News Flash

मिशन दुसरे घर

काही दिवसांपूर्वी एक मध्यमवयीन जोडपे माझ्याकडे वर्तमानपत्रातील एका आकर्षक जाहिरातीचे कात्रण घेऊन आले होते. मुंबई शहराबाहेरील २ ते ३ तासांच्या प्रवासात पोहोचू शकेल इतक्या

| September 6, 2014 03:28 am

काही दिवसांपूर्वी एक मध्यमवयीन जोडपे माझ्याकडे वर्तमानपत्रातील एका आकर्षक जाहिरातीचे कात्रण घेऊन आले होते. मुंबई शहराबाहेरील २ ते ३ तासांच्या प्रवासात पोहोचू शकेल इतक्या अंतरावरील निसर्गाच्या सान्निध्यात एका नियोजित बांधकाम प्रकल्पाची ती अत्यंत आकर्षक जाहिरात होती. जाहिरातीत दाखविलेले दृश्य एवढे विलोभनीय होते, की पाहताक्षणी कोणालाही ते आवडावे व अशा निसर्गरम्य परिसरात आपले देखील एखादे छोटेसे घरकुल असावे याचा मोह व्हावा. माझ्याकडे आलेल्या जोडप्याची देखील अशीच स्थिती झाली होती. आपल्या दुसऱ्या घराचे स्वप्न त्या जाहिरातीमधील गृहप्रकल्पामध्ये ते पाहात होते. परंतु त्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांना त्याबाबतचा माझा सल्ला जाणून घ्यावयाचा होता.
‘रोटी, कपडा और मकान’ या अनुक्रमानुसार प्रत्येकाच्या बाबतीतल्या जीवनावश्यक बाबी. जो-तो आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार त्या परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो. पहिल्या दोन गरजांवर आयुष्यभर नियमितपणे खर्च करणे भाग असते. एकप्रकारे त्यावर आयुष्यभर प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार खर्च करावाच लागतो. मात्र, तिसरी गरज घराबाबतची, बहुधा आयुष्यात एकदाच व तीही बहुतेक वेळा सेवानिवृत्तीची वेळ जवळ आल्यावर करण्याचा अतापर्यंतचा प्रघात होता. अलीकडे मात्र डिंक (Double income No Kid) वा डिस्क (Double income Single Kid) संस्कृतीमुळे तरुण दाम्पत्याकडे मध्यमवयामध्येच दुसरे घर घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध असतो, तसेच विविध बँका घरासाठी कर्ज देऊ न आर्थिक मदत करणाऱ्या संस्था देखील घरखरेदीसाठी मदत करावयास तयारच असतात. त्यांच्या दृष्टिकोनातून घरासाठी कर्ज ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक असते. त्यामुळे घरामध्ये गुंतवणूक करणे तसे फारसे अवघड राहिलेले नाही.  आपले पहिले घर खरेदी करताना जेवढा चोखंदळपणे व काळजीपूर्वक घराबाबत सर्व बारीकसारीक तपशीलवार माहिती मिळविणयाचा प्रयत्न केला जातो, तेवढी खबरदारी दुसरे घर घेताना घेतलेली आढळत नाही. बहुतेकवेळा वर्तमानपत्रामधील आकर्षक जाहिराती, दलालाने वा ओळखीच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीवर विसंबून दुसऱ्या घराबाबतची खरेदी आणि तीही फारशी चौकशी न करता चक्क उरकण्यात येते. अशा प्रकारे केलेली खरेदी घरामध्ये केलेली गुंतवणूक न ठरता एक आर्थिक ओझे ठरण्याची शक्यता असते. माझ्याकडे आलेले पती-पत्नी दोघेही अत्यंत विचारी, चिकित्सक प्रवृतीचे होते. त्यामुळेच गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत व्यावसायिक सल्ला घेऊन तसेच सर्व बाबींचा साकल्याने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असे त्यांनी ठरविले असावे, असे त्यांच्याशी बोलताना लक्षात आले.
दुसरे घरखरेदीचा विचार करताना आपण ते नक्की कशासाठी करीत आहोत याचा प्रथम अगत्याने विचार करावयास हवा. सर्वसाधारणपणे दुसरे घर घेताना त्या घराचा प्रत्यक्ष उपभोग स्वत:साठी नजीकच्या काळात घेण्याचा विचार बहुधा नसतो. शक्यतो हप्त्याहप्त्याने गुंतवणूक करून भविष्यकाळासाठी आपल्या मुलाबाळांसाठी अजून एक वास्तू आपल्या नावे असावी, सुट्टीच्या काळात कुटुंबीयांसह निवांतपणे तिथे राहता यावे, भाडय़ाने देऊन दरमहा त्यापासून ठरावीक मासिक उत्त्पन्न मिळावे व त्यातून घरखरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड करता यावी, आर्थिक अडचणीच्या काळात बाजारभावानुसार ती विकून आर्थिक गरज भागवावी व गुंतवलेल्या रकमेवर नफा कमवावा किंवा सेवानिवृतीनंतरचा काळ निवांतपणे व्यतीत करण्याची सोय अशा माफक अपेक्षा दुसऱ्या घराची खरेदी करण्यामागे असतात. माझ्याकडे आलेल्या जोडप्याच्या देखील याच अपेक्षा होत्या. दोघेही आर्थिकदृष्टय़ा सक्षम व सध्याच्या सर्व आर्थिक गरजा सांभाळून अजून एका घराची जबाबदारी पेलण्यासाठी समर्थ होते. त्यांनी भविष्याचा विचार करून दुसऱ्या घरामध्ये गुंतवणूक करण्याबाबत विचार करणे निश्चितच स्वागतार्ह होते. परंतु एक व्यावसायिक म्हणून सल्ला देताना अशा गुंतवणुकीपासून भविष्यात होणारे सर्व फायदे-तोटे त्यांच्या नजरेस आणणे माझे कर्तव्य होते. सर्वसाधारणत: काही अपवाद वगळता दुसऱ्या घरामधील गुंतवणूक करताना ते सर्वानाच लागू होतात. त्यामुळे अशी गुंतवणूक करताना कोणती खबरदारी याविषयी चर्चा करू.
पहिले घर निर्वेध व पूर्णत: स्वत:च्या मालकीचे असावे
दुसऱ्या घरामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करण्यापूर्वी प्रथमत: सध्या वास्तव्यास असलेले घर आर्थिक दृष्टिकोनातून सर्वस्वी स्वत:च्या मालकीचे झाले असावे. याचे कारण- ते घर आपली गुंतवणूक नसून आपल्या व आपल्या परिवाराच्या निवासाची जीवनावश्यक गरज असते, त्यामुळे राहत्या घराचे बाजारमूल्य कितीही वाढले तरीही एखाद्याच्या आर्थिक क्षमतेचा विचार करताना त्याची किंमत विचारात घेता येत नाही. एकप्रकारे ते बहुमूल्य असते. आयकर कायद्यानुसार देखील एका घरापासूनचे उत्पन्न व त्याचे मोल पूर्णत: करमाफ असण्याचे कारण हे राहत्या घराची किंमत होऊ  शकत नाही, हेच असावे. त्यामुळेच त्या घराविषयीच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या घराबाबत विचार करणे केव्हाही योग्य ठरेल.
दुसरे घर हे आर्थिक गुंतवणुकीचे साधन मानावे
राहते घर स्वत:च्या नावे निर्वेधपणे झाल्यानंतर दुसऱ्या घराचा विचार आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या विचारात घेऊ न करावयास हरकत नाही. मात्र दुसरे घर ही आपली गरज नसून, ती एक आर्थिक गुंतवणूक आहे हे लक्षात असू द्यावे. म्हणजे त्याबाबत कोणताही विचार करताना भावना आड येऊ देऊ नयेत. बहुधा या बाबतीतच गल्लत होण्याची शक्यता असते. घराची खरेदी आर्थिक गुंतवणुकीचे साधन म्हणून करण्याचे ठरविले म्हणजे त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातदेखील बदल होतो व वेळप्रसंगी अशा गुंतवणुकीमधून बाहेर पडणे सहज शक्य होते. त्यामुळे दुसऱ्या घराच्या खरेदीमध्ये भावनात्मक गुंतवणूक नसावी.
दीर्घ मुदतीसाठी गुंतवणुकीचा विचार असावा
घरखरेदीमधील गुंतवणूक ही नेहमीच दीर्घ काळासाठी असावी. अल्पावधीमध्ये त्यात फायदा झाला तरीदेखील त्यापैकी मोठा वाटा आयकरापोटी शासनजमा करावा लागतो. त्यामुळे हाती निव्वळ लाभ फारसा राहात नाही. दीर्घ मुदतीच्या घरामधील ( प्रचलित आयकर कायद्यामधील तरतुदीनुसार किमान तीन वर्षांसाठी) गुंतवणुकीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा समजला जातो. त्यावर सवलतीच्या दराने  करआकारणी वा पुर्नगुतवणूक करून संपूर्ण करमाफी घेता येते. त्यामुळे दुसरे घर घेताना त्यामध्ये होणारी आर्थिक गुंतवणूक किमान तीन ते पाच वर्षे काढता येणार नाही, याचा सुरुवातीलाच विचार करायला हवा. अन्यथा त्यापासून लाभ होणे तर दूर, मात्र नुकसान कमी करण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची वेळ येऊ  शकते. सध्याच्या आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी दुसऱ्या घरामध्ये करावयाची गुंतवणूक अडथळा न ठरता, त्यासाठी फारशी दमछाक होणार नाही याची पुरेशी काळजी घेऊ नच दुसऱ्या घरामध्ये गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घ्यावा.
कायदेशीर बाबींबाबत स्वत: वा तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा
एकदा दुसरे घर घेण्याबाबतचा निर्णय पक्का झाला की त्याबाबत वर्तमानपत्रे तसेच विविध माध्यमांतून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती, ओळखीच्या व्यक्तींनी, दलालांनी सुचविलेल्या जागा या सर्वाचा डोळसपणे विचार करायला हरकत नाही. मात्र या सर्व माध्यमांमधून मिळणारी माहिती ही त्या जागांच्या विक्रीसाठी केलेली जाहिरात असून, त्यामध्ये दिलेली माहिती तसेच दर्शविलेली आकर्षक चित्रे वस्तुस्थितीस धरून असतीलच असे नाही. (बहुधा अशा जाहिरातींमधील दृश्याबाबत आपली जबाबदारी असणार नाही अशी बारीक अक्षरांत तळटीप दिलेली असते.) अशा जाहिरातींमधील माहितीवर विसंबून गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत स्वत: खात्री करून घ्यायला हवी. अनेकदा संबंधित प्रकल्पामध्ये आधी गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार खरी माहिती हेतुत: सांगत नाहीत वा सांगितल्यास ती खरी असेलच असे नाही. त्यासाठी स्वत:च विकासकाला भेटून आपल्या सर्व शंकाचे निरसन करून घेतले पाहिजे. प्रकल्पासाठी घेतलेली जमीन, विकासकाकडे त्याबाबत असलेले हक्क, जमिनीचे नामाधीमान व त्यावरील बांधकाम चोख व विक्रीयोग्य असल्याबाबत तसेच त्याची विक्री करण्याचा अधिकार विकासकाला असल्याबाबतचे प्रमाणपत्र, बांधकामाबाबत विविध शासकीय परवानग्या, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा अवधी, करारामध्ये नमूद केलेल्या मोबदल्याच्या रकमेव्यतिरिक्त अन्य छुपी रक्कम द्यावी लागणार नाही, याबद्दल करारात स्पष्ट उल्लेख.. अशा सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबींची तपासणी तज्ज्ञाकडून करून घ्यावी व त्यानंतरच गुंतवणूक करावी. याबाबतीत महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी की, गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेतल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. दुसऱ्या घराची खरेदी गुंतवणूक म्हणून करावयाची आहे त्यासाठी खर्च केलेली रक्कम विनाकारण गुंतून राहणार नाही ना? याबाबत स्वत:ची पूर्ण खात्री झाल्याशिवाय घाईघाईत कुणाच्या बोलण्यावर वा जाहिरातीतील माहितीवर विश्वास ठेवून आपला कष्टाने मिळवलेला पैसा गुंतून पडणार नाही याची खात्री करूनच गुंतवणूक करा.
दुसऱ्या घरापासूनचे उत्पन्न करपात्र असते
बहुधा दुसऱ्या घरामधील गुंतवणूक करताना त्यापासून मिळणारे मासिक भाडय़ाचे उत्पन्न, त्यामधून ते खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची परतफेड व बाजारभावामध्ये होणाऱ्या वाढीमुळे होणारा भांडवली लाभ नजरेसमोर ठेवून घरखरेदी केली जाते ती योग्यच आहे. घराच्या खरेदीसाठी घेतलेल्या कर्जफेडीच्या हप्त्याची रक्कम आयकर कायद्यामधील ८० (क) कलमांतर्गत असलेल्या विविध गुंतवणुकीसह करपात्र उत्पन्नामधून रु. १००,०००/- वजा करता येते. त्याव्यतिरिक्त व्याजापोटी दरवर्षी रु. १,५०,०००/- वजा उत्पन्नामधून वजा करता येतात. दुसऱ्या घराची गुंतवणूक करताना आयकर कायद्यामधील याच तरतुदीचे प्रत्येकास आकर्षण वाटते, पण ते तितकेसे खरे नाही. दुसऱ्या घरापासून कोणताही आर्थिक लाभ नसला तरीदेखील ते तुमच्या नावे असल्यास त्यापासूनचे प्रचलित बाजारभावानुसार मिळू शकणाऱ्या भाडय़ाच्या संभाव्य उत्पन्नावर आयकर भरावा लागतो हे बहुधा कुणाच्याही ध्यानी नसते. त्यामुळे दुसऱ्या घरामधील गुंतवणूक भविष्यात वाढीव कारभाराला निमंत्रण देऊ  शकते, याचाही विचार करायला हवा.
दुसऱ्या घरामधील गुंतवणूक करताना वर नमूद केलेल्या बाबींचा प्रत्येकाने आपापल्या आर्थिक जबाबदाऱ्या, उत्पन्न, घरच्या गुंतवणुकीपासूनच्या आपल्या अपेक्षा, तसेच नियोजित घराचे स्थान, येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ, प्रवासाची साधने, या सर्व बाबतीत साकल्याने विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. घराची खरेदी करताना केवळ त्यापासून होणारा आर्थिक लाभच विचारात घेतला जातो असे नाही.
बहुतेक वेळा दुसऱ्या घराची खरेदी करताना भविष्यातील कुटुंबविस्तार, मुलांचे शिक्षण- व्यवसायानिमित्त होणारे स्थलांतर, भविष्यात जागेच्या किमतीत होणारी वाढ विचारात घेता, सध्या सहज शक्य असलेले भविष्यात दुरापास्त होईल याचा विचार दूरदृष्टीने करून भविष्यात होणाऱ्या लाभाकडे पाहून निर्णय घेतला जातो. तसा तो घेणे योग्यही असतो. मात्र त्यापूर्वी वर नमूद केलेल्या बाबी काळजीपूर्वक तपासून पाहिल्यास दुसऱ्या घराची खरेदी केवळ आर्थिक क्षमता आहे म्हणून केली जाणार नाही, तर भविष्यात तिच्या खरेदीमुळे चांगला अर्थलाभ होईल; तसेच प्रलोभनाला भुलून चुकीच्या खरेदीमुळे होणारा मनस्ताप व आर्थिक नुकसान टाळले जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 3:28 am

Web Title: mission for second home
Next Stories
1 स्वयंपाकघरातील ‘खल-बत्ता’
2 झोपडपट्टी निर्मूलन की संरक्षणाचे विस्तारीकरण
3 प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राचं महदाश्चर्य – उच्छिपिलयार विनायक मंदिर
Just Now!
X