परवडण्याजोगे घर तेही मुंबईत हे एक स्वप्नच आहे आणि ते प्रत्यक्षात साकार होणेदेखील तितकेच असंभाव्य वाटते. मुंबई शहर हे नि:संशय देशातील सर्वात महागडय़ा शहरांपैकी एक आणि भारतीय शहरी जीवनाचा चेहरा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच हे आधुनिक भारताचे सर्वदेशीय केंद्र आहे. मुंबईच्या आकर्षणाने या शहरात दररोज हजारो लोक येत असतात, त्यामुळे राहण्याच्या दर्जेदार जागांची निकडही तेवढीच भासते. व्यावसायिक आणि रोजगार संधी यांमुळे लोक या शहराकडे आकर्षित होतात.

सर्वसाधारण माणसाला राहण्यासाठी एक योग्य जागा पाहिजे असते- अशी जागा ज्यात त्याचे कुटुंब व्यवस्थित राहू शकते, जी काही प्राथमिक सुविधांनी युक्त आहे आणि जिथून येणे-जाणे फारसे दगदगीचे नाही.

लोकांचा गजबजाट असलेल्या मुंबईसारख्या महानगरात परवडण्याजोग्या घरांचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, तो हा की मुंबईत परवडण्याजोगे घर मिळणे खरेच शक्य आहे का?

खरेदीदार घर खरेदी कायमच लांबणीवर टाकू  शकत नाहीत. त्याच्या कुवतीपेक्षा थोडी जास्त किं मत देऊन का होईना, ते घर खरेदी करतात, कारण ती त्यांची गरज असते. तर मग याचा अर्थ असा आहे का की, मुंबईत आपल्याला परवडण्याजोगे घर मिळणारच नाही? नाही, असे मुळीच नाही. पण त्यासाठी आपल्याला शहरातील मध्यवर्ती ठिकाणे सोडून त्याच्या पलीकडे जायला लागेल. अशी ठिकाणे जिथे सहजरीत्या जाता येईल, जी खूप दूर नसतील आणि जी एमएमआरमध्ये बसतील.

अभ्यासातून असे सामोरे आले आहे की, भारतातील परवडण्याजोग्या घराची ठळक वैशिष्टय़े म्हणजे प्रकल्पाची जागा, पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, किं मत आणि सर्वात शेवटी प्रकल्पाचा आकार ही आहेत.

चेंबूर, पवई, अंबरनाथ यांसारखी उपनगरे हा एक पर्याय आहे. ही उपनगरे म्हणजे समूहाने वस्ती करण्यासाठी उत्तम जागा आहेत, जे परवडण्याजोग्या निवासी जागांसाठी अनुरूप आहे. भारतात परवडण्याजोग्या घरांची संकल्पना यशस्वी होण्यासाठी सरकारने डेव्हलपर्सना जागांवर सवलती, उच्च एफएसआय, पायाभूत सुविधांचा विकास, सहजरीत्या मिळणारी गृहकर्जे

आणि व्याज दरावरील सवलती उपलब्ध करून द्यायला हव्यात, जेणेकरून ते या पुढाकारात सक्रियपणे आणि पूर्ण शक्तीनिशी सहभागी होतील.

तसेच आवश्यक अशा परवानगींसाठी सिंगल विंडो क्लीअरन्स मिळणे गरजेचे आहे. कारण डेव्हलपर संमती मिळवण्याच्या दुष्टचक्रात फसत जातो, ज्याचा परिणाम प्रकल्पाच्या पूर्णत्वावर होतो.

परवडण्याजोगा किंवा समूह निवास ही या शहराची सध्याची गरज आहे आणि ती प्रत्यक्षात भागवली जाऊ  शकते. यासाठी गरजेची आहे ती फक्त डेव्हलपर, सरकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खरेदीदार या सर्व भागधारकांची इच्छा.