16 December 2017

News Flash

कमी तेच जास्त

आजच्या लेखाचा मथळा वाचून थोडे आश्चर्य वाटले असेल ना?

गौरी प्रधान | Updated: July 22, 2017 12:15 AM

आजच्या लेखाचा मथळा वाचून थोडे आश्चर्य वाटले असेल ना? गोंधळून जाऊ  नका, ही एक इंटिरियर डिझाइनमधलीच थोडी वेगळी संकल्पना आहे. कमी तेच जास्त अर्थात मिनिमलिस्टिक डिझाइन. आधुनिक काळातील ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना. साधारणपणे साठ-सत्तरच्या दशकात या संकल्पनेची सुरुवात झाली. त्यापूर्वी इंटिरियर म्हणजे भरगच्च सजावट असाच काहीसा समज होता.

मिनिमलिस्टिक डिझाइन या संकल्पनेची सुरुवात तशी फॅशन जगतापासून सुरू होऊन नंतर ती इतरही क्षेत्रात पसरत गेली. या संकल्पनेचा पायाच मुळी कमी तेच जास्त या तत्त्वावर उभा आहे. सध्या सोप्या भाषेत सांगायचे तर आपल्या गरजा अचूक ओळखून त्याप्रमाणे डिझाइन करा.

या संकल्पनेप्रमाणे घराचे इंटेरिअर करताना सर्वात आधी घरातील अत्यावश्यक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायला हवे. असे केल्यावर अनावश्यक वस्तू आपोआप आपल्या यादीतून बाहेर पडतील. घरातील फर्निचरच्या डिझाइनवरदेखील या संकल्पनेचा प्रभाव दिसून येतो. मिनिमलिस्टिक या संकल्पनेत कर्व अर्थात नागमोडी वळणदारपणा, मोल्डिंग या जुन्या जमान्यातील किंवा क्लासिकल इंटिरियर डिझाइनमधील गोष्टींना मुळीच थारा नाही. त्याऐवजी उभ्या आडव्या सरळ रेषा व साध्या सोप्या भौमितिक आकारांचा वापर करून यात फर्निचर डिझाइन केले जाते. जी गोष्ट आकारांची तीच गोष्ट रंगांचीही, एकदा मिनिमलिस्टिक असे आपण म्हटलेच आहे ना, मग रंग तरी कसे भरभरून वापरता येतील? फार पूर्वी जेव्हा ही संकल्पना फारच नवीन होती, तेव्हा या संकल्पनेनुसार डिझाइन करताना शक्यतो काळ्या पांढऱ्या रंगांवर जास्त जोर दिला जात असे. परंतु काळानुसार त्यातही बदल घडत जाऊन आत्ताच्या पद्धतीनुसार संकल्पनेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता थोडय़ा अधिक रंगांचा वापर यात होऊ  लागला. आता जरी नव्या कलाप्रमाणे यात निरनिराळे रंग वापरण्याची मुभा असली तरीही संकल्पनेनुसार जाताना एका वेळी एक किंवा दोनच रंग वापरले जातात. त्यातही मूळ रंगांना जास्त महत्त्व. उदा. जर एखादी खोली संपूर्ण ग्रे रंगाने बनविली आणि त्यातील एखादाच फर्निचरचा भाग लाल किंवा तत्सम रंगाचा ठेवला तर तो लाल रंग हा मूळ लाल रंगच असणे अपेक्षित आहे, इथे शक्यतो त्या लाल रंगापासून तयार होणारे उपरंग टाळलेलेच चांगले.

वरील सर्व वाचून कोणी जर असे म्हणेल की ‘हे कमी ते कमी’, ‘कमी तेच जास्त’ म्हणजे ही गरीब घरांची संकल्पना आहे, तर लक्षात घ्या, हा अत्यंत चुकीचा समज आहे. मिनिमलिस्टिक पद्धतीने इंटिरियर करणे हे आत्ताच्या काळातील अतिशय महागडे आणि उच्च अभिरुचीचे निदर्शक आहे. याचा उद्देशच मुळी ‘मी सर्व काही विकत घेऊ  शकतो/ शकते. परंतु मला माझे घर निरुपयोगी वस्तूंनी भरायचे नाही’ असा आहे. मुळात इथे अगदी कमीत कमी वस्तू वापरून इंटिरियर करायचे असल्याने जे वापरणार त्यातून श्रीमंती थाट डोकावणे गरजेचे असते आणि यामुळेच ज्या वस्तू वापरायच्या त्या दर्जा आणि रूप या दोन्ही कसोटय़ांवर उत्तीर्ण होणे महत्त्वाचे ठरते. याच कारणाने मिनिमलिस्टिक इंटिरियर करून घ्यायचे म्हणजे खर्चात मोठी कपात असे जर कोणाला वाटत असेल तर ते तसं नाहीये. परंतु त्याचसोबत हेदेखील खरे आहे की मिनिमलिस्टिक संकल्पना आपल्याला आपल्या गरजा ओळखून जगायला शिकवते. आपल्या घरातील अनावश्यक डेकोरेशनचा भाग अलगद काढून घेऊन डिझाइनला महत्त्व देणारी ही संकल्पना आहे. आता आपण अशा टप्प्यावर आहोत की डिझाइन आणि डेकोरेशन यातील फरक सुज्ञ वाचकांस सांगणे न लगे.

थोडक्यात काय, तर साधेपणातही उच्च अभिरुची जपणारी, घराला एक स्वछ नीटनेटकेपणा देणारी अशी ही संकल्पना आहे. कमीतकमी म्हणजे गरजेपुरतेच फर्निचर, त्यातही शांत रंगांचा वापर आणि अतिरिक्त भडकपणा टाळून हे इंटिरियर साकारले जाते. टी.व्ही.वर दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींमधून अशा प्रकारच्या इंटेरियरचे सर्रास दर्शन होते, विशेषत: बाथरूमशी संबंधित जाहिराती पाहिल्यास आपल्याला लगेचच या प्रकारच्या इंटेरियरची कल्पना येऊ  शकेल.

सर्वात शेवटी, पण महत्त्वाचे इंटिरियर डिझायनिंगमध्ये जशा क्लासिकल, कॉन्टेम्पररी व इतर अनेक संकल्पना आणि पद्धती आहेत तशीच मिनिमलिस्टिक ही संकल्पना आहे. सध्याच्या काळात या संकल्पनेची चलती आहे म्हणून त्या विषयी जाणून घेणे महत्त्वाचे. अन्यथा इतर संकल्पना, पद्धती आणि मिनिमलिस्टिक संकल्पना यात डावे-उजवे करण्यासारखे काहीच नाही. प्रत्येक पद्धती ही तिच्या जागी श्रेष्ठच!

गौरी प्रधान

ginteriors01@gmail.com

(इंटिरियर डिझायनर)

First Published on July 22, 2017 12:15 am

Web Title: marathi articles on minimalist interior design