News Flash

आधुनिक स्वयंपाकघर

भारतीय जीवनशैलीमध्ये किचनला अर्थात स्वयंपाकघराला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

भारतीय जीवनशैलीमध्ये किचनला अर्थात स्वयंपाकघराला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आजकाल सगळेजण घराचे इंटिरिअर करताना उपयुक्तता आणि स्टाईल याबद्दल विचार करत असताना दिसतात. आपण जसे आपले लिव्हिंग रूम, बेडरूम याबद्दल जागरूक असतो, त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकघराबद्दलही सतर्क असणे फार महत्त्वाचे आहे. कारण आपले स्वयंपाकघर हे नुसतेच स्वच्छ असून चालणार नाही तर ते फारच उपयुक्तही असले पाहिजे. थोडक्यात, त्याचे डिझाईन परफेक्ट असणे ही आपली गरज आहे. स्वयंपाक बनवताना जर का आपण कुठल्याही कारणामुळे आनंदी नसलो तर त्याला काहीही महत्त्व नसते. बऱ्याचदा असे लक्षात आले आहे की, स्वयंपाकघराचे प्लॅनिंग व्यवस्थित नसल्यामुळे तिथे काम करणाऱ्या व्यक्तीच्या कार्यपद्धतीवर त्याचा विपरित परिणाम होतो. आता आपण थोडक्यात बघू की स्वयंपाकघराचे प्लॅनिंग कसे करायचे आणि त्याची उपयुक्तता कशी वाढवायची.

मॉडय़ुलर किचन- या पद्धतीचे स्वयंपाकघर आता तसे काही नवीन राहिलेले नाही. बहुतेक लोक या पद्धतीचा वापर करतात. मॉडय़ुलर किचन पद्धतीचा लुक अतिशय आधुनिक पद्धतीचा असतो. हे स्वयंपाकघर दिसताना अतिशय आधुनिक पद्धतीचे दिसते आणि त्याचा योग्य वापर केला तर पूर्ण इंच-इंच जागा आपण वापरू शकतो. या पद्धतीच्या स्वयंपाकघरामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला एक जागा देऊन छान स्पेस तयार करू शकतो. जसे- त्याच्यामध्ये ड्रॉवर्स असतात, त्यानंतर अ‍ॅडजेस्टेबल शेल्फ असतात, पूलआउट कॅबिनेट असतात, बीनहोल्डर्स असतात, चमच्यांसाठी वेगळ्या पद्धतीचे ड्रॉवर्स असतात. अशा वेगवेगळ्या आणि छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी आपण या पद्धतीच्या स्वयंपाकघरामध्ये जागा तयार करू शकतो.

असे सुनियोजित स्वयंपाकघर हे वापरायला सोपे असते. शिवाय यात देखभालखर्चही कमी असतो. आपल्याला मॉडय़ुलर पद्धतीचे स्वयंपाकघर बनविताना वेगवेगळ्या पद्धतीची रंगसंगती वापरता येते. याशिवाय आपण ग्लास, अ‍ॅक्रॅलिक, लॅमिनेट यांचाही वापर शटर बनवण्याकरता करता येतो. या पद्धतीचे स्वयंपाकघर हे कस्टमाईझ असते, ते तुमच्या गरजेनुसार बनवता येते.

किचन टॉप- आता आतापर्यंत आपल्याकडे किचन टॉपसाठी थोडक्यात ओटय़ासाठी ग्रॅनाईट किंवा मार्बल वापरले जायचे. आता ते विविध रंगांमध्येही उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सुंदर रंगसंगतीचे स्वयंपाकघर बनवू शकतो. आज-काल काही ठिकाणी ओटय़ासाठी स्टेनलेस स्टीलचा टॉप बनवतात. या शिवाय इंजिनीअर स्टोन नावाचे मटेरियल बाजारात उपलब्ध आहे, जे किचन टॉपसाठी वापरता येते.

किचन सिंक- हा स्वयंपाकघरामधला फारच महत्त्वाचा भाग. स्वच्छतेबरोबरच उपयुक्त असणेही महत्त्वाचे. आता फक्त भांडी धुणे इतपतच सिंकचा वापर नाहीये. तर आजकाल काचेची भांडीही नियमितपणे वापरली जातात. शिवाय आपण भाज्याही याच सिंकमध्ये धुतो. त्यामुळे जागा असेल तर डबल बाऊलचे सिंक वापरणे. आपल्या वापरानुसार सिंकचे डिझाईन आणि मटेरियल फायनल करणे. पण लक्षात असू द्या की, आपल्या स्वयंपाकघरामधली स्वच्छता ही सिंकवरही अवलंबून असते.

इलेक्ट्रिक उपकरणे- स्वयंपाकघरात इलेक्ट्रिक उपकरणांची फारच महत्त्वाची भूमिका असते. स्वयंपाकघराचे काम सुरू केले की आपण उपकरणांची खरेदी करणे आवश्यक असते. कारण मॉडय़ुलर किचन पद्धतीमध्ये आपल्याला उपकरण फिट करण्याकरता व्यवस्थित जागा द्यायला लागते.

होब, चिमणी, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर या अशा अनेक प्रकारच्या उपकरणांसाठी एक वेगळी जागा द्यायला लागते. स्वयंपाकघर तयार झाल्यानंतर यांना जागा देणे हे शक्य नाही. त्यामुळे त्याची खरेदी आधीच झाली पाहिजे. याशिवाय आज-काल मार्केटमध्ये बिल्ट इन म्हणजेच कपाटात फिट होतील अशी इलेक्ट्रिकल उपकरणे पण छान मिळतात. छोटय़ा स्वयंपाकघरासाठी ते फारच उपयुक्त असतात. टॉलयुनिटमध्ये ते परफेक्ट बसतात आणि एक परिपूर्ण स्वयंपाकघर तयार होते. हे सगळे करताना किंवा जागा ठरवताना स्वयंपाकघराच्या गोल्डन ट्रँगल या रुलनुसार वापर केला तर जास्त योग्य ठरेल.

दिवे- स्वयंपाकघरामध्ये दिव्यांना फार महत्त्व असते. नैसर्गिक उजेडाबरोबरच दिव्यांनाही फार महत्त्व आहे. कारण काही घरांमध्ये पुरेसा उजेड नसतो. त्यामुळे दिवसभर किंवा काम करताना आपल्याला दिव्यांची गरज पडते. त्यामुळे दिव्यांची निवड करताना आणि त्याची जागा ठरवताना फार काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचदा आपण बघतो की ओटय़ावरच टय़ूब लाईट लावलेली असते. फोडणीमुळे ती टय़ुब कालांतराने चिकट होते. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपण सिलिंग लाईटचा वापर करू शकतो. जर का स्वयंपाकघरामध्ये फॉल्स सीलिंग केले नसेल तर सरफेस फीटिंगचाही वापर होऊ  शकतो. याशिवाय कॅबिनेटच्या खालीही लाईट देता येतात. ओटय़ाचा आराखडा तयार करून आपण टय़ुबलाइटही फिट करू शकतो. आज-काल बाजारात जे एलइडी लाइट उपलब्ध आहेत त्याचा वापर करणे आवश्यक आहे. जर का ओपन किचन पद्धत असेल तर आपण हँगिंग लाईटचाही वापर करू शकतो आयलँड किचनसाठी लाइटिंगची आखणी थोडी वेगळी करायला लागते. या सगळ्यासाठी लाईटसाठी आधी स्वयंपाकघराचा आराखडा तयार करतानाच लाईटचाही आराखडा केला तर योग्य ठरते.

युनिव्हर्सल डिझाइन- ओटा बनवताना त्याच्या उंचीचे, डीपचे असे काही प्रमाण ठरवलेले असते, त्यानुसारच आणि त्याच कॉम्बिनेशनमध्ये जर का ओटा बनवला तर आपल्याला बरेच वेगवेगळे जागतिक प्रसिद्ध ब्रँडही वापरता येतात. ट्रॉली आणि स्टोरेजसाठी. जर का स्टॅडर्ड मेजरमेंट असते तर आपले स्वयंपाकघर आपल्याला इकॉनॉमिक रेंजमध्ये बनवता येते, पण जर का वेगळे माप घेतले गेले तर मात्र आपल्याला ते त्या मापानुसार बनवून घ्यायला लागते.

किचन ट्रॉली बनविताना त्या साध्या स्टीलच्या नाही, तर उत्तम दर्जाच्या स्टीलच्याच बनवा. त्याला लागणारे हार्डवेअर हे उत्तम क्वालिटीचे वापरावे. शिवाय त्या ट्रॉलीमध्ये किती जड समान ठेवणार आहे त्या लोडनुसार हार्डवेअरचा वापर करावा. याबरोबरच आपल्याकडे कांदे-बटाटे हे कपाटात राहत नाहीत, त्यामुळे त्याची जागाही ठरवावी. आजकाल त्यासाठीही ट्रॉली सिस्टीममध्ये सुंदर ऑप्शन्स आहेत

याशिवाय स्वयंपाकघराचा वापर वेगवेगळ्या वयातील लोक करत असतात, त्यामुळे ते डिझाइन करताना घरातील प्रत्येकाला सोयीचे झाले पाहिजे. थोडक्यात काय, तर पाण्याचे भांडे/ माठ किंवा पिंप यांतून मुलांनाही पाणी घेता येईल अशा उंचीवर ठेवणे. रोजचे लागणारे डबे, मसाले यांची जागा एका विशिष्ट उंचीवर करणे; जेणेकरून त्याचा वापर पटकन करता येईल आणि शोधायला वेळ जाणार नाही.

स्वयंपाकघरामध्ये शक्यतो फ्लोअरिंगसाठी अँटी स्किड टाइल्स वापराव्या, सॉलिड काउंटर टॉप वापरावे आणि आपण जी कपाट बनविणार आहोत ती आधुनिकतेबरोबरच उपयुक्त ठरावी या पद्धतीने त्याचे डिझाइन करून घ्यावे.

लक्षात घ्या, आपले स्वयंपाकघर हे स्टोअर रूम नाहीये. त्यामुळे ते अतिशय सुरेख बनवा. आपण स्वत: सगळे घर जेव्हा आधुनिक पद्धतीने बनवितो तेव्हा स्वयंपाकघरही आधुनिक पद्धतीचे बनवा.

– कविता भालेराव

kavitab6@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 11:19 pm

Web Title: modern kitchen
Next Stories
1 व्यायाम, फिटनेस किटस् आणि बरेच काही!
2 बाल्कनीतील छोटुशी बाग 
3 विमानांनी उडावं ते प्रधानांकडे!
Just Now!
X