इमारत कोसळली की इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट याविषयी टीव्हीवर चर्चा तसेच वर्तमानपत्रात लेख यांना सुरू होतात. मुंबईमध्ये या बाबतीत बरीच जागृती असून, मोठय़ा प्रमाणावर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट संबंधित लोक करून घेतात. पुण्यामध्ये मोठय़ा सहकारी गृहनिर्माणसंस्था पूर्वीपासून जागृती सुरू झाली असून, इतर सहकारी गृहनिर्माणसंस्थांनीसुद्धा काही प्रमाणात इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यास सुरुवात केलेली आहे.

मॉडेल बायलॉज सहकारी गृहनिर्माणसंस्था (फ्लॅट टाइप) सप्टेंबर २०१४, पान २८, ७५ए प्रमाणे सहकारी गृहनिर्माणसंस्थांनी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, आर्युमान १५ ते ३० वर्षे, दर पाच वर्षांत एकदा व ३० वर्षांनंतर दर तीन वर्षांत एकदा महानगरपालिका नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून करून घ्यावयाचे आहे.

Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
blue pebble and radiowalla ipo will open at the end of the month
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ

महाराष्ट्र सरकारने राजपत्र दि. १४ जानेवारी २००९ आणि राजपत्र अधिसूचना दि. ८.७.२०११ अन्वये मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६५ मध्ये सुधारणा करून नवीन कलम २६५ (ए) अन्वये महानगरपालिका क्षेत्रातील इमारतीच्या भोगवटा पत्राच्या दिनांकापासून किंवा इमारतींच्या किमान ५० टक्के बांधकाम क्षेत्राचा भोगवटा केल्यापासून जो अगोदरचा असेल त्या दिनांकापासून ३० वर्षे झाली असतील अशा इमारतींचे मालक किंवा भोगवटाधारक यांनी इमारतीचे संरक्षणात्मक परिनिरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) महानगरपालिका नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनीअरकडून करून घेऊन संरक्षणात्मक परीनिरीक्षण दाखला (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट) सदर ३० वर्षांचा कालावधी संपल्यापासून एक वर्षांच्या आत कमिशनर महानगरपालिका यांच्याकडे सादर करावा व त्यानंतर दर दहा वर्षांत सादर करावा व स्ट्रक्चरल इंजिनीअरचे सुचविलेल्या दुरुस्त्या सहा महिन्यांच्या आत पूर्ण करावयाच्या आहेत. सदर कलम २६५(ए)चे उल्लंघन करणाऱ्या कलम ३९८(ए) अन्वये रु. २५,०००/- किंवा सदर इमारतीचा एक वर्षांचा मालमत्ता कर यापैकी अधिक असेल तितक्या रकमेचा दंड केला जाईल. वरील  कलम सुधारणा महानगरपालिका क्षेत्रातील इतर व सर्वच इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटच्या कक्षेत आणण्यासाठी केली आहे. स्ट्रक्चरल ऑडिटच्या नियमानुसार इमारतींची तपासणी नित्य नियमाने होऊन वेळच्या वेळी दुरुस्त्या होऊन इमारतीचे आयुर्मान वाढावे व अचानक होऊ शकणारी अपघाती दुर्घटना टळावी हाच हेतू आहे.

इमारतीतील काँक्रीट, भिंती, प्लॅस्टर इत्यादींमध्ये सिमेंट पेस्ट सुकताना होणारे आकुंचन, काँक्रीटच्या वयोमानानुसार होणारा आकारातील बदल (क्रीप), भारामुळे होणारा आकारातील बदल, आद्रता बदल व तापमान बदल यामुळे होणारा आकारमानातील बदल, रासायनिक प्रक्रिया, इमारतीवरील वनस्पती, इमारतीजवळील मोठी झाडे, जमिनीचे खचणे, इत्यादींमुळे इमारतीस तडे जातात किंवा खराबी होते.

रासायनिक प्रक्रिया मुख्यत: सल्फेट आक्रमण, अल्कली-अ‍ॅग्रीगेट (सिलिका) प्रक्रिया, काबरेनिशन, क्लोराइड आक्रमण यांमुळे होते. यापैकी सल्फेट आक्रमण व अल्कालि-अ‍ॅग्रीगेट प्रक्रिया यावर आधी उपाययोजना करता येते. काबरेनिशम व क्लोराइड आक्रमण या निरंतर चालणाऱ्या क्रिया आहेत. काबरेनिशनमध्ये वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड व काँक्रीटमधील ओलावा यांमुळे सौम्य कारबॉलिक अ‍ॅसिड तयार होऊन घट्ट जमलेल्या सिमेंटमधील अवांतर तयार झालेल्या कॅल्शियम हायड्रोक्साइडशी प्रक्रिया होऊन कारबरेनेशन सुरू होते. यामुळे काँक्रीटचा अल्कली गुणधर्म कमी होऊन सळ्यांच्या गंजण्याची क्रिया सुरू होते. क्लोराइड आक्रमणमध्ये काँक्रिटमधील व वातावरणातील क्लोराइड आणि काँक्रीटमधील ओलावा यामुळे इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रिया होऊन सळ्यांचे ऑक्सिडेशन सुरू होऊन सळ्यांच्या गंजण्याची क्रिया चालू होते. सळ्यांच्या गंजण्याच्या क्रियेतून आकारमान सहा पटीपर्यंत वाढते व त्यामुळे काँक्रीटला तडे जाऊन प्लॅस्टरला तडे जातात. तडय़ांमुळे सळ्यांचा वातावरणाशी संपर्क वाढून गंजण्याची प्रक्रिया वेगाने वाढू लागते. इमारतीतील पाण्याची गळती व ओल यामुळेही सळ्यांचे गंजणे सुरू होते व वाढत जाते. पाऊस, वातावरणातील बाष्प, इमारतीतील पाण्याची गळती व ओल यामुळे काँक्रीटमध्ये निर्माण होणाऱ्या ओलाव्यामुळेच सळ्यांच्या गंजण्याची प्रक्रिया सुरू होते. मोठय़ा प्रमाणावर इमारती सळ्यांच्या गंजण्यामुळेच नादुरुस्त होतात किंवा पडतात. मुंबईतील इमारतींची गंभीर परिस्थिती, पावसाचे जास्त प्रमाण, वातावरणातील प्रदूषण व क्लोरिन आयॉनची उपस्थिती यामुळे असावी असे वाटते. प्रत्यक्षात दर्जेदार इमारतीचे आयुर्मान समाधानकारकरीत्या सेवा देऊन कमीत कमी १०० वर्षे असले पाहिजे.

पुण्यामध्ये तपासणीत सळ्यांच्या गंजण्यामुळे विशेषत: तळमजल्यातील बाहेरील कॉलम, पार्किंगमधील कॉलम व बाहेरील बीम, पावसामुळे उघडे कॉलम, बीम व काँक्रीट पृष्ठभागावर प्लॅस्टरमध्ये कमी-जास्त प्रमाणात तडे गेलेले दिसून आलेले आहेत. तळमजल्यातील कॉलमला जमिनीतून ओल मिळते, असे दिसते. प्लॅस्टर नसेल तिथे काँक्रीटमधील तडे स्पष्ट दिसतात. या बाबतीत सळ्यांना काँक्रीट कव्हर कमी राहून सळ्या पृष्ठभागाजवळ आल्या असतील तर सळ्या गंजण्याची प्रक्रिया लवकर सुरू झालेली दिसून आलेली आहे. त्यामुळे बांधकाम होताना सळ्यांना काँक्रीट कव्हर व्यवस्थित ठेवले जाणे महत्त्वाचे आहे. जिन्यांवर पाणी पडून जिन्यांच्या बाजूस व तळात तडे गेलेले दिसून आले आहेत. रोपांच्या कुंडय़ा मोठय़ा प्रमाणावर ठेवल्यामुळे स्लॅब, बीममध्येसुद्धा तडे गेलेले दिसून आलेले आहेत. काही ठिकाणी भिंतींना मोठे तडे गेल्याचे दिसून आले आहे. शौचालय, बाथरूमची व ड्रेनेज व्यवस्थेतील पाण्याची गळती व बाहेरील भिंतीमधील ओल ही नेहमीची बाब दिसून आलेली आहे. याबाबतीत बाहेरील उभ्या ड्रेनेज लाइन दिसू नयेत म्हणून डक्टमध्ये बांधकामात झाकायच्या पद्धतीमुळे त्यातील गळतीची तपासणी व दुरुस्ती अवघड झालेली आहे. जास्त लांबी असलेल्या इमारतीत एक्स्पान्शन जॉइंटमधून मोठय़ा प्रमाणावर गळती व संबंधित गाळ्यांमध्ये खराबी व नुकसान दिसून आलेले आहे. एकमेकांना इमारती जोडून लांबी वाढविण्यापेक्षा एक्स्पान्शन जॉइंट टाळणे आवश्यक आहे. मोठय़ा इमारतीतील पार्किंगच्या सोयींसाठी केलेल्या बेसमेंट/ पोडियम स्लॅब पद्धतीतील, पोडियम स्लॅबमधून मोठय़ा प्रमाणावर होणाऱ्या गळतीची दुरुस्ती अवघड, किचकट व खर्चीक असून पूर्ण गळती थांबवणे कठीण आहे. यामुळे इमारतीचे आयुर्मान कमी होण्याची शक्यता असून, देखभाल दुरुस्तीचा खर्चही मोठय़ा प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. पोडियम स्लॅबवरून वाहनांची ये-जा असल्यामुळे स्लॅब बीमवर येणाऱ्या फटिग् स्ट्रेसमुळे परिस्थिती आणखी अवघड होण्याची शक्यता आहे. याबाबतीत जादा मजल्याचे पार्किंग करून पोडियम स्लॅब प्रकार टाळणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाक्यांच्या बाबतीतसुद्धा रोज पाण्याची पातळी वर-खाली होऊन फटिग् स्ट्रेसमुळे लवकर नादुरुस्त होताना दिसून येतात.

रंगकामात पोपडे धरणे, फुगणे, खराब होणे, इत्यादी तक्रारी फार मोठय़ा प्रमाणावर असून उच्च प्रतीच्या रंगकामाच्या मोठय़ा खर्चामुळे होणारी नाराजी खूप मोठी आहे. याबाबतीत कमी खर्चाचा ड्राय डिस्टेंपर रंग देणे उत्तम ठरेल. खोलीतील फरशी फुगून वर येण्याचे प्रकार सुरू आहेत. या सर्वाची अनेक लहान-मोठी कारणे आहेत. या सर्वामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च व त्रास खूप वाढतो.

मुळात बांधकामाची त्या त्या जागेवर निर्मिती करावयाची असल्याने अवघड आहे. त्यात इमारत बांधकामात अनेक प्रकारची मालमटिरियल, कामगार, हत्यारे व अनेक टप्प्यातील काम यामुळे जास्त अवघड व किचकट आहे. बांधकाम हे जड काम असून कामगारांवर अवलंबून असल्याने काम सोपे होण्यासाठी सोयीस्करपणे पद्धती बदलत गेलेल्या आहेत. ज्या पद्धतीने कामे केली जातात तीच योग्य पद्धत असा सर्वाचा समज झालेला आहे. अनेक बाबी योग्य तऱ्हेने केल्या जात नाहीत. परंतु इमारतीची संरचना ही अनेक पेटय़ा/ खोकी या प्रकारच्या संरचना यांची एकमेकाला जोडणी या प्रकारची असल्यामुळे नादुरुस्त इमारती बराच काळ टिकून राहतात.

या देशात बांधकामाचा दर्जा हा एक मोठा प्रश्नच आहे. दरवर्षीच्या रस्त्याच्या, इमारतीच्या व इतर बांधकामांच्या प्रश्नावरून ते स्पष्टच आहे. आपल्या देशात बांधकाम व इतर सर्वच बाबतीत कामाच्या, मटिरियलच्या दर्जाबाबतीत एकाच संस्थेचे मान्यताप्राप्त स्टँडर्ड कोड आहेत, ते म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस यांनी प्रकाशित केलेले आय. एस. (इंडियन स्टँडर्ड) कोड्स. (याव्यतिरिक्त रस्ते व पूल यांबाबत इंडियन रोड काँग्रेस यांची काही प्रकाशने आहेत.) जगात अशाप्रकारे प्रत्यक देशाची कोडस् असतात ती सर्व जवळ जवळ समान असून त्या त्या देशाच्या परिस्थितीनुसार त्यात थोडा बदल असतो. या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही स्टॅंडर्ड कोड असू शकत नाहीत. कायद्यानुसार सर्व बांधकामे या कोडनुसार करावीत असे बंधन आहे. फक्त ग्रामीण भागातील खाजगी कामांना सदर बंधन नाही. सदर कोडस् वेगवेगळ्या बाबींवर वेगवेगळे असून सध्या त्यांची एकूण संख्या १९०००असून त्यापैकी सिव्हिल इंजिनिअरिंग विषयी अंदाजे २०००  आहेत. त्यापैकी इमारत बांधकामाविषयी अंदाजे १००० असून त्यापैकी १०० एक जास्त महत्त्वाची आहेत.

या कोड्समध्ये बाबींचा कमीतकमी दर्जा दिलेला असतो. याशिवाय उपयुक्त विषयावर खुलासेवार हँडबुक आहेत. पूर्वी पी.डब्ल्यू.डी., हँडबुकमध्ये काही प्रमाणावर माहिती असायची. परंतु २५-३० वर्षांपूर्वी जवळजवळ सर्व विषयांवर आय.एस.कोड आल्यामुळे ती बंद झाली, असे दिसते. परंतु आय.एस. कोडचा अभ्यास मोठय़ा प्रमाणावर झाला नाही. हे सर्व आय. एस. कोड्स व त्यातील निर्णय मुख्यत: इंजिनीअरिंगच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित असतात. अडचणीच्या वेळी व स्पष्टता नसलेल्या इतर वेळी निर्णय इंजिनीअरच्या परवानगीने घ्यावेत, असे निर्देश आहेत. इंजिनीअरिंगच्या मूलभूत तत्त्वांच्या अभ्यासाचा समावेश फक्त इंजिनीअरिंगच्या पदवी अभ्यासक्रमात केलेला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. परंतु आय.एस. कोडचे वाचनसुद्धा सुरुवातीला अवघड आहे, तर चटकन समजणे दूरच. चिकाटीने सतत वाचन, मनन केले तर ते हळूहळू समजू लागते. त्यामुळे आज आय.एस. कोडच्या अभ्यासाची इंजिनीअरला सवय नसल्यामुळे अवघड आहे, पण अशक्य नाही. किंबहुना तो पदवीधर इंजिनीअरलाच शक्य आहे, याची नोंद घ्यावी. त्यामुळे इंजिनीयरांनी आय.एस. कोडचा अभ्यास करणे, समजून घेणे व त्याचे इतरांना प्रशिक्षण सतत सुरू ठेवणे असा कार्यक्रम सुरू होणे आवश्यक आहे.

खरं तर कायद्यानुसार केलेल्या नियमान्वये महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात खासगी कामात संपूर्ण बांधकामाला व दर्जाला, पालिकेमध्ये संबंधित प्रस्ताव दाखल केलेला परवानाधारक तांत्रिक व्यावसायिक आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर तांत्रिकरीत्या व पूर्णपणे जबाबदार असते व त्याप्रमाणे तो प्रस्तावामध्ये व नियमानुसार काम झाल्याचे तो काम पूर्ण झाल्यावरसुद्धा कम्प्लीशन सर्टिफिकेटमध्ये लिहून देतो व त्या आधारेच पालिका भोगवटा पत्र देते. यावरून नियमानुसार दर्जाला तांत्रिक व्यक्तीच जबाबदार असून, बिल्डरची भूमिका दुय्यम मालक म्हणून असून करारामध्ये लिहिलेल्या बाबींना जबाबदार असते.

असाच प्रकार सरकारी-निमसरकारी बांधकामांच्या बाबतीत दिसून येतो. मंत्री, पुढारी, कार्यकर्ते, पत्रकार व जनता या सर्वाचा अनेक वर्षांपासून गैरसमज आहे की सरकारी बांधकामाच्या दर्जाला ठेकेदार जबाबदार आहेत. टेंडर भरताना घेतलेली बयाणा रक्कम ही काम सुरू केले नाही तर जप्त करण्यासाठी असते. काम सुरू केल्यानंतर अनामत रक्कम टप्प्याटप्प्याने घेतली जाते. ती काम पूर्ण केले नाही तर जप्त करण्यासाठी असते. जो ठेकेदार वरील असे प्रकार वारंवार करतो, त्यास काळ्या यादीत टाकले जाते. त्यामुळे तो त्यापुढे टेंडर भरू शकत नाही. ठेकेदार ही तांत्रिक व्यक्ती नसते. तेव्हा सरकारी बांधकामाच्या दर्जाला व संपूर्ण कामाला त्या कामावरील शासकीय इंजिनीअर जबाबदार असतो याची नोंद घ्यावी. परंतु अपघात घडला की लेबर ठेकेदार वगैरे दुय्यम लोकांवर कारवाई/ गुन्हे दाखल करायचे अशी आपल्याकडे पद्धत आहे व जबाबदार व्यक्ती राहते बाजूला.

इमारतीच्या बांधकामात काही बाबी सर्वसाधारणपणे पाळणे आवश्यक आहे. इमारतीची आखणी सरळ, गाळे चौरस/ चौकोनी, काम करायला सोपी, टॉयलेटमधील अंतर्गत बीम सोडून, प्रत्येक बीम शक्यतो कॉलममध्ये जाणारा असावा. कॅंटिलीवर स्ट्रक्चर टाळणे. प्रत्येक पायाच्या जमीन स्तराची तपासणी करून दाखल घेणे, पायाची खोदाई व काँक्रीट आडव्या पातळीत ठेवणे.

फाऊंडेशन, कॉलम, बीम, स्लॅब काम, आडवी पातळी, उभा ओळंबा, सरळ रेषेत व मापे याबाबतीत बऱ्यापैकी तंतोतंत असणे. याबाबतीत टोटल स्टेशन सव्‍‌र्हे उपकरणाचा वापर अत्यंत उपयुक्त पडेल. सळ्यांच्या बांधणीचा तपशील तांत्रिकरीत्या समजून घेऊन तंतोतंत बरोबर असणे व त्याप्रमाणे करणे व तपासणी होणे आवश्यक आहे. भूकंप विरोधी क्षमतेसाठी कॉलम-बीम सांधे रिजिड असणे आवश्यक, त्यासाठी सांध्यातील सळ्यांची बांधणी तांत्रिकरीत्या समजून घेऊन करणे आवश्यक. कॉलम, बीम, स्लॅबचे साचे सांध्यातून कमीत कमी सिमेंट पाणी बाहेर जाऊन देणारे असणे आवश्यक आहे. सिमेंट काँक्रीटसाठी जरुरीप्रमाणे ५३ किंवा ४३ ग्रेड ऑर्डिनरी पोर्टलॅन्ड सिमेंट शक्यतो ताजे वापरणे. वाळू म्हणजे ४.७५ मि.मी. पेक्षा कमी मापाची, स्वच्छ, क्रश वाळू असेल तर गोलसर, बारीक, पावडर कमीतकमी असणारी असणे, खडी योग्य मापाची, घनाकार-गोलसर, स्वच्छ असावी, चपटी-लांबट नसावी. खडी वाळूचे प्रमाण योग्य- सर्वसाधारणपणे २:१ याच्या आसपास असते, वाळूचे प्रमाण लेबरच्या सोयीमुळे वाढविले जाते. परंतु त्यामुळे काँक्रिटची ताकद कमी होते. पाणी सिमेंट प्रमाण प्लास्टीसायझर (केमिकल) वापरून शक्यतो ०.४ ते ०.४५ मध्ये ठेवावे. म्हणजे एक सिमेंट पोत्यासाठी २० ते २२.५ लिटर पाणी, पाण्याचे प्रमाण लेबरच्या सोयीमुळे वाढविले जाते. त्यामुळे काँक्रिटची ताकद खूप कमी होते. काँक्रीट कॉम्पॅक्शनसाठी व्हायब्रेटर व स्लॅबसाठी पॅन व्हायब्रेटर वापरणे, कॉलम, बीम, स्लॅब काम पूर्ण झाल्यावर बांधकाम वरून खाली पूर्ण करत आणणे. नंतर बाहेरील प्लास्टर व नंतर आतील प्लास्टर करणे. बांधकाम-प्लास्टर उभा ओळंबा, सरळ रेषेत व मापे याबाबतीत बऱ्यापैकी तंतोतंत असणे आवश्यक. बांधकाम, प्लास्टर व इतर कामासाठी (या कामासाठी मेसनरी सिमेंटचे उत्पादन सुरू होणे आवश्यक) पोझोलाना पोर्टलॅन्ड सिमेंट किंवा पोर्टलॅन्ड स्लॅग सिमेंट वापरणे, मातीच्या विटा योग्य आकारमानाच्या व्यवस्थित भाजलेल्या असाव्यात, पाण्यात बुडवून भिजवाव्यात. सिमेंटचा वापर असलेल्या विटा स्टीम क्युअर असाव्यात. सांधा सरासरी जास्तीत जास्त १० मि.मि. असावा. सांध्यातील बाहेरील १० मि.मी. दर्जा काढणे (रॅकिंग ऑफ जॉइंट्स) आवश्यक आहे. प्लास्टरची जाडी जास्त नसावी, स्लॅब सिलिंग व काँक्रीटचे प्लास्टर करताना बॉडिंग केमिकल लावणे आवश्यक. काँक्रीट/ बांधकाम/ प्लास्टर पाणी मारण्यासाठी (शेती फवारणी) पॉवर स्प्रे पंप वापरणे अत्यंत उपयुक्त. फरशीखालील मालाची जाडी जास्त नसावी. ग्लेज टाइल्स सिमेंट व बारीक वाळूच्या मालात बसवाव्यात. फरशी, ग्लेज टाइल्स बसविताना बॉडिंग केमिकल लावणे, इत्यादी. खिडक्यांना सज्जे कमीतकमी ६० से.मी. रुंदीचे, जिन्याच्या खिडक्या, जाळी यांनासुद्धा वरीलप्रमाणे सज्जे आवश्यक. टॉयलेटच्या खिडक्यांनासुद्धा ४५ से.मी. रुंदीचे सज्जे, सर्व सज्जे आवश्यकतेनुसार १५ ते १० से.मी. बाजूस बाहेर काढलेले, व्यवस्थित पाणीपट्टीसह आवश्यक. पार्किंग स्लॅब बाहेरील बीम, बाल्कनी तळातील बीम/ पडवी व जिथे जिथे उभ्या भागावरील पाणी आडवे ओघळून आत पडण्याची शक्यता आहे तिथे व्यवस्थित पाणीपट्टी आवश्यक असते. मोठय़ा उंचीच्या खिडक्या टाळणे आवश्यक. वॉटरप्रूफिंग व विशेषत: टॉयलेटचे याबाबतीत बराच गोंधळ असून, वॉटरप्रूफिंग तांत्रिकदृष्टय़ा समजून घेऊन करणे आवश्यक आहे. आतील पेंट मारण्यापूर्वी कमीतकमी लांबी लावणे आवश्यक. जमिनीवरील फरशीखाली मातीचा थर असल्यास माती काढून मुरूम किंवा तत्सम मटिरिअल व्यवस्थित घुमसून भरून फरशी बसविणे. डबल मजला, उंची टेरेस स्लॅबचे काम चालू असताना नेहमी अपघात होतात. सेंटरिंग उभे सपोर्ट खांबांना आडवी बांधणी व तपासणी आवश्यक, इत्यादी. हा सर्व विस्तृत प्रशिक्षणचा विषय असून महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित होणाऱ्या बाबी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परवडणारे, स्वस्त असे चांगले घर असू शकत नाही. उत्तम दर्जाचे, टिकाऊ, कमीतकमी देखभाल दुरुस्तीचा खर्च व पूर्ण आयुर्मान देऊ शकणारे घरच उत्तम. तेव्हा इमारती शोबाज दिसण्याच्या दृष्टीने न बांधता टिकाऊ होण्याच्या दृष्टीने बांधा.

इमारतीचे बांधकाम म्हणजे उत्पादन आहे व त्याचे शास्त्र हे इंजिनीअरिंग आहे, हे सर्वानी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात दर्जात्मक काम, टिकाऊपणा व योग्य निर्णय होण्यासाठी अभ्यास, प्रशिक्षण व अनुभवानंतर बांधकाम क्षेत्रात तज्ज्ञ हा पदवीधर इंजिनीअरच होऊ शकतो, हे एकदा सर्वाना समजून घ्यावे लागेल. नंतर पदवीधर इंजिनीअरांना आय.एस.कोडचा, इंजिनीअरिंगच्या मूलभूत तत्त्वांचा व इतर तांत्रिक पुस्तकांचा अभ्यास करणे, समजून घेणे व त्याचे प्रशिक्षण आपापसात इंजिनीअरांना देणे व नंतर त्याप्रमाणे काम करण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण पदविकाधारक इंजिनीअर, सुपरवायझर, लेबर ठेकेदार व लेबर यांना देणे व त्यांच्याकडून त्याप्रमाणे काम करून घेणे असा कार्यक्रम सतत सुरू ठेवावा लागेल. पदवीधर इंजिनीअरांना त्यांची जबाबदारी देऊन बांधकाम क्षेत्रातील सर्व परवाने व सरकारी अधिकारी पदे चाटर्ड इंजिनीअर पुरते मर्यादित केले तर हळूहळू, पण निश्चित बदल घडेल.

– इंद्रकुमार रणजितसिंह जगताप

indrakumar.jagtap@gmail.com