News Flash

ऐसपैस अंगण घराची शान!

अंगण म्हणजे घराचंच एक अंग- जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत.

अंगण म्हणजे घराचंच एक अंग- जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असतं. प्राजक्ताच्या सडय़ाच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असतं, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असतं. गार गार वाऱ्याच्या झुळुकेने शहारलेलं असतं. कधी चंद्रदीपात तेवत असतं तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असतं.

हल्ली वाढत चाललेल्या बिल्डिंगमुळे अंगण लोप पावत चालले आहे व आधुनिक घर/बंगल्यांच्या रचनेतील अंगणांचे स्वरूप बदलले आहे. आमच्या उरणमध्ये अजून काही पारंपरिक तर काही बदलत्या स्वरूपातली अंगण संस्कृती कुठे कुठे जपली आहे याचं समाधान वाटतं. पण पूर्वीच्या अंगणांची शान काही औरच होती.

दिवाळीची चाहूल लागली की अंगणाची डागडुजी, नूतनीकरणाला सुरुवात व्हायची. घरासमोरचा अंगणाचा चौरस पट्टा उखळला (जागीच कुदळीने खणत जाणे ) जायचा. अंगण अजून बाळसेदार करायचं असेल तर त्यावर अजून माती टाकली जायची. याचबरोबर घरातील स्त्रिया व मुलींचा रांगोळीचा कलाविष्कार जपणारा ओटा गादीप्रमाणे मातीचा थर रचून घराच्या पायरीच्या समोर चौरस आकारात उभारला जायचा. मग लाकडाची चोपई किंवा लोखंडी घणाने (लेव्हल करण्याची साधने) अंगण आणि ओटय़ाची जमीन चोपून समांतर मऊ  केली जायची. त्यावर पाणी मारून जमिनीला एकजीव करून ठेवले जायचे. गोठय़ातून शेण आणून ठेवले जाई. या जमिनीला आई-आजीच्या मायेच्या हाताने, खराटय़ाने शेण सारवलं जयाचं. त्यांच्या त्या प्रेमळ, उबदार स्पर्शाने अंगणाला पूर्णत्व येऊन ते सुखावत असे. सारवण्याने आई/आजी किंवा सारवणाऱ्या स्त्रियांच्या शेणा-मातीतल्या कलाकुसरीचं दर्शन व्हायचं. अंगणात शेण सारवल्यावर एक सुंदर बोट फिरवल्याची नक्षी तयार व्हायची. त्या शेणाची कधी घृणा वाटली नाही, उलट सारवल्यावर अंगण स्वच्छ सुबक दिसे. सुकल्यानंतरही जो मंद वास यायचा त्याचा वास अजूनही स्मरणात आहे. असा मायेचा स्पर्श अंगणाला १५ दिवसांनी किंवा महिन्याने आवर्जून होत असे.

अंगणाच्या कडेला लावलेली झाडे-झुडपे अंगणाला साडीचा किनार असल्याप्रमाणे शोभा देत असतं. अंगणासमोर असलेलं तुळशी वृंदावनाने अंगण मंगलमय होत असे. रात्री तुळशी वृंदावनात तेवत असलेल्या दिव्यामुळे व अगरबत्तीच्या सुगंधाने काळोखातील अंगणालाही प्रसन्नता लाभत असे.

घरातील बाळगोपाळांसाठी अंगण म्हणजे मैदानच. बाळांचे पाय दुडुदुडु अंगणात धावू लागले की अंगणालाही गुदगुल्या व्हायच्या. बायकांच्या पापड, लोणची, सांडगे अशा विविध प्रकारच्या वाळवणीच्या प्रकारांच्या घमघमाटाने अंगण स्वादमय होऊन जायचे. शाळांच्या सुट्टीचे दिवस आले की अंगणात पाहुण्यांची रेलचेल वाढायची. मग सकाळपासूनच बाळगोपाळांनी अंगण दुमदुमून निघे. विविध प्रकारचे खेळ अंगणात खेळले जायचे. पकडापकडी, लगोरी, डबाईसपैस, विटीदांडू, गोटय़ा, मामाचं पत्र हरवलं, भातुकली, बाहुला-बाहुलीचं लग्न अशा अनेक खेळांना उधाण येई. तहान-भूक विसरून, भर उन्हातही हे खेळ रंगायचे. संध्याकाळी घरातील मोठय़ा व्यक्तीही या मुलांमध्ये सामील व्हायच्या, गप्पा-गोष्टी रंगायच्या. कोणीतरी नकला करून कलात्मक पद्धतीने मुलांना गोष्ट सांगायचे. मुलंही उत्सुकतेने कान टवकारून या गोष्टी ऐकायचे. पूर्वी बाहेर गार हवा असायची म्हणून अंगणात खाटा टाकून गप्पागोष्टी मारत घरातील माणसे झोपायचीही. अशा भरभराटीने अंगण आनंदात न्हाऊन निघत असे.

अंगणाचं आणि घरातील काही सणसमारंभांचं घट्ट नातं असायचं. तसे चंद्र-चांदण्या हे अंगणाचे नेहमीचेच सोबती. पण कोजागिरी पौर्णिमेला मात्र चंद्र आपली अलौकिक किरणे अंगणात पसरून अंगण तेजोमय करायचा. या दिवशी चंद्राचं अंगणात खास स्थान असायचं. त्याची अंगणात पूजा व्हायची, नैवेद्याचे दूध चंद्रकिरणात अधिक चांदणशुभ्र भासायचं. घरातील मंडळींच्या गप्पा-गोष्टींना, गाण्यांच्या मैफिलींत तो भला मोठा चंद्रही मिसळून जायचा.

दिवाळी म्हणजे अंगणासाठी मोठा सण. दिवाळीच्या पहाटे व रात्री अंगणात फटाक्यांची आतषबाजी होत असते. तासन्तास बसून घरातील स्त्रिया अंगणातल्या ओटय़ावर ठिपक्यांची रांगोळी काढून त्यात रंग भरण्यात मग्न असत. या रांगोळीमुळे अंगणाला साज चढत असे. रात्री रांगोळीजवळ, तुळशी वृंदावनात व घराच्या ओटीवरल्या पणत्यांनी अंगणात तारका उतरल्याचा भास होई. दिवे लागले की त्या दिव्यांचा व फटाक्यांचा आनंद घेण्यासाठी घरातील सर्व मंडळी अंगणात जमत. अंगणही या सर्व फटाक्यांचा दाह आनंदाने स्वीकारायचं. सकाळी उठलं की अंगणात पडलेल्या फटाक्यांना खराटय़ाने झाडले की अंगण पुन्हा स्वच्छ, टापटीप दिसायचं. बळीप्रतिपदेला अंगणात शेणाचे गोळे मांडून पूजा व्हायची. शेणाच्या गोळ्यांवर झेंडू, कुर्डूच्या फुलांचे तुरे शोभून दिसायचे. अंगणात धार्मिक वातावरण तयार व्हायचं या पूजेने. दिवाळीनंतर येणारे तुळशीचे लग्न म्हणजे अंगणातला मजेशीर सण. खऱ्या लग्नासारखं तुळशीचं अक्षता टाकून, अंतरपाट धरून लग्न लावून मग फराळ वाटायचा, फटाके वाजवायचे; त्यामुळे अंगणात सगळ्यांचीच धमाल असायची.

पूर्वी मुला-मुलींची लग्नेही हॉलवर न होता मुलीच्या अंगणातच व्हायची. तेव्हाचे मंगल कार्यालयच ते. लग्नाच्या आठ दिवसांपूर्वीपासूनच अंगणात मंडप उभारणीला सुरुवात व्हायची. लग्नाच्या दोन दिवस आधी मंडपाच्या सजवण्याची लगबग चालू व्हायची. केळीचे दारकस म्हणजे फूल आलेली दोन केळीची झाडे अंगणात जिथे प्रवेश केला जातो तिथे लावून मंडपाचे प्रवेशद्वार उभारले जायचे. मांडव स्थापनेच्या दिवशी गावकरी जमून मंडपाला झेंडू आणि आंब्याच्या पानांनी सजवले जायचे. या मंडपशाकारणीने अंगणाचे रूपही नववधूप्रमाणे दिसू लागायचे. लग्नसमारंभातील मुला-मुलीकडचा मांडव म्हणजे अंगणातील धूमशान. हळद झाल्यावर रात्री बेंजोच्या तालावर लहान, मोठे, म्हातारे सगळेच आप्त-मित्रमंडळी मांडव डान्सचा बेफाम आनंद घ्यायचे. या सर्व प्रथा अजून आहेत, पण अंगणाची जागा इतर वास्तूंनी घेतली आहे.

असं हे रुबाबदार अंगण घराची शान असायचं. ज्यांनी अंगण अनुभवलं आहे त्यांच्या मनाच्या डोहात या अंगणाच्या स्मृती नक्कीच तरंगत असतील.

– प्राजक्ता म्हात्रे

vasturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 1:55 am

Web Title: the spaces around the house
Next Stories
1 चोरांपासून घराचं संरक्षण कसं कराल?
2 होम थिएटर
3 भिंतीवरची खुंटी
Just Now!
X