News Flash

दक्षिण नवी मुंबईतील विकासवाटा

उद्योगांतील वाढीमुळे ५० हजारांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

जगदीश तांडेल

नवी मुंबईच्याच विकासाचा एक भाग म्हणून १९७० पासून उरणमधील विकासाला सुरुवात झाली आहे. उरण हे अरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील मासेमारी व भातशेती हा येथील प्रमुख व्यवसाय होता; परंतु ७० च्या दशकात मुंबईपासून २५० किलोमीटर अंतरावर समुद्रात कच्च्या तेलाच्या विहिरींचा शोध लागला. या शोधानंतर या कच्च्या तेलावर प्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ओेएनजीसीच्या तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला गेला. १९७५ पासून सुरू करण्यात आलेल्या या तेलशुद्धी प्रकल्पातून वायू, डिझेल, घरगुती गॅस, केरोसीन, नाफ्ता आदीचा पुरवठा केला जात आहे. मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या पुनर्बाधणीचे ७ हजार कोटी रुपयांचे काम सुरू आहे. त्यामुळे ही नव्याने गुंतवणूक केली जात आहे. याच प्रकल्पावर आधारित देशातील पहिला वायूवर चालणारा पहिला वायू विद्युत प्रकल्पही उभारण्यात आला. या प्रकल्पातून ९५२ मेगाव्ॉट विजेची निर्मिती केली जात आहे, तर या प्रकल्पामुळे येथील नागरिकांनाही रोजगार मिळालेला आहे. त्याच धर्तीवर भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस भरणा प्रकल्प उभारला गेला आहे. सध्या या प्रकल्पातून देशभरात घरगुती गॅसचा पुरवठा केला जात आहे. १९९० च्या दशकात सुरू झालेल्या या प्रकल्पाचाही विस्तार करण्यात आला आहे, तर १९८९ ला उरणमधील औद्योगिकीकरणात जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे यात भर पडली. जेएनपीटी बंदराच्या स्थापनेपासून सुरू झालेल्या बंदर उद्योगाची वाढ सध्या वेगाने सुरू आहे. जेएनपीटीनंतर एनएसआयसीटी (दुबई पोर्ट) त्यानंतर जीटीआय अशी दोन खासगी बंदरे उभी राहिली आहेत. या बंदराच्या उभारणीसाठी ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली, तर नव्याने सिंगापूर बंदराकडून जेएनपीटीमध्ये ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या आधारावर चौथे बंदर उभारण्याचे काम सुरू आहे. या बंदराचा पहिला टप्पा जानेवारी २०१८ पर्यंत सुरू होणार आहे. त्यासाठी ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. जेएनपीटी बंदर उभारणी करण्यात आली त्या वेळी १ लाख कंटेनरची हाताळणी केली जात होती, तर एनएसआयसीटी बंदरानंतर या हाताळणीत वाढ झाली आहे. सध्या तीनही बंदरांची मिळून ४५ लाख कंटेनरची हाताळणी केली जात आहे, तर नव्या बंदरामुळे यात दुपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे येत्या २०२२ पर्यंत जेएनपीटी बंदराच्या चारही बंदरांतून मिळून होणारी कंटेनरची हाताळणी १ कोटीपर्यंत केली जाणार आहे. या उद्योगांतील वाढीमुळे ५० हजारांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध झाले आहेत. यातही वाढ होणार आहे. अशाच प्रकारचा देशातील पहिला बंदरावर आधारित सेझ प्रकल्प २६६ हेक्टरवर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे दीड लाखांपेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगारांतही वाढ होत आहे. बंदरातील वाढत्या कंटेनर हाताळणीबरोबरच बंदरातील मालाची चढ-उतार करण्यासाठी लागणारे गोदामही वाढू लागले आहेत. यात अधिकृत व अनधिकृत असे मिळून ६४ पेक्षा अधिक गोदाम तयार झाले आहेत. या गोदामातील कामामुळेही रोजगार वाढू लागले आहेत. येथील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रस्त्यांचे जाळेही पसरू लागले आहे. जेएनपीटी तसेच येथील उद्योग परिसराला जोडणारे दोन्ही मार्ग हे राष्ट्रीय महामार्ग बनले आहेत. या महामार्गाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. २०१८ पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. त्यासाठी रस्ते विभागाकडून २६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. जेएनपीटी ते गव्हाणदरम्यान सहापदरी तर त्यानंतर आठपदरी असे हे मार्ग तयार करण्यात येणार आहेत. येथील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी उड्डाणपुलांचेही जाळे तयार केले जात आहे, तर जास्तीत जास्त कंटेनरची हाताळणी करण्यासाठी रेल्वे मार्गाचेही रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. तसेच या मार्गावरून डबलडेकरची कंटेनर वाहतूक करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई-दिल्ली कॉरेडोरही उभारला जात आहे. याच ठिकाणी मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूची उभारणी केली जात आहे. त्यासाठी १६ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. हा मार्गही याच परिसरातील चिर्ले येथे उतरणार आहे. त्यामुळे उरण हे नवी मुंबईप्रमाणेच मुंबईचेही सर्वात जवळचे उपनगर होणार आहे, तर शिवडी ते घारापुरी व घारापुरी ते मुंबई-गोवा मार्गावरील खारपाडापर्यंतच्या रोप-वे मार्गाचीही घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच विरार ते अलिबाग सागरी मार्गही उरणमधूनच जाणार आहे. नव्याने या भागातील जेएनपीटी ते नवी मुंबईला जोडणाऱ्या सागरी मार्गासाठी सिडकोकडून ६२५ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे औद्योगिकीकरणाच्या जोडीला नागरीकरणातही वाढ होऊ लागली आहे. सिडकोच्या द्रोणागिरी नोडमध्ये घरांचे बांधकाम सुरू आहे. उरण ते नवी मुंबईला जोडणाऱ्या लोकल मार्गावरील या नागरी वस्तीत सुसज्ज अशी घरे बांधली जात आहेत. त्यामुळे लवकरच या भागातील नागरी विकासातही वाढ होणार आहे. शेकडो घरांच्या विक्रीलाही सुरुवात झालेली आहे. विविध थरांतील नागरिकांच्या गरजेची घरे द्रोणागिरी नोडमध्ये तयार आहेत. या घरांसाठीच्या दळणवळणाचीही कामे सुरू आहेत. शेकडो इमारतींच्या उभारणींची कामे सुरू आहेत. त्यामुळे भविष्यातील नागरी वस्तीही विस्तारणार आहे. या वस्तीला सुविधा पुरविण्याचे काम सिडकोकडून करण्यात येत आहे. साडेबारा टक्के विकसित भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या येथील स्थानिकांच्या हक्काची घरेही तयार होत आहेत. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक परिसरातील विकास नगरी म्हणून उरण नावारूपाला येऊ लागली आहे. त्यामुळे येथील नागरी वस्तीतही वाढ होण्याची चिन्हे आहेत.

दक्षिण नवी मुंबईतील घरे वा व्यावसायिक संकुले ही थेट न्हावा-शेवा सी लिंकशी जोडली जातील, त्यामुळे येथील गुंवतणूक खूप फायदेशीर ठरणार आहे. उलवे-देवगिरीचा विकास मोठय़ा प्रमाणात आणि लवकर साधला जाणार आहे. विमानतळाचे कामही जोमात सुरू आहे. ही विकास कामे होण्यापूर्वी येथे कमी किमतीत लोकांना घरे वा व्यावसायिक संकुले उपलब्ध होतील. सामुहिकरीत्या प्लॉट खरेदी करून स्वयं-विकास करण्याची संधीही उपलब्ध होत आहे.  त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा.

के. डी. राठोड

इन्फ्राटेकचे व्यवस्थापकीय संचालक

नवी मुंबईतील देवगिरी हा पट्टा मोठय़ा प्रमाणात विकसित होत आहे. सुनियोजित परिसर असल्याने येथील निवासी संकुले आणि व्यावसायिक संकुले यांचा सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांना फायदा होईल. वाहतुकीचा विचार केला तर रस्ता, रेल्वे, समुद्रीमार्ग, विमानतळ अशा चारही सेवा येथे उपलब्ध होतील. उत्तम दर्जाच्या शाळा, कॉलेजेस आणि इस्पितळे यांची उपलब्धता यांमुळे निवासी संकुलांसाठी हा परिसर उत्तम आहे.

करण भट

व्हिला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:50 am

Web Title: jagdish tandel article on development in uran
Next Stories
1 फर्निचरचा आकार-उकार..
2 मंदिर स्थापत्य : मंदिर बांधकाम शैली
3 रेरा अनोंदणीकृत प्रकल्प, तक्रार आणि अपिल
Just Now!
X