ग. दि. माडगुळकर यांच्या तात्पुरत्या वास्तव्याच्या घरांविषयी..
२६४/३, नारायण पेठ, पंतांचा गोट, पुणे-२. या पत्त्यावरची चाळीतली एक लहानशी खोली १०x१२ ची, जुन्या वाडय़ातली बाळंतिणीची खोली असावी तेवढीच! पण केवढी उजळून उठलेली! औंधच्या राजानं पुण्याला शिकायला येणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांकरिता पंतांच्या गोटात केलेली व्यवस्था. तिथे म. गो. पाठक (‘प्रपंच’ या राज्य आणि राष्ट्रीय पारितोषिकप्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक) शिक्षणाच्या निमित्ताने राहत. त्यांच्या खोलीतच व्यंकटेश माडगूळकरांनी आपली सोय लावली आणि त्यांच्या निमित्ताने आले ग. दि. माडगूळकर! मग त्या खोलीनं काय काय पाहावं? आणि कोणाकोणाला पाहावं? पु. ल. देशपांडे, राम गबाले, सुधीर फडके यांसारखे दिग्गज येत. चर्चा, हास्य-विनोद चाले. कधी कधी वीस-पंचवीस मंडळींची दाटी होई. मग बाबुराव गुंडरेंकडचा चहा-भजी, कधी मिसळ, भडंग असल्या अरबट-चरबट खाण्यावर पानामागून पान आणि खिडकीतून बाहेर मारलेल्या पिचकाऱ्या.. त्या लालभडक जमिनीनं ती आठवण अजूनही जतन केली असेल.
सामायिक बाथरूममध्ये गार पाण्यानं आंघोळ करून आपले कपडे स्वत:च धुणारा, हा शहरात राहणारा गावाकडचा माणूस त्याला चित्रपट-कथा, संवाद वा गीत लिहिताना या खोलीनं पाहिलंय. गदिमांनी व्यंकटेश, म. गो. पाठक यांच्या केलेल्या चेष्टा-मस्करीनं तीही हसलीय. तसेच व्यंकटेशानं कुठलीच ठोस कमाई नसताना, राहण्याची सोय नसताना लहान वयात लग्न ठरवलं म्हणून ‘गदिमां’चा अनिवार रागही पाहिलाय. पण व्यंकूला गरज लागली तर.. म्हणून दिलेले पैसे, त्या रागामागचं प्रेम आणि दिलगिरीही त्या खोलीनं जाणलीय. वेगवेगळ्या चित्र-विचित्र आवाजाच्या पाश्र्वभूमीवरही लागलेली त्यांची लेखनसमाधी जशी तिनं पाहिली तशी ती समाधी कुणी मोडली तर केलेला रागाचा वर्षांवही पाहिला आणि एका कवयित्रीकडून ती समाधी मोडू नये म्हणून पलंगाखाली आपल्या विशाल देहाची घडी करून लपलेले ‘गदिमा’ पाहून ती खोली स्मितहास्य करत पाहत होती. त्यांच्यात दडलेलं एक छोटं मूल तिला जाणवलंय. त्याच्या वास्तव्यानं त्या खोलीला चैतन्य आलं.
संभाजी मेहेंदळेने आणलेल्या एका ब्रिटिश कर्नलच्या दिमाखदार, भव्य, निळ्या कोचाचं आगमनही याच खोलीत झालं. आधीच ३ कॉटस् असलेली ती खोली त्या भारदस्त सिंहासनासारख्या खुर्चीने भरून गेली. पण अण्णांना ऐसपैस बसायला हाच कोच शोभतो यावर सर्वाचंच एकमत होतं. याच खुर्चीवर बसून बरंच काही स्फुरलं, लिहिलं गेलं. ही राजेशाही खुर्ची शेवटी ‘पंचवटी’मध्ये विराजमान झाली. पण त्याआधी ते जिथं जिथं राहायला गेले, तिथं तिथं तीही गेली.
खरं तर पुण्यात त्यांची यापेक्षा खूप चांगली आलिशान सोय होती. पण त्यांना या खोलीचं कौतुक होतं. पण हे सर्व अरब आणि उंटासारखं होतंय म्हणून त्यांनी चार खोल्यांच्या प्रभात रोडवरील ‘एकनाथधाम’मध्ये आपलं बिऱ्हाड थाटलं. म. गो. पाठक आणि इतर विद्यार्थ्यांना सुनसुनं वाटलंच, पण अण्णांच्या ‘घोर-संगीता’ची साथ नसल्यामुळे झोप लागेनाशी झाली, हेही खोलीनं मिस्कील हसत पाहिलं.
इथे जिन्याजवळच्या खोलीतच लेखन, मित्रमंडळींबरोबर चर्चा, गप्पाष्टकांचा अड्डा असे. आपल्या पुत्रवत बाबाची (म. गो. पाठक) कथा ‘अभिरुची’मध्ये आली म्हणून तो दिवस सणासारखा साजरा केला तो एकनाथधाममध्येच!
पुढे पवार बंगल्यात एक प्रशस्त ब्लॉक पुण्यात भाडय़ाने घेतला. याचा जिना एकदम चळवळ्या. लहान मुलं सतत त्यावर खेळत असायची, चढणाऱ्याच्या दोन ढांगांमधून संचार करायची किंवा पायऱ्या या उतरण्यासाठी नाहीतच अशी त्यांची कल्पना असावी. कारण मुलं कठडय़ावरून घसरूनच खाली यायची. मोठय़ा माणसांनी हवं तर काळजी घ्यावी. बहुतेक म्हणूनच ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात’ हे अजरामर बालगीत इथेच लिहिलं गेलं.
आता हे दादर स्टेशनजवळचं ‘पाम व्ह्य़ू’मधलं चार खोल्यांचं गोविंदराव घाणेकरांचं घर! पण ‘गदिमां’नी आपलंसं केलेलं. मुंबईच्या मानाने ऐसपैसच, पण घाणेकरांची ६ मुलं त्या खोल्यांतून बागडत असायची. ट्रेन्सची धडपड, फेरीवाल्यांचा  ओरडा, रहदारीचा  गोंगाट, दादर स्टेशन जवळ म्हणून  गौतावळ्यातल्या माणसांचं सतत येणं- जाणं राहणं. त्यातच ‘गदिमां’चा मुक्काम- त्यांचं लेखन. त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांचा राबता, ते नसतानाही त्यांची वाट पाहत ठिय्या देऊन बसणारेही असायचे. त्यामुळे घर छोटं वाटायचं. त्या सर्व पसाऱ्यात सुनंदावहिनी (सौ. घाणेकर) अगदी शांतपणे पण झपाझप वावरताना  दिसतात. त्यांच्या अस्तित्वाने त्या चार खोल्या जणू  भारल्या जातात. त्या ‘गदिमां’चं इतक्या जिव्हाळ्याने करतात की जसा पाठचा भाऊच! पाठचा अशासाठी की वेळप्रसंगी आपल्या मोठय़ा आवाजात त्यांना दटावतातही. त्यांची प्रसिद्धी-प्रतिभा यांचं दडपण त्यांच्यावर अजिबात नाही. ‘जेवल्याशिवाय पाऊल बाहेर टाकायचं नाही.’ यावर निरुत्तर झालेले ‘गदिमां’. मग दिसते स्वयंपाक खोली. ओटा खाली. त्यावर दोन स्टोव्ह पेटलेले, भाजीचं भांडं शेगडीवर. समोर २- ३ मुलं, म. गो. पाठक, अण्णा (गदिमा) यांची पंगत. वहिनी सर्वाना पोळ्या वाढताहेत तर खास ज्वारीच्या भाकरी तव्यावरून उतरून थेट अण्णांच्या पानात उतरताहेत. कधी स्वयंपाक घरात माणसांची दाटी जास्त होते तेव्हा अण्णा संकोचून ‘बाहेरच जेवतो’ म्हणतात. तर वहिनींचे डोळे मोठे करून ‘आता बसा मुकाटय़ानं’ वाक्य कानावर येतं. मग मुलांची पंगत थेट गॅलरीत. ही गॅलरीही बहुरूपीणी आहे- तिचा कधी भोजन कक्ष बनतो तर कधी गोविंदराव आणि अण्णा एका ओळीत दाढी करायला बसतात. दिवसभराची कामं संपली की नंतर तिथेच पेपर वाचणाऱ्या  सुनंदावहिनी, दोघांमधली खरी-खोटी भांडणं सोडवायची तीही गॅलरीतच! एरवी दोन्ही मित्रांचं लक्ष्य वहिनी आणि त्यांचा मोठा आवाज! आपला हा आवाज आहे म्हणूनच नोकर, मुलं, माणसं आणि तुम्हीसुद्धा सरळरेषेत आहात अशी आपली बाजू मांडताना त्या दिसतात. कधी दिसतात हॉलमधले गोविंदराव! ‘गदिमां’ना पैशाची अडचण असेल हे ओळखून दुसऱ्या कोणाकडून तरी उसने घेऊन ते आण्णांना देणारे!
आपल्या गोतावळ्याचा वाढता राबता बघून ‘गदिमां’नी मुंबईत दुसरी जागा पाहिली. ही बातमी ओशाळवाण्या स्वरात खाली मान घालून सांगितली. नाराज वहिनी भावनावश होऊन म्हणतात, ‘दुसरीकडे  राहायला जाता ते इथे काय हाल होतात का तुमचे?’ अपराधी भावनेने  ‘गदिमां’ म्हणाले, ‘अहो सात-आठ वर्षे तरी झाली मी असा इथे नेहमी येतो, राहातो. मला भेटायला येणाऱ्या माणसांचा वावर खूप वाढलाय. तुमची मुलंही आता मोठी झालीत. त्यांचे अभ्यास.. प्रसंगाचं गांभीर्य कमी करायला पुढे थोडं हसून म्हणतात, ‘अहो, आता लोक म्हणायला लागलेत माडगूळकरांकडे घाणेकर राहातात.’ त्यानंतर ‘मला जाऊ दे’ म्हणणारे अण्णा आणि त्यांना ‘इथेच राहा’ म्हणून विरोध करणारं ते  प्रेमळ घाणेकर जोडपं आपल्या डोळ्यांसमोर नीटच उभं राहातं. असं वेगळ्याच लोकीचं हे भांडण सुरू राहात शेवटी दटावणी होऊन तोड निघते की, ‘रात्रीचं जेवण इथेच घ्यायचं नाहीतर मी मुलांबरोबर डबा पाठवीन.’ ‘याद राखा’ हा इशारा अध्याहृत!
आपल्या लक्षात येतं ही नाती रक्ताची नाहीत, पण काळजाची आहेत. कुठे आहे आता अशी मैत्री असा जिव्हाळा.
मुंबईलाही घाणेकरांच्या ‘पाम व्ह्य़ू’मधून ते ‘शंकर निवास’ शिवाजी पार्कला गेले  ते सुधीर फडके यांच्या शेजारी. ब्लॉक नं. ११ आणि १२ दोघांमध्ये फक्त एक भिंत. शब्द आणि सूर एकमेकांना लागून होते. इथे चार भांडय़ांचा चिमुकला संसार सजला. आणि या स्वयंपाक घराने  लेखक वामन चोरघडे, प्रसिद्ध नट विश्वास कुंटे असे भारी बल्लवाचार्य पाहिले. भरतव्यास, सी. रामचंद्र, वसंत जोगळेकर, सुधीर फडके यांच्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफिली  रंगू लागल्या. कधी सी. रामचंद्रांच्या वाजवलेल्या  नव्या-जुन्या चालींनी ती खोली हरखून गेली.
माहीमचा युनायटेड हाऊस-टायकलवाडी-जवळचा ब्लॉक ‘आमदार’ गदिमांना सरकारी कृपेने मिळाला. प्रत्येक पायरी मोजत १०५ पायऱ्या चढणारा त्यांचा  मित्र परिवार आणि ते दिसतात. पाचव्या  मजल्यावरच्या त्या घराला स्वर्ग, ब्रह्मांड, सज्जनगड अशी नावं देत ठेवत. पुन्हा परत जेवायला खाली कसं उतरायचं म्हणून तिथेच केलेली सुग्रास भोजन व्यवस्था आणि मग अर्थातच इथेही रंगलेल्या मैफिली, उत्तर रात्री आणि तिथेच टाकलेल्या पथाऱ्या.
एकनाथधाम – प्रभातरोडचं अपुरं पडायला लागलं, मग मुक्काम हलला पी. वाय. सी. ग्राऊंडजवळ कॉन्ट्रॅक्टर पवार यांच्या घराचा मोठा फ्लॅट मिळाला. इथे शेजारीणबाई  होत्या ‘सुलोचनाबाई’. या शेजारणीची ‘सखी’ बनली विद्याताईंची आणि मुलींचीसुद्धा! मग मुलींची वेणी-फणी करणे कधी विद्याताई नसतील तर स्वयंपाक करून त्यांना जेवू घालणेही होई. आणि दोघी मिळून सकाळी लांबवर फिरायला जाणे, एकत्र चहा-पाणी जेवणं असे उद्योग करीतच, पण मनाची उकलही एकमेकींजवळ केली जाई.
पण पुण्या-मुंबईच्या आधी अगदी सुरुवातीचा  मुक्काम होता कोल्हापूरला. तो मेस्त्रीणबाईंच्या वाडय़ात. शिवाजी पेठेत चार रु. भाडय़ाच्या खोलीपासून नऊ रु. भाडय़ाच्या दोन खोल्या मग ४० रु. भाडय़ाची आणखी मोठी जागा आणि मग रंकाळ्यावर एल. जी. पोवार यांच्या बंगलीवजा घरात. सात मोठमोठय़ा खोल्या ऐसपैस, पुढे  मोठी गॅलरी आणि समोर चित्रात पाहावं असा ‘रंकाळा तलाव’! भाडं रुपये शंभर. अशी चढती कमान असली तरी मेस्त्रीण काकूंच्या वाडय़ात अनेक संधी मिळाल्या. अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले. वर्षां, कल्पलता या बहिणींना इथेच श्रीधर भावाच्या रूपात मिळाला. याच खोलीत ‘रामजोशी’ चित्रपटाला अमाप प्रसिद्धी मिळाली. कथा, पटकथा, संवाद, गीतं अशी चौफेर रचना त्यांच्या हातून होऊ लागली. यश-कीर्ती हातात हात घालून आली. इथं शेजारी होतं मंगेशकर कुटुंब! म्हणजे या स्वरांच्या सम्राज्ञींचं  गाणं गुणगुणणं सदैव ऐकू येणारच. गदिमांच्या दोन्ही कन्यांवर लतादीदींची खूप माया. पण व्याप खूप वाढल्यामुळे माडगूळकरांनी पुण्याला मुक्काम हलवला. पण रोजच्या भेटीगाठी कमी झाल्या तरी स्नेहबंध काही सुटले नव्हते. आणि मग दिसायला लागतं नितांत मनोहर दृश्य. १९५६ सालचा मे महिना. पन्हाळ्याला थंड हवेसाठी आलेले माडगूळकर आणि घाणेकर कुटुंब. गर्द हिरव्यागार झाडींनी वेढलेल्या टुमदार वास्तूचं अंगण, आंब्याच्या झाडाचा ऐसपैस पार, तिथे चाललेली धमाल, मस्ती, खेळ.. आणि अचानक मुलांना दिसतात लतादीदी आणि लीलाताई पेंढारकर. भालजी पेंढारकरांच्या बंगल्यावरून वळणाच्या रस्त्यावरून त्या येत होत्या. मग छोटीला (कल्पलता) वाटलं दीदींचं मन रिझवावं. ‘आम्ही नाच करून दाखवू तुम्हाला आई येईपर्यंत?’ असं निरागसपणे विचारून लगेच ‘नैन से नैन नाही मिला ओ’ या गाण्यावर नाचायला सुरुवात केली. सुंदर बसवलेलं ते नृत्य बघून आनंदलेल्या लतादीदी म्हणाल्या, ‘किती गं छान नाच केलात तुम्ही, आता मी तुम्हाला काय बक्षीस देऊ?’ यावर चॉकलेट, आइस्क्रिम अशा उत्तराऐवजी ‘आम्ही नाच दाखवला तर तुम्ही गाणं म्हणा’ असं तत्काळ उत्तर देणाऱ्या मुली आणि मग तितक्याच आत्यंतिक सहजतेने लतादीदींनी गायलेले  ‘अनारकली’ चित्रपटातलं गीत. आधीच असलेलं ते निसर्गरम्य वातावरण त्या दैवी आवाजाने भारून गेलेलं दिसतं. आज जवळजवळ ६० वर्षे झाली या घटनेला. ती छोटी छोटी मुलं आता मोठ्ठी झालीत तरीही तो माहोल, ते सहज बरसणारे स्वर्गीय सूर आणि आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी म्हटलेलं ते गीत तिथे हजर असलेलं कोणीही विसरू शकलेलं नाही.
खरं तर लता मंगेशकरांचा आवाज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत ऐकू येणारा. कधी भक्ती-गीत, कधी भावगीत तर कधी फिल्मी गीतं! कृष्ण गवळणींसाठी नेहमीच मुरली वाजवतो. पण पहाटेच्याही आधी अवेळी वाजवलेली त्याची बासरी फक्त कुब्जेसाठी आहे. ती कुब्जेला धन्य करून टाकते. सुखात न्हाऊ घालते, निथळवते.
‘विश्वच अवघे ओठा लावून
कुब्जा प्याली तो मुरलीरव’
या इंदिरा संतांच्या कवितेतल्या कुब्जेप्रमाणे त्यांनीही ते स्वर प्राशन केले असतील. ‘हे माझ्या स्तव, हे माझ्या स्तव’ असं म्हणत ते सर्व तिच्या प्रमाणेच सुखाने निथळले असतील आणि म्हणूनच मग त्या वास्तूचे ते अंगण, तो आंब्याचा पार, तो क्षण अमर होतो.
 (उत्तरार्ध)
meenagurjar1945@gmail.com
संदर्भ : ‘गदिमांच्या सहवासात’, म. गो. पाठक, आवृत्ती २री (२००१), ‘मंतरलेल्या आठवणी’,
श्रीधर माडगूळकर, प्रथमावृत्ती (२०११), ‘आकाशाशी जडले नाते’, विद्या माडगूळकर

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
readers reaction on loksatta editorial
लोकमानस: बाबा शक्तिशाली झाले त्यात आश्चर्य ते काय?
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध
Sharad pawar on loksatta agralekh
“मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला”, अजित पवारांच्या ‘त्या’ पत्रावरून शरद पवारांचा खोचक टोला, काय लिहिलंय अग्रलेखात?