना युवतीच्या गालावर लज्जेचा ‘रंग’ चढतो. चार मैत्रिणी एकत्र आल्या की गप्पांना अगदी रंग चढतो. गाण्याच्या मैफलीत उत्तरोत्तर ‘रंग’ चढत जातो. असं खऱ्या रंगांशिवायही आपलं जीवन रंगत असतं. मग प्रत्यक्ष समोर रंग असतील तर निसर्गात रंगपंचमी  सतत सुरू असते. पानांचा हिरवा रंग, आकाशाचा निळा रंग, सूर्याचा लाल रंग, उन्हाचा सोनपिवळा रंग, रात्रीचा काळा रंग, चंद्र-चांदण्यांचा रुपेरी रंग, फुलांचे नजर ठरत नाही असे रंग, कच्च्या पिकलेल्या फळांचे रंग, सगळी रंगांची दुनिया. ऋतूंमधील संधिकाळात या रंगबदलाचं, मेकओव्हरचं स्वागत करण्यासाठीच जणू  उत्सवाचं आयोजन असतं.

चैत्रातील उन्हाळ्याच्या सुरुवातीचे रामाचे नवरात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला ज्येष्ठातील दशहरा, हिवाळ्याच्या प्रारंभी येणारे शारदीय नवरात्र. गणरायाला निरोप देण्याची लगबग संपवून पितरांना तृप्त करण्याचं महत्त्वाचं काम उरकेपर्यंत अश्विन सोनेरी पावलांनी हजर होतो. जगदंबेच्या स्वागतासाठी रंगांची दुनिया सज्ज होते. नवरात्र आता अगदी दारात येऊन ठेपलंय. त्या आदिशक्तीला प्रसन्न करून घेण्यासाठी रंगतरंग हवेतच. आणि तेही अगदी प्रवेशद्वाराजवळ, उंबरठय़ाबाहेर. म्हणजेच दारात रंगसंगतीने उठावदार दिसणारी रांगोळी हवी. तीही सुबक, आटोपशीर अन् चित्ताकर्षक.

बारंगावरून अंतरंगाची ओळख करून देणारी, वास्तूंचे सौंदर्य द्विगुणित करणारी. ‘क्षणभर’ पावलांना थांबायला भाग पाडणारी.. त्यात रोज रंगबदल हवा. ‘रंगांच्या’ रांगोळीत हरवले, असं दारात पाऊल टाकताक्षणी येणाऱ्याला वाटायला हवं. त्यासाठी या रंगरेषातून सौंदर्य निर्माण करणाऱ्या मनमोहक रांगोळ्या. फक्त एखाद्याच्या दारांतच कशाला? सगळ्यांच्याच दारांत ही रांगोळी रंगू दे ना! काहींना बघण्याचा आनंद, काहींना बघून काढण्याचा आनंद, काहींना भूतकाळाची दारं किलकिली होण्याचा पुन:प्रत्ययाचा आनंद तर काहींना या रंगीत आठवणी जपून ठेवण्याचा आनंद.

यातला पिवळा रंग संपन्नता, आध्यात्मिक प्रवृत्ती, प्रगतिशीलतेचा द्योतक, शरीरात नसला तरी सूर्यापासून हळदीपर्यंत ‘तेज’ झळकवणारा. करडा रंग शरीरातील ताकद आणि संचित ऊर्जेच्या आराधनेचं प्रतीक, जणू पावसाळ्यातील पाणी भरलेला ढगच. शेंदरी रंग शौर्य, धैर्य, उत्तर आचारसंहिता मिरवत दबदबा निर्माण करणारा. शुचिता, स्वच्छता, सरळपणा, पवित्रता, प्रसन्नतेचा शिडकावा करणारा पांढरा रंग म्हणजे आरोग्याचा कॅन्व्हासच! लाल रंग रक्ताचा, कुंकवाचा, भीतीदायक, धोक्याचा कंदील पुढे करणारा, तरी जीवनदायी. निळा रंग आकाशाचा, प्रकाशाचा, मनाची शीतलता, स्निग्धता आणि धीरगंभीर वृत्ती दाखवणारा, जांभळा रंग गांभीर्याचं कोंदण लाभलेला. प्रेमाचा रंग गुलाबी, तो गालावर, जिभेवर, त्वचेवर, नखांवर दिसणं हे भाग्याचं, आरोग्याचं लक्षण. सगळे रंग मिळून शुभ्रतेला जन्म देतात. अशी शुभ्र वस्त्रांकिता रंगतरंगांची निर्माती, दुष्टांना धाकात ठेवणारी, भक्तांना अभय देणारी जगन्माता. तिच्या सन्मानार्थच ‘या नवनवलनयनोत्सवाचे’ आयोजन.

सुचित्रा साठे

सर्व रंगावली- रोहिणी दळवी

suchitrasathe52@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 2:15 am

Web Title: easy and quick rangoli design
Next Stories
1 खिडकी
2 गृहनिर्माण संस्थेकडून हवी ती कागदपत्रे कशी मिळवाल?
3 आठवणीतील भाडेकरू
Just Now!
X