अशाच एका शनिवारी पोस्टात निघालो होतो. पाठीमागून आवाज आला म्हणून थांबलो नि मागे वळलो. समोरच्या व्यक्तीने संदर्भ देऊन विचारले, ‘तुमच्या शेजारची खोली भाडय़ाने द्यायची आहे का?’ त्या व्यक्तीच्या आदबशीर प्रश्नाने माझा पूर्वग्रह ढळला. मी तात्काळ ‘हो’ म्हणालो. अनामत रक्कम, भाडे यावरही चर्चा झाली. सोयी-सुविधा, नियम, शिस्त यावरही कायदेशीर चर्चा झाली. अनुभवाने थोडे शहाणपण आले होते. खरं तर समोरची व्यक्ती वयाने मोठी होती. क्षणभरासाठी ते गरजू होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरील विनम्रता मला कृत्रिम वाटली नाही. त्यांचा विनम्र अबोलपणा माझ्या मनात ठसत गेला. माझ्या कायदेपंडितपणाची मला लाज वाटू लागली.

खरं तर आयुष्यात चाळ आणि खोलीतील जीवन मी जगलो होतो. बाकी काही नसले तरी माणसांचा सहवास, त्यांचा गलबला मला हवाहवासा वाटे. माणसे सोबत असणे ही भावना मनाला उभारी देई. म्हणून घराला लागूनच दोन खोल्या खास सोयींनीयुक्त बांधल्या होत्या. भाडे कमावून पोट भरणे हा उद्देशच आयुष्यभर मनात येऊ द्यायचा नाही, त्यापेक्षा आयुष्यभरातल्या भाडेकरूंचा गोतावळा करायचा. अर्थात त्यात नैसर्गिक जिव्हाळा असणे महत्त्वाचे! मध्यंतरी एक बिऱ्हाड त्यांच्या मूळ गावी गेले नि एक खोली खाली झाली, नि ठरल्याप्रमाणे संजयभाऊ यांच्या दोन मुले नि पत्नीसह राहायला आले.

चौकोनी कुटुंबातला शेंडेफळ, पार्थ फक्त दीड वर्षांचे होते. सर्वजण त्याला लाडाने बाबू म्हणत. थोरला  विवेक पाच वर्षांचा. पण बाबूच्या बाल- लीलांनी आम्हाला मोहवून टाकलं. गुबरे गाल, गोरी कांती, भुरभुरणारे केस नि बोबडे बोल. कामावरून घरी आलो की बाबू जवळ येई. पायांना मिठी मारी. का- का- का असे गोड बोले. कामाचा त्राण क्षणभराने विरून जाई. दुपारी पोटभर जेवून जवळजवळ झोपायचो. मी त्याला आवडीने बाबू- साबू, दाबू- खाबू असं काहाबाही बोलायचो. मग त्यालाही त्याची सवय झाली. बंद दरवाजावर थाप मारल्यावर विचारले की, ‘कोण आहे रे?’ कि तो म्हणायचा.. साबू.. सगळेजण खो- खो करून हसायचे. घराच्या जोत्यावर सू करायचा नि म्हणायचा की, ही आमची जागा आहे. मी गप्प! बाबूमुळे दोन कुटुंबे एकजीव झाली.

संजयभाऊ अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. साडेचारशे एकरांत विकसित होणाऱ्या घरबांधणी प्रकल्पाचे ते व्यवस्थापक होते. प्लम्बिंगपासून ते इलेक्ट्रिशियन ते आचाऱ्यापर्यंत सर्व कामे त्यांना जमत. एखाद्या कामगाराने एखादे काम जमत नाही सांगण्याचा अवकाश ते क्षणार्धात स्वत: करून दाखवत. आमच्या घराच्या, खोलीच्या कोणत्याही डागडुजीसाठी त्यांनी कोणताच खर्च येऊ दिला नाही की मजूर आणला नाही. कामगारांना हाताळण्याचे कौशल्य हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रमुख भाग होता. नाती कशी जपावीत हे संजयभाऊंकडून शिकलो. पारंपरिक स्त्री कशी असावी याचे दर्शन बारावी शिकलेल्या वहिनींकडे पाहून कळायचे. दमून आलेल्या संजयभाऊंना त्यांनी कधीच प्रश्न विचारले नाहीत, की हुज्जत घातली नाही. सुट्टीच्या वा मोकळ्या वेळेत ‘संवाद’ व्हायचा. पण त्यांना बाहेरून आलेल्या व्यक्तीची मानसिकता समजत असे. त्यांची कपडे, रंग व खाद्यपदार्थ याबाबतची दृष्टी नि निवड वाखाणण्याजोगी होती.

मागच्या आठवडय़ात अचानक बदली झाल्याने संजयभाऊ बाबू, विवेक नि वहिनी गावाला गेल्या. टेम्पोत सामान भरेपर्यंत काही वाटले नाही. आवराआवर करून वहिनींनी दाराला कुलूप लावलं. हातातला भाकरीचा तुकडा उंबऱ्यात ठेवला.. नि माझे डोळे डबडबले. टेम्पोत बसायला अधीर झालेला बाबू दूर पळत गेला. टाटा करायला माझा हात मला जड झाल्यासारखा भासला. आताही बाबूच्या आवाजाने दुपारची झोप चाळवते. आठवणीने मन पोखरते.

बाबू, विवेकचे साजरे झालेले पाच- पाच वाढदिवस, पाण्याची बोंब, कधी लाइटचा लपंडाव, भाजी- कालवण, दूध, खाऊ यांची देवाणघेवाण नि कधी कधी गैरसमजातून झालेले रुसवे- फुगवेसुद्धा! बाबूला फटकावणे, धमकावणे, दरडावणे, मग त्याचे रडणे, रडगाणे तक्रार नि पुन्हा गडबड गोंधळ! गुढी उभारणे, आकाशकंदील लावणे, पुन:पुन्हा ‘सोने’ देऊन मकर संक्रांतीला पोटभर तीळ- गुळाचा एकत्र फडशा पाडणे.. कितीतरी आठवणी.

उद्या ही खोली नव्या माणसांनी भरून जाईल, पण जुन्या आठवणी सरणार नाहीत. न सरण्यातच आपली माणुसकीची अमानत आहे, असे मी मानतो.

यशवंत सुरोशे

vasturang@expressindia.com