20 February 2019

News Flash

बुक शेल्फ

दिवसेंदिवस वाचन संस्कृती बहरत चालली आहे, व्यापाक होत चाललेली आहे.

|| पुरुषोत्तम आठलेकर

आजच्या इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात लोकांच्या वाचनाच्या सवयी बदल्या आहेत ही वस्तुस्थिती असली तरी वर्तमानपत्र, पुस्तक, अंक वाचण्यात जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. दिवसेंदिवस वाचन संस्कृती बहरत चालली आहे, व्यापाक होत चाललेली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे देशातील महाराष्ट्रमधील ‘भिलार’ या गावी साकारलेले ‘पुस्तकांचे गाव’. या गावात घराघरांतून विविध विषयांवरील विविध पुस्तके आपल्याला उपलब्ध आहेत. माणसांमुळे ज्याप्रमाणे घराला घरपण येते, त्याप्रमाणे पुस्तकांमुळेसुद्धा घराला घरपण येते. इतकेच नव्हे तर कुटुंब, समाज अधिक प्रगल्भ होतो, हेही तितकेच खरे. पुस्तक आणि वास्तू यांचेसुद्धा एक वेगळे नाते आहे. घरातील माणसाप्रमाणे पुस्तकांचा सहवास हवाहवासा वाटतो. वाचनालय, ग्रंथालय, प्रदर्शन यामधून आपल्या भेटीगाठी होतच असतात; परंतु घरातील एकांतवासात पुस्तक हाच खरा आपला सोबती असतो. घरातील असा एक कोपरा- जो आपल्या कुटुंबाचा वाचनकप्पा म्हणून ओळखला गेला पाहिजे. आजकाल घर घेतल्यानंतर ज्याप्रमाणे अंतर्गत सजावट आपल्या आवडी व बजेटनुसार करत असतो. अशाच वेळी वेगवेगळ्या आकाराचे, डिझाइन्सचे आपण बुक-शेल्फ बनवून घेऊ  शकतो. पूर्वी सर्वसाधारण जागेची उपलब्धता असल्यामुळे बंद दर्शनी काचेच्या कपाटात पुस्तके रचून ठेवलेली आपण बघत आलो आहोत; परंतु अलीकडच्या वन /टू बेडरूम हॉल-किचन जागेत मांडणी करताना तसेच स्पेस मॅनेजमेंटचा विचार करता मोठमोठी कपाटे करणे शक्य नसते, अशा वेळी हॉल/बेडरूममधील दोन काटकोनी भिंतीवरील कॉर्नरच्या जागेत आपण सुंदर आकर्षक बुक-शेल्फ बनवून घेऊ  शकतो. अशा उभ्या कॉर्नर पिसमध्ये आपण आपल्या आवडीनुसार पुस्तकाची मांडणी करू शकतो. हे बुक-शेल्फ आपल्याला वूडन, मेटल, ग्लास, फायबर शीटस्मध्ये आपल्या आवडीच्या रंग-संगतीत बनवून घेता येतात.

बुक-शेल्फ हा घरातील कुटुंबाचा एक सदस्य होऊन जातो. त्यामधील एखादे पुस्तक काढून ते उघडताच येणार सुवास मनाला एक वेगळे समाधान देऊन जातो. एकांतात तोच खरा आपला सोबती असतो आणि वेळ सत्कारणी लागतो. घरातील बुक-शेल्फमुळे केवळ

शोभा येत नाही तर घर खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होत असते, घडत असते. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीनुसार ही केवळ अंतर्गत सजावट नसून, तो वास्तूमधील एक अविभाज्य घटक आहे. अशा घराला वास्तू नेहमी ‘तथास्तु’ म्हणत असते.

First Published on July 7, 2018 3:46 am

Web Title: loksatta vasturang marathi articles 17