22 April 2019

News Flash

जिना

दिवाळी अगदी तोंडावर आली होती. परीक्षा आटोपल्यामुळे अभ्यासाचा ससेमिरा संपला होता.

|| सुचित्रा साठे

दिवाळी अगदी तोंडावर आली होती. परीक्षा आटोपल्यामुळे अभ्यासाचा ससेमिरा संपला होता. त्यामुळे सगळी बच्चे कंपनी किल्ला करण्यात दंग झाली होती. किल्ला बांधून झाल्यावर पायऱ्या करण्यासाठी छोटय़ा चपटय़ा दगडांची किंवा टाइल्सच्या तुकडय़ांची शोध मोहीम चालू झाली. ते तुकडे आणून किल्ल्यावरच्या ओल्या मातीत खोचले गेले. बघता बघता वपर्यंत पायऱ्या तयार झाल्या. त्या बघताना मनात विचार आला की, जिन्याची कल्पना अशीच सुचली असेल का? डोंगर काढताना सपाट सपाट जागा बघून त्यावर पाय टाकून वरती जायचं म्हणजे नैसर्गिक जिनाच की.

..आणि मग प्रगतीच्या एका टप्प्यावर घराला आडवं पसरायला काही कारणानं शक्य नसेल, मर्यादा असतील, तेव्हा ‘वर’ जाण्याची कल्पना सुचली असेल. पण ‘वर’ जायचं कसं, याचं उत्तर डोंगराच्या पायऱ्यांनी बनलेल्या ‘जिन्यानं’ दिलं असेल आणि ‘तिरका’ जिना अस्तित्वात आला असेल. ‘मोबाइल’ शिडी म्हणजे हलणारा जिना हे त्याचं पहिलं स्वरूप असेल. मग सोईचा, सुलभतेचा, सुरक्षेच्या विचाराने तो एका जागी जाम झाला असेल. वास्तुरचनेचा आवश्यक भाग झाला असेल. भोंडल्याच्या एका गाण्यात ‘बाणांचा मग जिना रचियला, भीम तरी स्वर्गासि निघाला’ असा याचा गमतीदार उल्लेख आढळतो.

..तर आपल्याला सरळ रेषेत वर-खाली करता यावं म्हणून नेहमी तिरका राहणारा हा जिना घराला चिकटलेला असतो. जमिनीलगत असलेल्या झोपडीत कदाचित तो नसेल, पण बैठं घर- अगदी कौलारू घर असलं तरी तीन-चार पायऱ्यांच्या ‘बोन्साय’ रूपात तो हजर असतो. सर्वसाधारणपणे बंगला असला की गच्ची असतेच आणि मग घरातून किंवा बाहेरून जिना हवाच. घराची उंची वाढत गेली की याला पर्यायच नाही, असा हा आवश्यक घटक.

हा जिना लाकडी, लोखंडी, जास्त करून सिमेंटच्या रूपात असतो. बहुतेक दोन्ही बाजूला कठडे, कधी एका बाजूला भिंत जागेच्या उपलब्धतेनुसार कमी-जास्त रुंदी, पाऊल मावेल एवढय़ा रुंदीच्या पायऱ्या, दोन पायऱ्यांमधील अंतर जरा जास्त असलं, गुडघ्यांवर भार पडत असला की तो ‘अवघड’ होतो, अंतर बेताचं सोयीस्कर असलं की सुखावह. वरच्या मजल्यावर जाताना साधारण दहा-बारा पायऱ्या एका दिशेने वरती जायचं आणि मग एकदम एकशे ऐंशी अंशातून ‘पीछे मूड’ करत पुन्हा तेवढय़ाच पायऱ्या पार करायच्या. घरातले जिने कधी कधी थोडेसे अरुंद आणि जरा उभे असतात. अडगळीच्या सामानाला, लपाछपीला ‘जागा’ ठेवतात. स्प्रिंगसारख्या नक्षीकाम केलेल्या लोखंडी जिन्यावरून जाताना ‘जपून टाक पाऊल जरा’ हे ध्यानात ठेवावं लागतं. मालिकांमधील रुंद, देखणे, गुळगुळीत पायऱ्यांचे वळणदार जिने बघताना काळजाचा ठोकाच चुकतो. कसाही असला तरी ‘जीना यहाँ’ म्हणत आयुष्यातील प्रगतीशी नातं जोडत असतो.

घरातला जिना तर जणू बैठक व्यवस्थेचा एक भाग असतो. त्याच्या कठडय़ावरून घसरगुंडी करणं हा बालगोपाळांचा आवडता खेळ. लहानग्याला पाय फुटले की त्याचा मोर्चा सतत या जिन्याकडेच असतो. मग पाय वर करून वरची पायरी गाठण्याचा अगदी आटापिटा चालतो. अगदी चाळाच लागतो. पायरी चढता आली तर आजूबाजूला विजयी मुद्रेने बघितलं जातं. कौतुकाची अपेक्षा डोळ्यात तरंगते. त्याच आनंदात घरातल्यांचा डोळा चुकवून हे साहस करायचं. मग पडझड, त्या पाठोपाठ वाजणारा बॅण्डबाजा ठरलेलाच. जिन्याच्या कठडय़ाला नक्षी असेल तर त्यात हात अडकून पुन:पुन्हा ‘सूर’ लागणारच. कावळा चिमणीची गोष्ट सांगत पायऱ्यांवर वर-खाली करणाऱ्या छोटय़ाची पोटपूजा या जिन्याच्या साक्षीनेच होत राहते. छोटेच कशाला, मोठेही जिन्याच्या पायरीवर ‘टेकणं’ पसंत करतात. घरात बरेच पाहुणे जमले की गाडीच्या खिडकी, बसावे तशी जिन्याची पायरी अडवण्याची जणू स्पर्धाच रंगते. जिवाभावाच्या सख्या, बहिणी, आजीच्या लेकी, नाती यांच्या कान गोष्टींसाठी ही एक निवांत जागा.

जिना बाहेर असला तरी माणसाळलेला असतोच. कंटाळा आला की जिन्यावर बसायचं, हा नियम. घरात धुसपुस झाली की वातावरण निवळेपर्यंत सासुरवाशिणींना जिन्याची हक्काची सोबत असते. भरदुपारच्या वेळी फारशी वर्दळ नसताना आणि घरातल्यांना शांत झोप हवी म्हणून भातुकलीचा डाव या जिन्यातच रंगतो. तसेच चोरटय़ा भेटीचे, नजरेची शोधमोहीम यांचा हा साक्षीदार असतो. जिन्याच्या चार पायऱ्या उतरून कठडय़ावर रेळून खालच्या मजल्याचा अंदाज घेणं, निरोपाची देवघेव याच्यामुळे शक्य होते.

जिना चढण्याची आणि उतरण्याची एक शैली असते. तिचं वयाशी घट्ट नातं असतं. लहान मुलं कितीदा धाडधाड करत जिना उतरतात-चढतात याचा हिशेबच नसतो. तरुणाई आणि कॅलरीजच्या गणिताशी गट्टी असणारे एक ‘व्यायाम’ म्हणून त्याच्याशी दोस्ती करतात. ज्येष्ठ नागरिक मोजून मापून आपलं आणि हातातले वजन सांभाळत बाजूच्या दांडय़ाच्या आधाराने ये-जा करतात. वयोवृद्ध झालं की याची धास्ती वाढू लागते. कारणपरत्वे खुर्चीत बसूनच वरखाली करावे लागते.

लहान मुलं सरळ जिना कधीच चढणार नाहीत. एक सोडून एक, एकदम दोन-दोन पायऱ्या, ढांगा टाकत जाणार, उतरणार ही त्याच मस्तीत. शेवटच्या तीन-चार पायऱ्यांवरून तर उडी उरलेली. वयाचा आलेख चढत गेला की एका  लयीत नियमाने प्रत्येक पायरीची नोंद घेतली जाणार. शेवटची पायरी चढली की हुश्श करणार. तब्येत नाजूक असेल तर छातीचा भालाच होतो. श्वासाची गती वाढते आणि दोन मिनिटे शब्द फुटत नाही. प्रत्येकाची ‘स्टाइल’ वेगळी. केवळ या पादरवाने जिन्यावरून कोण चाललंय, तो अंदाज बांधता येतो.

जिन्याने आपण वरखाली जा-ये करत असलो तरी जिना म्हणजे प्रगती अशी खूणगाठ मनाशी पक्की आहे. म्हणूनच आपण ‘यशाच्या’ पायऱ्या चढत जातो. हा जिना रोजच्या रोज झाडून अधून-मधून धुऊन स्वच्छ ठेवला जातो. दिवाळीत किंवा लग्नमुंजीत जिन्याच्या पायऱ्यावर दोन्ही बाजूला रंगीत रांगोळी काढते. पण त्या ठेवतो. गौरी गणपतीत गौरीची पावलं काढतो. खूप पाहुणे आले की मात्र याला चपलांची राखण करावी लागते.

हीच पायऱ्या पायऱ्यांची कल्पना चैत्रगौरीच्या सजावटीत वापरली जाते. दोन मजल्यांच्या मधल्या जिन्याच्या भागात खिडकी असेल किंवा मोकळी जागा असेल तर याचे रूप चटकन् नजरेत भरते. काळोख असेल तर मात्र जरा संभाळूनच जा-ये करावी लागते. कधी कधी मधली जागा त्रिक्षकोणी केली जाते, हे मात्र धोकादायकच. जिन्याचे कोपरे रंगू नयेत म्हणून देव-देवतांच्या तसबिरीच्या टाइल्स बसवण्याची वेळ यावी, ही मात्र खटकणारी गोष्ट.

अर्धशतकाचा उंबरठा ओलांडून मागे पाहिले तर इमारतींना तीन ते चार मजलेच दिसून येतात. त्यामुळे पर्याय नव्हता. परंतु काळाच्या ओघात कमीतकमी जागेत जास्तीत जास्त माणसं सामावून घेण्याची वेळ आल्यामुळे उंच उंच मनोरे रचले गेले. त्यात लिफ्टमुळे सगळेच सहज, सुलभ झालं. परिणामी जिने बिचारे एकाकी पडले. एखादीने हौसेने दारापुढे रांगोळीतून दिनविशेष रेखाटले, नावीन्यपूर्ण सजावट केली तर ती दुर्लक्षित राहू लागली. ती पुसली गेली नाही. पण कौतुकाने मोहरलीही नाही. आता तर इमारतीत नाही, पण इतरत्र जिने सरकायला लागले आहेत. पण असं असलं तरी जिन्यांच्या अस्तित्वावर कधीच गदा येणार नाही. त्यांचा वापर होणार नाही इतकंच. लिफ्ट सर्वाना फुलासारखे उचलून नेईल. क्वचित कधी विजेने ‘राम’ म्हटला तरच जिन्यांवर पायधूळ झाडली जाईल, तेवढाच ‘तो’ सुखावेल. एरवी ‘जी’ना यहाँ’, असंच तो खेदाने म्हणत राहील.

suchitrasathe52@gmail.com

First Published on August 18, 2018 12:39 am

Web Title: modern staircase designs