|| अलकनंदा पाध्ये

अलीकडेच आम्ही गाण्याच्या भेंडय़ा खेळत असताना. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ गाण्यातील ‘आई गेली पाणी शेंदायला ’ या ओळीवर छोटय़ा नातीचा प्रश्न. ‘‘शेंदायला म्हणजे काय.?’’ त्यावर विहिरीत दोर सोडून पोहऱ्यातून (पुन्हा पोहऱ्याचा अर्थ विचारला जाईल) बादली, कळशीतून पाणी काढणे वगरे समजावून सांगितले. त्यावर तिने ‘‘बाप रे किती टिडीअस जॉब!’’ म्हणत भुवया उंचावल्या त्याबरोबर, ‘‘अगं, हे तर काहीच नाही, त्याच्यापूर्वी तर नदीवरून हंडे भरून पाणी आणायचा त्रास कसा होता.’’ वगरे मी तिला उत्साहाने सांगायला लागले, पण टिडीअस शेरा मारून नांदायलाच्या ‘ल’ अक्षरावरून त्यांच्या ग्रूपची नवीन गाण्याची सुरुवातही झाली होती. पण माझ्या विचारांचा प्रवाह मात्र अंताक्षरीकडून पाण्याकडे वळला.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

‘जीवन’ या शब्दाइतका दुसरा कुठला समर्पक शब्द पाण्याला असूच शकत नाही. जगातील प्रत्येक मानवी संस्कृती नदीच्या काठावरच समृद्ध झालीय. जीवनाला अत्यावश्यक जीवन म्हणजेच पाणी हे सुरुवातीच्या काळात घरोघरी नदीवरूनच आणले जाई. इतकेच नाही तर अंघोळी, त्यानंतरचे कपडे धुणे आणि तिथल्या पुळणीवर वाळवण्याचे प्रकारही नदीकिनारीच तर व्हायचे. नदीकिनाऱ्यावर पाणी भरण्याच्या निमित्ताने होणाऱ्या प्रेमीजनांच्या भेटीगाठी.. कृष्णाने गोपींसोबत केलेली छेडछाड यावरच्या कथाकाव्यांची.. गाण्यांची तर मोजदाद करणे केवळ अशक्य. अर्थात या रम्य आठवणींशिवाय घरोघरीच्या सासुरवाशिणींना आपापली सासर-माहेरची सुख-दु:खे एकमेकींना सांगायला, मन मोकळे करायला त्या काळात नदीवरच्या पाणवठय़ासारखी योग्य जागा शोधून मिळाली नसती. घरातील बायकांना डोक्यावर एकावर एक हंडे घेऊन पाणी आणायचे मोठेच काम असायचे. आपल्याकडे लग्नात सासरी पाठवणी करताना हंडे-कळशा द्यायची प्रथा कदाचित म्हणूनच पडली असावी. सधन आणि तालेवार घरात मात्र पाणके नामक चाकरमाणूस दिवसभर खांद्यावरच्या कावडीतून त्या पूर्ण घरासाठी पाणी भरण्याचे काम करायचा. एकनाथांच्या घरात कृष्णाने श्रीखंडय़ा नामक पाणक्याचे रूप घेऊन पाणी भरल्याची कथा सर्वश्रुतच आहे.

नदीपेक्षा जवळचा जलस्रोत म्हणजे घराजवळ खोदलेली विहीर. ज्यातून थेट ओणवून किंवा जास्ती करून रहाट बांधून त्यातून दोरखंडाला बादली किवा हंडे वगरे बांधून खालचे पाणी वर ओढून घेणे किंवा शेंदणे.  माणसाच्या जीवनाप्रमाणेच आड.. पाट विहीर रहाटगाडगेसारख्या त्या काळच्या अनेक जलस्रोतांवरच्या म्हणी वाक्प्रचारांनी मराठी भाषाही समृद्ध केलीय. आजकालच्या पिढीला शेंदणे शब्दाप्रमाणेच रहाटगाडगे शब्दाचा अर्थही समजणार नाही. पण रहाटगाडग्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला कल्पक वापर श्रम वाचवणारा नक्कीच होता.  पूर्वी गावी गेल्यावर विहिरीवरचे फिरणारे रहाटगाडगे बघायला खूप गंमत वाटे. आम्ही मुलेही हौसेने पायरहाट चालवायचा प्रयत्न करत असू. विहिरीपाशी एका लाकडी फळीवर बसून गाडग्यांची माळ बांधलेल्या खूप मोठय़ा चक्राकार रहाटाला पायांची हालचाल करून ते फिरवले की खाली गेलेल्या गाडग्यात पाणी भरले जायचे आणि वर आले की तिथेच जोडलेल्या पन्हळीत आपसूक ओतले जाई. जिथून जवळच्या दगडाच्या डोणीत म्हणजेच एक प्रकारच्या हौदात भरले जाई. विहिरीतून वारंवार पाणी उपसायला लागू नये म्हणून या डोणीची सोय असायची. अंघोळीसाठी किंवा इतर छोटय़ामोठय़ा वापरासाठी या डोणीतील पाणीच वापरले जाई. घरगुती वापरासाठी म्हणजेच स्वयंपाकासाठी वगरे लागणारे पाणी स्वयंपाकघरातील मोरीपासच्या कट्टय़ावर पिंपे हंडे वगरेतून भरून ठेवले जाई. मला आठवतंय, आजोळी जेव्हा दिवे नव्हते तेव्हा अंधार पडायच्या आत विहिरीवरून पाणी आणण्यासाठी आजीची धांदल चाले. कारण रात्री अंधारात घरासमोरच्या विहिरीशी जाणे धोकादायक वाटे. अपवाद फक्त उन्हाळ्याचा. कारण विहिरीतील पाणी कायम थंड, त्याने उन्हाळ्यातील तहान शमली जायची. याच रहाटगाडग्यांच्या साहाय्याने संपूर्ण बागेचे शिंपण चाले, त्यासाठी मात्र बरेचदा बलांचा वापर होई. विहिरी नसतील तिथे पोफळीच्या झापाच्या पन्हाळीतून वाहणाऱ्या पाटाचे पाणी घराजवळच्या अष्टौप्रहर वाहणाऱ्या डोणीत जमा होऊन मग  त्याचा घरासाठी वापर होई. विज्ञानाने किमया केली.. गावागावात वीज पोचली, हळूहळू घराजवळच्या विहिरींवर पंप बसले आणि अर्थातच स्वयंपाकघरातील मोरीत नळातून पाणी येऊ लागले. रहाटातून पाणी ओढून काढायचे काम आपसूक कमीच झाले आणि अर्थातच त्यानिमित्ताने आपसूक होणारा व्यायामही कमी झाला.

सोयीसुविधांच्या बाबतीत शहरे तर कायमच खेडय़ापेक्षा चार पावले पुढेच राहिली आहेत, पण शहरातील पाणीटंचाईमुळे तिथल्या वाडे.. वाडय़ा.. चाळींमध्ये प्रत्येक घरात मोरी किंवा न्हाणीघरात पाण्यासाठी नळ असला तरी त्याला पाणी येईलच अशी खात्री नसायची. घरातील मोरीतल्या नळाला २४ तास पाणीपुरवठा नसल्याने अंघोळ किंवा इतर वापरासाठी गरजेप्रमाणे गॅलरीतील सुधारित डोणीतून म्हणजेच पत्र्याच्या पिंपातून १-१ बादली पाणी आणून त्यातून काम होई. बहुतेक ठिकाणी प्रत्येक मजल्यावर सार्वजनिक नळ असायचे. बिऱ्हाडांच्या संख्येनुसार ३ किवा ४ नळांतून रहिवाशांसाठी पाणीपुरवठा होई. विशेष म्हणजे त्या नळातूनही २४ तास पाणीपुरवठा होतच नसे. प्रत्येक विभागवार पाण्याच्या वेळा ठरलेल्या असत त्यामुळे त्या ठरावीक वेळी प्रत्येक बिऱ्हाडातील सदस्य बादल्या हंडे वगरे घेऊन तिथे नंबर लावून ताटकळत असायचे. काही वेळा तर पाण्याला फोर्स नसेल तर वरच्या मजल्यावरच्यांना तळ किवा पहिल्या मजल्यावरून अक्षरश: मजला दर मजला करत जिन्यांची चढउतार करत  पाणी भरावे लागायचे. त्याकामी घरातील यच्चयावत सदस्यांचा सहभाग असायचा. कुठे बाहेर जाणे-येणेसुद्धा पाणीपुरवठय़ाच्या वेळापत्रकानुसार ठरवले जायचे. अधिकच पाणी टंचाईच्या काळात उद्या पाणी आलेच नाही तर.. या भीतीपायी घरातील अगदी वाटय़ा पातेलीसुद्धा भरून ठेवण्याचा काही घरांत अतिरेक चाले. त्यावरून ‘चाळणीतही पाणी भरून ठेवा बरं का,’असे गमतीदार शेरेही ऐकायला मिळत. पाणी टंचाईमुळे रहिवाशांवर बरेचदा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग उभा ठाके. अर्थात चाळीतली ही भांडणे तात्पुरत्या काळासाठीच असायची, कारण वेळ पडल्यावर हेच भांडणारे विरोधी पक्ष एकमेकांच्या मदतीलाही धावून जायचे. सार्वजनिक नळावरील अशा भांडणतंटय़ांनी अनेक व्यंगचित्रकारांना तसेच विनोदी कथाकवितांना मुबलक विषय पुरवले आहेत.

प्लॅस्टिकच्या आगमनाने पाणी क्षेत्रात बरीच खळबळ माजली. त्याच्या पत्र्याप्रमाणे न गंजण्याच्या तसेच न फुटण्याच्या गुणामुळे  सर्वत्र रंगीबेरंगी प्लॅस्टिकच्या पिंपांचा आणि बादल्यांचा वापर निर्धोकपणे सुरू झाला. निर्धोक अशासाठी कारण एकेकाळी पिंप गळणे, पत्र्याच्या बादल्यांची बुडे झिजणे, त्याला नवीन तळ बसवणे किंवा सिमेंटने डागडुजी करणे किंवा तिचा फाटका पत्रा लागून जखम होणे वगरे प्रकार प्लॅस्टिकच्या बादल्यांमुळे बंद झाले. इमारतींसाठीसुद्धा भरपूर साठवणक्षमता असलेल्या प्लॅस्टिकच्या टाक्यांचा वापर सुरू झाला. तसेच घरगुती वापरासाठीही  कमीजास्ती क्षमतेच्या सुटसुटीत टाक्यांमुळे तर गरसोयीच्या पाणीपुरवठय़ाच्या वेळेवर कल्पक पर्याय निघाला. घरोघरी न्हणीघराच्यावर.. माळ्यावर किंवा काही खास सोय केलेल्या ठिकाणी पाणी साठवण्याच्या टाक्या बसवल्या गेल्या. ठरावीक वेळी पाण्याचा पंप चालू झाला की या टाक्यांमधे पाणी साठले जाऊन थेट मोरीतील किंवा सिंकमधील नळाद्वारे उपयोगात येऊ लागले. मोरीजवळच्या पिंप हंडे कळशा बादल्यांचा पसाराही आपसूकच कमी झाला. स्वयंपाक जेव्हा बठय़ा ओटय़ांऐवजी  उभ्या ओटय़ावर होऊ लागला तेव्हा वारंवार मोरीशी हात धुवायला वाकणे कठीण वाटायला लागले. तेव्हा उभा ओटा आणि मोरीचा कठडा याच्यामधे सिंक बांधले गेले ज्यात नळाची जोडणी झाली. सोयीनुसार  गार-गरम पाण्याच्या नळांचीही सोय केली गेली. पाण्याच्या पिंपाच्या तोटीचे तोंड १८० च्या कोनातून मोरीऐवजी नवीन बांधलेल्या सिंककडे वळले. घरात न्हाणीघर नसल्यास मोरीचा उपयोग आता फक्त अंघोळीपुरता राहिला. भांडी घासणे वगरे प्रकार आता उभ्याउभ्याच होऊ लागले.

कालांतराने बाजारात आलेल्या पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्रांच्या जाहिरातींनी आपल्यावर असा काही प्रभाव टाकला, की आजवर सुती कपडय़ाने किंवा नळाला लावलेल्या चिमुकल्या कापडी पिशवीने गाळल्या जाणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेबाबत आपल्या मनात अचानक प्रश्नचिन्ह उभे राहिले. इतकेच नव्हे, तर ते यंत्र लावले नाही तर आजारपणाला आमंत्रण निश्चित अशी आपल्याला खात्रीच वाटायला लागली परिणामी. घरोघरी अशा यंत्रातून र्निजतुक केलेले शुद्ध पाणी पिण्याची वहिवाट सुरू झाली. घराबाहेरही शुद्ध पाण्यासाठी सहजपणे पसे मोजणे सुरू झाले. इतकेच काय एखाद्दिवशी घरात पाणी आले नाही तर बिनदिक्कतणे मिनरल वॉटरचे कॅन आणून प्रश्न सोडवला जातो. रस्त्यावरच्या मोफत पाणी देणाऱ्या पाणपोयांना मात्र अशी यंत्रे लावलेली अजून तरी पाहण्यात नाही.

शेंदण्यासारख्या टिडिअस जॉबपासून ते अगदी नळाखाली फक्त हात धरल्यावर आपसूक येणाऱ्या पाण्याच्या धारेसारख्या सुखसोयीपर्यंतचा माझा विचारप्रवाह भांडय़ांच्या आवाजाने अडला. सिंकमधे मोठ्ठा नळ सोडून मावशींचे भांडी घासण्याचे काम आरामात चालू होते. जरा वैतागूनच मी त्यांच्याकडे पाहिल्यावर काय समजायचे ते समजून ओशाळून त्यांनी नळाची धार कमी केली. माझ्याकडे २४ तास पाणी असूनही मी पाण्याच्या वापराबाबत इतकी काटेकोर का आहे ते सुरुवातीला त्यांना कळतच नसे, पण त्यांच्याच गावातल्या दुष्काळाची आठवण देऊन किंवा त्यांना समजेल अशा अनेक उदाहरणांसह  त्यांना किमान जलसाक्षर करायचा माझ्या प्रयत्नावर अधूनमधून असे पाणी फिरतेच. संधी मिळेल तेव्हा खरं तर प्रत्येक सुजाण नागरिकाने  थोडे संवेदनशील होऊन २१व्या शतकातही डोक्यावर आणि कमरेवर प्लॅस्टिकचे हंडे घेऊन पाण्यासाठी मलोन्मल पायपीट करणाऱ्या आपल्याच मायबहिणींची.. भेगाळलेली जमीन उकरून त्यातून मातकट पाणी काढणाऱ्यांची.. पाण्याच्या टँकरसमोर लांबच लांब रांगा लावणाऱ्यांची धडपड नजरेपुढे आणल्यास त्यांच्याकडून पाण्याचा गरवापर टळू शकेल अन्यथा वाढती लोकसंख्या आणि पाण्याच्या सदोष नियोजनामुळे.. भीषण पाणी टंचाईमुळे जगात तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल हे मान्यवर जलतज्ज्ञांचे भाकीत खरे ठरण्याच्या कल्पनेने जिवाचे पाणी पाणी होते.

alaknanda263@yahoo.com