सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी करकसारख्या छोटय़ाशा खेडय़ातील अर्जुना नदीवर धरण बांधायचं ठरलं आणि आमच्या घरातील सर्वाचं, त्या घराशी संबंधित नातेवाईकांचं मन अस्वस्थ झालं.
करक या निसर्गरम्य खेडय़ात माझं सासरचं मूळ घर होतं. छान लाल भिंती, लाल कौलांचे टुमदार घर. करकमधल्या घराला मातृत्वाचा ओलावा होता. लग्नानंतर या घराचं माप ओलांडलं आणि मी या घराची सदस्य झाले. या घरातल्या अनेक घटना, प्रसंग, उत्सव सण-समारंभ, हास्य-विनोद मनावर कोरले गेले. धरण झाल्यावर इथून स्थलांतर करावं लागणार हे कळल्यापासून सर्वजण अस्वस्थ झाले. अखेर तो दिवस उगवला..
छान कौलारू घराभोवती मोठ्ठं आवार. त्या आवारात आंबा, फणस, साग, रामफळ, पेरू, चिकू, बकुळ आणि विविध फुलांची झाडं. पुढच्या दारी गोड पाण्याची साधी विहीर. विहिरीजवळ चूल केलेली. पाणी तापविण्यासाठी एक सपाट पाथर टाकून आंघोळ, कपडे धुणे याकरिता सोय केलेली. जवळच उंबराला पार बांधलेला. पारावर मारुतीची मूर्ती (कुणा वंशजांना नदीत मिळालेली) विहिरीवर हातरहाट आणि आजूबाजूला गर्द झाडी. शांत, पवित्र अशी जागा. जवळच छोटय़ाशा जागेत सणांप्रमाणे वेगवेगळ्या फुलांची बाग असायची. सदाफुली वेडय़ासारखी परसावभर फुललेली, नवरात्रीत झेंडूंची, गणपतीला विविध प्रकारच्या गुलबक्षी. विविध जास्वंदीचे प्रकार बारा महिने फुलायचे. कुंदाने मात्र अंगणातल्या बांधावर हक्काने जागा पटकावलेली. तो फुलला की मस्त अंगणाभोवती पांढरा गालिचा तयार व्हायचा. नेहमीप्रमाणे बकुळी संन्याशासारखी कुंपणाच्या कडेला उभी राहून फुलांचा सुगंध देत राहायची. कुणी बघा न् बघा. पाणी घाला न् घाला. ‘मी फुलं आणि फळं देण्याचं काम करणार,’ अशा आवेशात उभी असायची. बोगनवेली पुढच्या आणि पाठच्या बेडय़ाच्या (गेट) दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासारख्या उभ्या. अंगणावरचा मांडव घराला शोभा आणि गारवा द्यायचा. घराच्या उजव्या बाजूला गुरांचा गोठा-तोही लेकुरवाळा. तानपी पाडशी म्हैस, गाय, वासरं, रेडकं गोठा भरलेला आणि स्वयंपाकघरात दूधदुभतं भरभरून.
सकाळी सूर्योदयाला दारातल्या पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या कट्टय़ावर बसून पहाटेच्या अंधूकशा प्रकाशाला बाजूला सारत उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन घेणं हा अविस्मरणीय अनुभव. समोर अजस्र, अवाढव्य सह्य़ाद्रीचा कडा. सूर्यदर्शनाबरोबर पक्ष्यांचं कूजन- जणू काही पहाटेचा रियाझ चालू असायचा. का या सूर्यदर्शनाची आस? कामाच्या व्यापात हे विलोभनीय दर्शनाचं सुख फारसं घेता येत नसे. परसभर आंबा, चिकू, पेरू, रामफळ, केळी यांची झाडं विखुरलेली. तोंडली, काल्र्याचा एखादा वेल, पावसाळ्यात पडवळ, काकडी, दोडका यांचा मांडव पुढे-पाठी असायचा. परसाच्या एखाद्या कोपऱ्यात उन्हाळी वाफ्यांचा चौक सजलेला, त्यात कोथिंबीर, लाल माठ, मेथी आणि अळू असायचे. सकाळी-संध्याकाळी पाणी घालणं हा आनंददायी कार्यक्रम. छोटय़ा रोपांना न दुखावता कळशीने, पण हातांच्या बोटातून अलगद पाणी घालावे लागे. घरात छोटी-मोठी मुलं, मांजरं, गडी माणसं एखादा खानावळवाला. एखाद-दुसरा पाहुणा, आम्ही चार जोडपी, गोठय़ात गुरं, परसात विविध झाडं. घर कसं लेकुरवाळं. पाठच्या अंगणात दरवर्षी वेगवेगळ्या आकाराचे मातीचे वृंदावन. जवळच गोबरगॅसची टाकी. गप्पांचा फड त्या टाकीच्या कठडय़ावर बसून छान जमायचा. पाठचं अंगण तसं छोटं, पण तिथे बसून गप्पा मारणं, आंबे खाणं, फणस निवडणं; सोबत पश्चिमेकडील वाऱ्याचा आनंद घेणं छान जमून यायचं. समोर दूरवपर्यंत भाताच्या मळ्या. त्यापुढे आंबा, जांभू आणि केळीची हिरवीगार बाग. केळीचे घड, जांभूचे घोस, लगडलेले आंबे पाहताना तिथून हलूच नये असं वाटायचं. पावसाळ्यात मळ्यामळ्यांनी भाताचा हिरवागार शालू ल्यायलेला असायचा. घराच्या कुठच्याही बाजूला पाहिलं तर सगळं कसं तारुण्याने भारलेलं, भरलेलं हिरवंकंच, कोवळं भात दिसायचं. कधी पोपटी, हिरवं, हिरवं-पिवळं, पिवळं जणू आयुष्याच्या स्थितीचं दर्शनच!
सणावाराला बायकांची गडबड, मुलांची धडपड, पुरुषांची बडबड चालूच. पालखी दारात येणं जणू माहेरवाशीण येण्यासारखं. ती येणार म्हणून अंगण सारवणं, तिच्या बैठकीच्या जागी रांगोळी घालणं, तिच्यासाठी गोडाचा नैवेद्य आल्यावर तिच्या खुरांवर दूध-पाणी घालून, आरती- पूजा करून ओटी भरणं, गाऱ्हाणं घालून सर्वाना गूळ पाणी देऊन वर दक्षिणा देणं. गोडाचा नैवेद्य दाखवून तिची पाठवणी करणं, सारं काही यथासांग पार पडे.
पावसाळ्यात पिरपिरणारा आणि मुसळधार पाऊस पाहायला मजा यायची. पाऊस आठवडा आठवडा पडतच राहायचा आणि तो थांबला तरी झाडांवरचं पाणी आणि पागोळ्या गळतच राहायच्या. त्यांचा आवाजही तालात असायचा. बेडकांचे मंत्रोच्चार सतत चालूच असायचे. नदी तर काय आनंदाने दुथडी भरून रोऽरोऽ आवाज करीत वाहत असायची. सगळीकडे काळोख, हिरवंगार, ओलकंच, गारेगार असायचं. शेतात शेतकरी कामाला लागलेले असायचे. गावाकडे घडय़ाळाकडे दुर्लक्षच, पण सगळं वेळेत चालायचं. सगळे सण उत्सव एकत्र पार पडायचे. नवरात्रोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा व्हायचा. सकाळपासून रात्रीपर्यंत पूजा-अर्चा सोवळे-ओवळे, चहा-पाणी- खाणी, नैवेद्य जेवणं आला-गेला नुसती धामधूम, पण या आनंदात जीव थकत नसे. घर एकौशी असल्याने घरात गप्पा-टप्पा पहाडी आवाजात कुजबुज वगैरे नाहीत. सगळं कसं मोकळं ढाकळं.
या घरात सुख-दु:खाचे प्रसंग आले, रुसवे-फुगवे झाले. हास्यविनोद झाले, वादविवाद झाले, पण नात्याच्या रेशीमगाठी घट्ट आणि बळकट राहिल्या. शेवटपर्यंत आमचं घर आनंदी, समृद्ध होतं. अशा या घराला अलविदा करताना आनंद आणि दु:ख अशा संमिश्र भावनांनी मन उचंबळून आलं, पण वाईट वाटून नाही घ्यायचं, अशी समजूत केली. या वास्तूच्या आशीर्वादाने सर्वाना स्थैर्य, सुख-शांती, समृद्धी लाभली. पाच भावंडांची पाच घरं झाली आणि.. आणि.. आमचं घर लेकुरवाळं झालं.