‘सेकंड होम’ या विषयावरील श्रीनिवास घैसास आणि शरद भाटे यांचे दोन्ही लेख वाचल्यावर, वाचक यापुढे बंगला (सेकंड होम) घेताना दहा वेळा विचार करतील, हे नक्की.
दोन्ही लेखांत लिहिलेल्या अडचणी व परवड माझ्या जवळच्या मित्राने अनुभवलेल्या मी पाहिल्या आहेत, त्यामुळे यावर तोडगा म्हणून चांगला पर्याय आम्ही शोधून काढला व गेली तीन-चार वर्षे तो अमलात आणत आहोत.
 मुरबाड, इगतपुरी, कर्जत वगैरे ठिकाणी प्लॉटसह बंगला विकत घ्यायचा म्हटले तर कमीत कमी २० लाख रुपये तरी खर्च होतात. त्याचे व्याज कमीत कमी ७ टक्के धरले तरी वर्षांला १.४० (एक लाख चाळीस हजार) रुपये होतात. त्या व्याजात आम्ही वर्षांतून दोन ते तीन वेळा (दिवाळी, नाताळ, उन्हाळा) मुंबईच्या जवळपासच्या निसर्गरम्य अशा फार्म हाऊसेसवर (रिसॉर्टस्) शेजारीशेजारी परडे बेसिसवर जागा बुक करून दोन्ही कुटुंबे चार-पाच दिवस मजा मारतो. दर वेळेला चेंज म्हणून दुसऱ्या फार्म हाऊसवर जातो. नो झाडझूड, नो स्वयंपाकक सगळं आयतं, बॅगेत चार कपडे टाकले की चाललो.
माझ्या मित्राने अनुभवलेली आणखी एक वेगळीच अडचण म्हणजे ‘भीड’. त्याचे शेजारीपाजारी, नातेवाईक त्याच्याजवळ कर्जतच्या बंगल्याची चावी मागायचे. म्हणायचे, या वीकएण्डला आम्हाला जरा तुमचा बंगला द्या ना. नाही म्हटले तरी वाईटपणा यायचा, दिला तरी सगळा बंगला खराब करून ठेवायचे. एकंदर काय, तर त्याचे बंगल्यावर जाणे कमी व इतरांचेच जाणे जास्त होऊ लागले. शेवटी त्या बंगल्याची देखभाल डोईजड व कटकटीची झाल्यावर त्याने तो विकून टाकला. या दिवाळीत आम्ही एमटीडीसीच्या भंडारदरा रिसॉर्ट येथे जाणार आहोत.