17 July 2019

News Flash

बक्षीसपत्र – भाग २

मागील लेखात वेगवेगळ्या रक्ताच्या नातेसंबंधांत केल्या गेलेल्या बक्षीसपत्रास मुद्रांक किती लागेल याची माहिती वाचली.

|| धनराज खरटमल

मागील लेखात वेगवेगळ्या रक्ताच्या नातेसंबंधांत केल्या गेलेल्या बक्षीसपत्रास मुद्रांक किती लागेल याची माहिती वाचली. खरे तर बक्षीसपत्रासंबंधी अजून काही लिहिणे आवश्यक असल्याचे माझे मत झाल्याने या लेखाचा प्रपंच. मागच्या लेखात आपण पाहिले की, निवासी अथवा शेतजमिनीच्या मिळकतीचे बक्षीस अथवा दानपत्र करावयाचे असेल आणि जर ती मिळकत आई-वडील आपल्या मुलांना, आजी-आजोबा आपल्या नातवंडांना, पती आपल्या पत्नीला, पत्नी आपल्या पतीला, सासू-सासरे आपल्या विधवा सुनेला, अशी मिळकत जर बक्षीसपत्राद्वारे देत असतील तर फक्त रुपये दोनशे मुद्रांक शुल्क व फक्त दोनशे रुपये नोंदणी फी भरणे आवश्यक होते.

या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, जर एखादी मिळकत किंवा मालमत्ता ही, दात्याचा पती, पत्नी, भाऊ किंवा बहीण असलेल्या कुटुंब सदस्याला किंवा दात्याच्या कोणत्याही वंशपरंपरागत पूर्वजाला किंवा वंशजाला (any lineal ascendant or descendant of the donor) दान केली असेल तर त्या मालमत्तेच्या किंवा मिळकतीच्या बाजारमूल्यावर तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असेल.

नातेसंबंध नसणाऱ्या ‘अ’ या व्यक्तीने आपली मिळकत ‘ब’ या व्यक्तीला बक्षीस दिली तर त्याला मुद्रांक शुल्क किती लागेल? असा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो. याचे उत्तर असे आहे की मग ती मिळकत निवासी असो वा शेतजमीन असो वा कोणतीही व्यापारी मिळकत असो. ती मिळकत बक्षीस देताना त्यावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम-१९५८ चे अनुसूची एकचे अनुच्छेद ३४ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे जर ती स्थावर मिळकत असेल तर त्यावर बाजारमूल्याच्या पाच टक्के दराने व जंगम मिळकत असेल तर त्यावर तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक आहे.

बक्षीसपत्र हे बऱ्याच वेळा विनामोबदलाच दिलेले असते. परंतु अनेक वेळा असेही होते की बक्षीसपत्र मोबदला घेऊनसुद्धा देण्यात येते. त्यावेळी त्यावर मुद्रांक शुल्क कसे आकारले जाईल किंवा त्यावर सवलत मिळेल किंवा कसे..? खरे तर ज्यावेळी मोबदला घेऊन बक्षीसपत्र दिले जाते त्यावर जर ती मिळकत स्थावर मिळकत असेल तर बाजारमूल्याच्या पाच टक्के व जंगम असेल तर बाजारमूल्याच्या तीन टक्के दराने मुद्रांक शुल्क आकारले जाते.

८ फेब्रुवारी २०१९ पासून नगर विकास विभागाने मुंबईकरिता मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात केलेल्या तरतुदीनुसार एक टक्का अतिरिक्त मुद्रांक शुल्क देय ठरते. तसेच यापूर्वी मुंबई वगळता राज्याच्या इतर भागांत लागू असलेले एलबीटी व जिल्हा पिरषद सेस हे एक टक्का अतिरिक्त मुद्रांकसुद्धा लागू आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. तसेच ज्या बक्षीसपत्राला रक्कम रुपये दोनशे इतके मुद्रांक शुल्क लागते त्याला नोंदणी फी फक्त रक्कम रुपये दोनशे घेण्यात येते तर बक्षीसपत्राच्या इतर सर्व प्रकरणी बाजारमूल्याच्या एक टक्का किंवा जास्तीत जास्त तीस हजार इतकी नोंदणी फी घेण्यात येते हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

निवृत्त सहदुय्यम निबंधक, मुंबई शहर.

dhanrajkharatmal@yahoo.com

First Published on March 8, 2019 10:29 pm

Web Title: loksatta vasturang marathi articles 36