आमचे घर बांधून झाले तेव्हा बाबांना कृतकृत्य वाटले. बाबांनी एक छानशी गणपतीची टाइल आणली आणि गवंडय़ाकडून मुख्य दाराच्या वर पूर्वाभिमुख लावून घेतली. त्याला हार घातला. गवंडी घुटमळत होता. आईच्या ते लक्षात आले. तिने आत जाऊ न दक्षिणा आणली आणि गवंडय़ाला दिली. त्याला नमस्कार केला. अशा गोष्टी अंधश्रद्धेच्या नि पैसे उकळण्याच्या असल्या तरी ‘त्यात सद्भावनेचा भाग असतो,’ असे आई म्हणाली आणि तिने दाराला तोरण लावले. त्या तोरणावरही मध्यभागी गणराय विराजमान होतेच!
‘चला, यजमान कुठे आहेत? भूमीपूजनास प्रारंभ करू. गणपतीचे प्रतीक म्हणून ही सुपारी ठेवा विडय़ाच्या पानावर. कार्यारंभी आधी आपण विघ्नहर्त्यां गणेशाची षोडशोपचाराने पूजा करू.. ‘वक्रतुंड महाकायऽऽ सूर्यकोटि समप्रभ.. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदाऽऽऽ’.. पळीभर पाणी सोडा..’ गुरुजी त्यांच्या त्या खास अनुनासिक स्वरात पौरोहित्य करीत होते. यजमान असणारे आमचे बाबा लाल रंगाचे सोवळे नेसून गुरुजींच्या सूचनांनुसार सश्रद्ध यथासांग पूजाविधी करीत होते. आई शेजारी होती. आम्ही भावंडे आणि मोजके नातलग व शेजारी तो सारा कार्यक्रम भारावून बघत होतो. भूमीपूजन झाले आणि सर्वाना प्रसाद वाटण्यात आला. दादाने तिथे पडलेल्या एका मोठय़ा दगडावर नारळ फोडला. माझ्या डोक्यावर टप्पल मारत गुरुजी म्हणाले, ‘ए चिमणे, तू सर्वात लहान ना? मग आता तुझ्यापासूनच सुरुवात करू भूमी खणायला..’
मी बावरलेच. मी चौथ्या यत्तेत होते त्या वेळी. गुरुजींनी माझ्या चिमुकल्या हातात भली मोठी कुदळ दिली. त्या कुदळीच्या वजनाने मी हातभर जीभ बाहेर काढली. मी आईकडे काकुळतीने बघितले. मग आईने आणि मी मिळून भूमीवर कुदळीचे घाव घातले. सर्वानी माझे कौतुक करीत टाळ्या वाजवल्या. मग माझ्या ताईने, दादाने, बाबांनी आणि सगळ्याच नातेवाईकांनी कुदळीचे प्रतीकात्मक घाव घातले आणि भूमीला वंदन केले. पुण्यात बाबांनी घेतलेल्या भूमीचे पूजन पार पडले.
‘गणेशकृपेने सारे काही निर्विघ्न पार पडले. आता बांधकाम करायला हरकत नाही,’ गुरुजी बाबांना म्हणाले.
‘निर्विघ्न? म्हणजे काय?’ मी विचारले. तेव्हा माझा गालगुच्चा घेत गुरुजी म्हणाले, ‘निर्विघ्न म्हणजे, विघ्न न येता. विघ्न म्हणजे संकट. कळलं?’ मी हसून मान डोलावली, पण लगेच विचारले, ‘..आणि ‘गणेशकृपा’ म्हणजे काय?’ बाबांकडे बघत गुरुजी हसू लागले. म्हणाले, ‘पोरगी अगदी ‘शंकासुरी’ आहे बरें! पण सांगतो हो.. ऐक..’ असे म्हणत त्यांनी मला त्या भूमीवरल्या एका खडकावर बसवले आणि ‘घर आणि गणपती’ या विषयावर भले मोठ्ठे व्याख्यान दिले. गणपती आणि घर यांचे नाते किती गहिरे असते, हे मला बालपणीच समजले आणि उमजलेही.
गणपती म्हणून पुजलेल्या विडय़ाच्या पानावरील सुपारीला मी ‘टाटा’ केला आणि आम्ही आमच्या गावी भाडय़ाच्या घरी परतलो.
घरी आल्यावर आज्जीने पाय धुऊन देवापुढे नंदादीप लावला आणि हात जोडून ती म्हणू लागली, ‘मोरया मोरया, मी बाळ तान्हे.. तुझीच सेवा करू काय जाणे.. अन्याय माझे कोटय़ान कोटी.. मोरेश्वरा बा, तू घाल पोटी..’
मला गंमत वाटली. घरात मी शेंडेफळ असल्याने मीच ‘बाळ’ या सदरात मोडत होते. आजी घरातली सर्वात मोठी व्यक्ती असूनही ती स्वत:ला ‘मी बाळ तान्हे’ असे कसे म्हणू शकते, याचे आश्चर्य-गंमत वाटली. तिने कुठले कोटय़वधी अन्याय केलेत? नि कुणावर? मला काही समजेना. बरे, तिला काही विचारावं, तर तिच्याकडून तिनेच केलेल्या कोटय़वधी अन्यायांची ती कबुली देईल, याची काही खात्री नव्हती. कारण तिला देवाधर्माबद्दल उलटसुलट प्रश्न विचारलेले आवडत नसत. ‘असे ‘शास्त्र’ सांगते, नास्तिकांना काय कळणार?’ असे म्हणून ती आम्हाला गप्प करीत असे. तिचे ते ‘शास्त्र’ म्हणजे विज्ञान किंवा सायन्स नव्हे, हे मला मोठी झाल्यावर कळले. आणि ‘नास्तिक’ म्हणजे काय? असे विचारल्यावर दादाने माझ्या हातात अवजड शब्दकोशच ठेवला..!
आज्जी जरी स्वत:ला तान्हे बाळ समजत असली, तरी मला मात्र गणपतीच एखाद्या छोटय़ा बाळासारखा भासत असे. मला बालपणी तो माझ्या एखाद्या गुटगुटीत खटय़ाळ मित्रासारखाच भासे. आज्जीसोबत हात जोडून आम्ही बाळबोध चालीमध्ये म्हणायचो- ‘गणपती तुझे नाव चांगले.. आवडी बहु चित्त रंगले.. प्रार्थना तुझी गौरीनंदना.. हे दयानिधे श्रीगजानना..’ किती सोप्पे, छान वर्णन आहे हे. रामदास स्वामींनी लिहिलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची..’ ही आरती तिचा अर्थ माहीत नसताना घरी म्हटली जात असल्याने बालपणीच ऐकून ऐकून पाठ झाली. त्यात ‘संकटी पावावे’ असे शब्द आहेत, ‘संकष्टी पावावे’ असे नाही, बाबा आवर्जून चुकीची दुरुस्ती करायचे. ‘दास रामाचा वाट पाहे सजणा..’मुळे कवीचे नाव रामदास स्वामी आहे हे कवयित्री असलेली आई मला सांगायची.
आईच्या काव्यप्रेमामुळे मलाही बालपणीच कवितेचा छंद जडला. गणेशाकडे बघून मला बालपणी काही ओळी सुचल्या. म्हणजे शब्दश: बालकविताच ती. त्या ओळी अशा होत्या-
‘मनुष्याचे शरीर आणि हत्तीचे तोंड
मोठय़ा पोटावरती रुळते आणि तयाची सोंड..
कुणी म्हणे गणपती, कुणी म्हणे गणेश
सर्व देवांमध्ये त्याचा मान आहे विशेष..
सोवळे लाल, गंध-फूल लाल लाल
आरतीमध्ये त्याच्या धरती सारे ताल..’
माझे काव्य मी आज्जीला ऐकवले तर तिने कौतुकाने टाळ्या पिटल्या आणि तिने देवापुढले गूळखोबरे माझ्या हातावर ठेवले तर मी तात्काळ पुढल्या दोन ओळी म्हटल्या-
‘पिटता पिटता टाळ्या हसती गाल गोबरे
कारण देवापुढले त्यांना हवे गूळ खोबरे..’
आज्जीने माझ्या कपाळावरून, गालावरून हात फिरवले आणि तिच्या कानजवळ हात नेत कडाकडा बोटे मोडली. म्हणाली, ‘गणपती बाप्पा, हिला असेच शब्दप्रभू बनव..’
बालपणी भेटलेला हा गणपती थोडी मोठी झाल्यावर घरातल्या न्हाणीघरातही भेटला तो मात्र आईच्या कृपेने. झाले काय होते, पावसामुळे घरातली सगळी दारे फुगली होती. बाथरूमचे दार तर खूपच फुगले होते. ‘रंधा मारायला सुताराला बोलवा..’ असा आईने बाबांकडे तगादा लावला होता. पण बाबांना काही ते जमेना. म्हणून मग (त्या दारांसोबत-) आईही फुगली (म्हणजे रागावली) होती. तिने आंघोळीला जाताना मला कडक शब्दांत आज्ञाच केली, ‘बाथरूमचे दार लागत नाहीये, तेव्हा तू इथे बाहेर पहाऱ्याला बैस. इथून हालू नकोस.’ मला गणपतीची आठवण आली. गणपती जेव्हा ‘गजानन’ म्हणजे हत्तीच्या तोंडाचा नव्हता, तेव्हा तोसुद्धा असाच अंघोळ करणाऱ्या पार्वतीआईच्या पहाऱ्याला बसला होता. मग महादेव शंकर आले नि त्यांनी आपला रस्ता अडवणाऱ्या गजाननाचे कसे मुंडके उडवले, याची गोष्ट सर्वाना ठाऊक आहेच. आमच्या घरीही आणीबाणीचा प्रसंग आलाच. आई बाथरूममध्ये असतानाच नेमके बाबा सुताराला घेऊन तिथे अवतीर्ण झाले आणि पहाऱ्यावर बसलेल्या मला दूर सारू लागले. मी त्यांना निकराची लढाई करीत थोपवून धरले. त्यांनी माझे मुंडके नाही उडवले, पण माझ्या डोक्यात जोरात टप्पल मारली आणि पुढील अनर्थ टळला.
 गणपतीच्या कथांचा घरामध्ये नेहमी उल्लेख होत राहायचा. ताई जेव्हा कॉलेजकुमारी झाली, तेव्हा ती आपल्या सौंदर्याबाबत खूपच जागरूक झाली. ती चेहऱ्याला कुठकुठले लेप लावून बसायची आणि अंघोळीला खूप वेळ लावायची. शिवाय ती ‘बाथरूम सिंगर’ही होती त्या वेळी. मग काय? दादाला चिडवायला आयतेच निमित्त मिळायचे, ‘किती मळ काढतेस? त्याचा काय गणपती करायचाय का यंदाच्या उत्सवात मांडायला?’..
गणपती उत्सव आणि घर यांचे नाते काय वर्णावे? गणपती मराठी माणसाच्या मनोमनी.. घरोघरी वसलेला असतो. भाद्रपद महिन्यात तो पार्थिव स्वरूपात येतो, तेव्हा तर उत्सवाला उधाणच येते. ही बुद्धीची देवता. मनुष्याचे शरीर आणि हत्तीच्या तोंडामुळे या देवतेला विलक्षण, विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे. हत्ती हा विशालकाय प्राणी. मोठे गंडस्थळ-बुद्धिमान असल्याचे लक्षण. बारीक डोळे- सूक्ष्म नजर. शूर्पकर्ण- बहुश्रुत. लंबोदर- गणांचे अपराध पोटात टाकणारा. तो आहे- एकदंत, वक्रतुंड, मूषकवाहन. तुंदिलतनु.. असे असले तरी गणपतीची मूर्ती दिसते खूप गोंडस. तो आपल्याला भयप्रद वाटत नाही. ‘ॐकारप्रधान रूप गणेशाचे.. ते तिन्ही देवांचे जन्मस्थान..’ या तुकाराम महाराजांच्या अभंगातील पंक्ती. मला गंमत वाटते, हा शंकराचा (खरे तर पार्वतीचा) मुलगा. पार्वती ही त्याची सिंगल पेरेंट! तरीही त्याच्यात बह्मा, विष्णू आणि महेश एकवटले आहेत. आपल्या दैवतांमध्ये बऱ्याचदा अशी सरमिसळ आढळते. कालविपर्यास आढळतो. कारण कालानुरूप माणसानेच देवाला घडवले आहे. पोथ्या, पुराणे, व्रत-वैकल्ये, कहाण्या, परंपरा, रूढी या माणसानेच वेळोवेळी बहुरूढ केलेल्या गोष्टींमुळे त्याला हवे तसे त्याने देवाला घडवलेले आपल्याला दिसते. आणि त्याच देवाला लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनार्थ घरातल्या देव्हाऱ्यासह चौकातल्या सार्वजनिक ठिकाणी स्थापित केले. आज त्याला शंभरहून अधिक वर्षे झाली. आपण घरात आणि सार्वजनिक ठिकाणीही गणेशोत्सव साजरा करतो. सार्वजनिक गणपती उत्सवाचे स्वरूप आज पालटून गेले आहे. काही अपवाद, पण बहुसंख्य ठिकाणी विपरीत झाले आहे. त्यामुळे त्याने आता पुन्हा घरासाठी, घरापुरतेच राहावे, असे प्रकर्षांने वाटते. असो.
दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा गौरीसोबत निरोप घेणारा तसेच दहा दिवस अशा विविध कालावधींत घरोघरी मुक्काम करणारा गणपती शिल्पकला, चित्रकला, पुष्पकला, रांगोळीकला, साहित्य, नृत्य, नाटय़, संगीत-गायन अशा तमाम ललित कलांचा अधिष्ठाता असतो. तो रंग, रूप, गंध, स्पर्श आणि शब्दरूप असून ‘ॐ नमोजी आद्या.. वेदप्रतिपाद्या.. जय जय स्वसंवेद्या.. आत्मरूपा..’ या ज्ञानेश्वर माऊ लींच्या शब्दांत सामावणारा आहे. या उत्सवाविषयी आई भरभरून बोलायची, ‘पार्थिव गणेशाचे घरी होणारे आगमन रटाळ दिनचक्राला चुटकीसरशी चैतन्यमयी करते. गंधाक्षता, रक्तपुष्पे, पत्री, धूप, दीप, नैवेद्य, षोडशोपचार पूजा, आरत्या, मंत्रपुष्पांजली, प्रसाद.. या सगळ्या गोष्टींनी घर अगदी दुमदुमून जाते. नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी यांचा राबता असतो घरी. गौराईंच्या सजावटीत महिलांसह पुरुषही सहभागी असतात. कृषी संस्कृतीतून रूढ झालेला हा सोहळा सगळे नातेसंबंध उजळून टाकण्याचा सोहळा असायला हवा. परंपरा नव्याने तपासण्याचा सोहळा असायला हवा. काळानुरूप नवे होण्याचा व हीन जाळून टाकण्याचा सोहळा हवा..’ आईचे म्हणणे खूपसे पटणारे आहे, नाही?
आमचे घर बांधून झाले तेव्हा बाबांना कृतकृत्य वाटले. बाबांनी एक छानशी गणपतीची टाइल आणली आणि गवंडय़ाकडून मुख्य दाराच्या वर पूर्वाभिमुख लावून घेतली. त्याला हार घातला. गवंडी घुटमळत होता. आईच्या ते लक्षात आले. तिने आत जाऊ न दक्षिणा आणली आणि गवंडय़ाला दिली. त्याला नमस्कार केला. अशा गोष्टी अंधश्रद्धेच्या नि पैसे उकळण्याच्या असल्या तरी ‘त्यात सद्भावनेचा भाग असतो,’ असे आई म्हणाली आणि तिने दाराला तोरण लावले. त्या तोरणावरही मध्यभागी गणराय विराजमान होतेच! नंतर घराची वास्तुशांत करायचे ठरले. गुरुजींनी यजमान बाबांना पुन्हा म्हटले, ‘कार्यारंभी आपण गणेशपूजन करूया. त्या विडय़ाच्या पानावर पार्थिव गणपती म्हणून ती सुपारी ठेवा बरें! त्यावर हा आता त्यावर उदक सोडा..’ वास्तुपुरुष कोपऱ्यातील टाइलखाली पुरला. मग सर्वानी गणपती-अथर्वशीर्ष म्हटले. गुरुजी म्हणाले, ‘गणेशकृपेने कार्य निर्विघ्नपणे पार पडले.. काय शंकासुरी? तुला काही शंका?’ दुसरा प्रश्न माझ्यासाठी होता. मी लगेच विचारले, ‘वास्तुपुरुष असतो, तशी वास्तुस्त्री का नाही?’ माझ्या त्या बालसुलभ प्रश्नाने सारे घर ‘खो खो’ हसले.

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न