27 February 2021

News Flash

हिबा आणि हिबानामा

‘मुस्लीम पर्सनल लॉ’नुसार ‘हिबा’ला Part of Contract Law म्हटले गेल्यामुळे हिबासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते.

(संग्रहित छायाचित्र)

धनराज खरटमल

‘हिबा’ अथवा ‘हिबानामा’ या संदर्भात मुस्लीम कायद्याअंतर्गत काय काय तरतुदी आहेत. याअनुषंगाने मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील तरतुदी नमूद करणारा लेख..

‘वास्तुरंग’ पुरवणीतील माझा बक्षीसपत्रासंबंधातील लेख वाचून पुण्यातील एका व्यक्तीने मला ई-मेल पाठवून मुस्लीम कायद्याअंतर्गत करण्यात येणारे ‘हिबा’ अर्थात बक्षीसपत्र याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यास सुचविले. त्या अनुषंगाने ‘हिबा’ अथवा ‘हिबानामा’ या संदर्भात मुस्लीम कायद्याअंतर्गत काय काय तरतुदी आहेत व याअनुषंगाने मालमत्ता हस्तांतरण कायद्यातील तरतुदीही आपण या लेखात पाहणार आहोत..

मुस्लीम वैयक्तिक कायद्याला भारतीय राज्यघटनेने मान्यता दिलेली असल्याने, त्या कायद्यातील तरतुदी आहे तशा म्हणजेच  as it as ‘हिबा’ संदर्भात लागू होतात. मुस्लीम वैयक्तिक कायद्याअंतर्गत ‘हिबा’ म्हणजेच तोंडी बक्षीसपत्र आणि ‘हिबानामा’ म्हणजे बक्षिसाचा लेखी दस्तऐवज होय. हिंदू व्यक्तीच्या बक्षीसपत्रासंबंधात तरतुदी लक्षात घेता मुस्लीम व्यक्तीद्वारे करण्यात येणाऱ्या बक्षीसपत्राबाबत बऱ्याच बाबतीत साम्य आढळून येते. ते म्हणजे मुस्लीम व्यक्ती ‘मुस्लीम पर्सनल लॉ’अंतर्गत आपली संपूर्ण संपत्ती ‘हिबा’द्वारे हस्तांतरित करू शकते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, मुस्लीम व्यक्तीने जर असे हस्तांतरण मृत्युपत्राद्वारे करण्याचे योजिले तर त्याला त्याच्या संपत्तीचा फक्त १/३ हिस्साच मृत्युपत्राद्वारे देता येईल. परंतु हिंदू व्यक्तीच्या बाबतीत असे घडत नाही. हिंदू व्यक्तीचा त्याचा जो हिस्सा असेल तो मृत्युपत्राद्वारे संपूर्णपणे हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. परंतु ‘मुस्लीम पर्सनल लॉ’ या गोष्टीला मान्यता देत नाही, हे या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे.

‘मुस्लीम पर्सनल लॉ’ला अनुसरून ‘हिबा’ अथवा ‘हिबानामा’ करावयाचा असल्यास, मुस्लीम व्यक्ती स्वत:च्या हयातीत अन्य हयात व्यक्तीला आपली स्वत:ची संपूर्ण संपत्ती दान करू शकते. तसेच मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे ‘मुस्लीम पर्सनल लॉ’अंतर्गत फक्त धार्मिक कारणासाठी म्हणजेच ‘सदका’साठी दिलेल्या बक्षिसांना सूट असल्याचे केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणी नमूद केलेले आहे.

‘मुस्लीम पर्सनल लॉ’नुसार ‘हिबा’ला Part of Contract Law म्हटले गेल्यामुळे हिबासाठी काही अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. ‘हिबा’ तोंडी किंवा लेखी असू शकतो.

उपरोक्त तरतुदी मुस्लीम वैयक्तिक कायद्याअंतर्गत हिबासंबंधात करण्यात आलेल्या असून, आता महत्त्वाचा प्रश्न उरतो तो की, हिबाचा दस्त नोंदणीकृत असावा किंवा कसे..

हफीजाबीबी व इतर वि. शेख फरिद व इतर यांचे दि. ५ मे २०११ चे प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने परिच्छेद क्र. २८ मध्ये मालमत्ता हस्तांतरण अधिमिय- १८८२ चे कलम १२९ च्या तरतुदीचा अर्थ अपरिहार्य प्रतिबंध (sine qua non)असा मानण्यात येऊ नये असे निर्देशित केलेले आहे.

”Section 129 Transfer of Property Act, excludes the rule of Mahomedan law from the purview of Section 123, which mandates that the gift of immovable property must be effected by a registered instrument as stated therein. However, it cannot be taken as a sine qua non in all cases that whenever there is writing about a Mahomedan gift of immovable property, there must be registration thereof.’’

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने विचार करता मालमत्ता हस्तांतरण अधिनियम-१८८२, कलम-१२९ अन्वये, मालमत्ता हस्तांतरण अधिनियम-१८८२ च्या तरतुदी मुस्लीम कायद्यातील कोणत्याही तरतुदींवर परिणाम करत नाहीत अशी तरतूद आहे. त्यामुळे लेखी ‘हिबा’ नोंदणीकृत असावा असे बंधन नाही. दात्याने (doner) ‘हिबा’चा ताबा देण्याआधी केवळ घोषणेद्वारे (declaration) ‘हिबा’ कधीही रद्द केला जाऊ शकतो. परंतु ताबा दिल्यानंतर फक्त न्यायालयाच्या हुकूमनाम्यानेच हिबा रद्द होऊ शकतो. तथापि, खालील परिस्थितीत ‘हिबा’ रद्द होणार नाही.

हिंदू व्यक्तीच्या बक्षीसपत्रासंबंधात व मुस्लीम पर्सनल लॉ अंतर्गत एक ठळक किंवा प्रकर्षांने जाणवणारा फरक म्हणजे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम-१८८२ च्या तरतुदी मुस्लीम कायद्यातील कोणत्याही तरतुदींवर परिणाम करत नाहीत अशी तरतूद आहे. त्यामुळे लेखी ‘हिबा’ नोंदणीकृतच असावा असे बंधन नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

निवृत्त सहदुय्यम निबंधक, मुंबई शहर. हिबासाठी कोणकोणत्या गोष्टींची तसेच अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे ते पाहू..

* प्रथम ‘हिबा’चा प्रस्ताव ठेवणे आवश्यक आहे. बक्षीस देणाऱ्याने कोणाला काय बक्षीस द्यावयाचे आहे त्याबद्दल प्रस्तावात स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. संदिग्ध प्रस्ताव कोणताही कायदा मान्य करत नसल्याने, प्रस्ताव ठेवताना स्पष्ट शब्दांत प्रस्ताव ठेवणे आवश्यक आहे. हिबाची घोषणा स्वेच्छेने केलेली असावी. बळजबरीने अथवा धमकी देऊन केलेल्या किंवा ठेवलेल्या प्रस्तावाला कायदा मान्यता देत नाही. फसवणूक करून घेतलेला ‘हिबा’ कायद्याने वैध ठरणार नाही.

* हिबाच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला स्वीकारणे कायद्याला अपेक्षित नाही.

* हिबाचा प्रस्ताव ठेवताना दोन साक्षीदारांची आवश्यकता असते.

* हिबा दिल्यानंतर हिबा देणाऱ्याने त्या मिळकतीचा त्याग करणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर हिबा अवैध ठरेल.

* हिबा घेणाऱ्याने त्याचा स्वीकार करणेदेखील आवश्यक आहे.

हिबा वैध ठरण्यासाठी जो बक्षीस देणार आहे त्याच्याकडे खालील पात्रता असणे आवश्यक आहे.

* हिबा देणारी व्यक्ती मुस्लीम नसेल तर असे बक्षीस हिबा म्हणून मान्य होणार नाही. आणि अशा हिबाला मालमत्ता हस्तांतर कायद्यातील तरतुदी लागू होतील.

* हिबा दिला जाणार आहे ती व्यक्ती कोणत्याही लिंगाची, कोणत्याही जातीधर्माची, कोणत्याही वयाची किंवा कोणत्याही मानसिकतेची असू शकेल.

* अन्य बिगरमुस्लीम व्यक्तीच्या लाभात हिबा करता येईल. तसेच स्त्री, अज्ञान किंवा वेडसर व्यक्तीच्या लाभातही हिबा करणे कायद्याने निषिद्ध नसेल.

* हिबा देणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा वर्षांपेक्षा जास्त असावे. जर अशी व्यक्ती न्यायालयाने नेमलेल्या पालकांच्या देखरेखीखाली असेल तर मात्र अशा व्यक्तीचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.

* हिबा देणारी व्यक्ती स्थिरचित्त असणे गरजेचे आहे.

* स्वत:ची मिळकत हिबा म्हणून देता येईल. ज्या मालमत्तेचा हिबा दिला जाणार आहे त्या मालमत्तेचा ताबा हिबा देणाऱ्याकडे असणे गरजेचे आहे. त्या मालमत्तेत हिबा देणाऱ्या व्यक्तीचा हक्क (Right) असणे गरजेचे आहे.

* कायद्यान्वये प्रतिबंधित मालमत्तेचा हिबा देता येणार नाही.

* हिबा जिवंत व्यक्तीच्या लाभात देता येतो. मृत व्यक्तीच्या लाभात हिबा देता येणार नाही.

* गर्भस्थ अपत्याच्या लाभातसुद्धा हिबा देता येतो, फक्त अट एवढीच असते की असे गर्भस्थ अपत्य हिबाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जिवंत जन्माला यायला हवे. अन्यथा, असा हिबा अवैध ठरेल.

* अज्ञान किंवा वेडसर व्यक्तीच्या लाभातही हिबा करता येईल. त्याचा Guardian of the Porperty म्हणजेच मालमत्ता पालक त्याचे वतीने करू शकतात.

* कायद्याद्वारे स्थापित व्यक्तींच्या नावानेही हिबा करता येतो.

* मुस्लीम व्यक्तीला जर ती व्यक्ती मृत्युशय्येवर नसेल तर आपल्या संपूर्ण मालमत्तेचा हिबा करता येतो. परंतु ती व्यक्ती मृत्युशय्येवर असेल, तर मात्र अशा व्यक्तीला आपल्या मालमत्तेच्या १/३ मिळकतीचाच हिबा करता येतो. (कृपया पाहा. Mulla Principles of Mahomedan Law, 17th edition by Ex Justice M. Hidayatullah, chapter xi, page 137, section 142.)

* एकापेक्षा अनेक व्यक्तींच्या लाभातही हिबा करता येऊ शकेल. परंतु त्यासाठी सगळ्यांनी वैयक्तीकरीत्या हिबाचा स्वीकार करणे आवश्यक राहील.

खालील परिस्थितीत ‘हिबा’ रद्द होणार नाही

* पतीने पत्नीला किंवा पत्नीने पतीला ‘हिबा’ दिलेला असेल.

* ‘हिबा’ देणारे आणि घेणारे हे एकमेकांशी प्रतिबंधित नातेसंबंधात असतील.

* हिबा’धार्मिक कारणासाठी दिला असेल.

* ‘हिबा’ घेणारी (donee) व्यक्ती निधन पावली असेल.

*   ‘हिबा’ म्हणून स्वीकारलेली वस्तू, घेणाऱ्याने (donee) विकल्यामुळे, बक्षीस दिल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्याच्या ताब्यातून निघून गेली असेल.

* ‘हिबा’ म्हणून दिलेली वस्तू गहाळ झाली असेल किंवा नष्ट झालेली असेल.

* कोणत्याही कारणामुळे ‘हिबा’ म्हणून दिलेल्या वस्तूचे मूल्य वाढलेले असेल.

* ‘हिबा’ म्हणून दिलेल्या वस्तूचे स्वरूप ओळखता येणार नाही इतके बदललेले असेल.

* दात्याने (donor)‘हिबा’च्या बदल्यात काही मोबदला स्वीकारला असेल.

dhanrajkharatmal@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:22 am

Web Title: provisions of the asset transfer act abn 97
Next Stories
1 वास्तु-मार्गदर्शन
2 भारतीय बांधकाम पद्धतींची उत्क्रांती
3 काचेचा करिश्मा घर सजवताना
Just Now!
X